नेहमीच मराठी चोखंदळ वाचकांसाठी आणि वैशिष्यपूर्ण लेखनाची अभिजात गोडी ज्यांच्या लेखनात असते अशा मान्यवर लेखकांचा मेळा ठरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी यंदा डॉ तारा भवाळकर यांची निवड झाली आहे.
विशेष म्हणजे मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या डॉ तारा भवाळकर या सहाव्या महिला ठरल्या आहेत. यंदाचे साहित्य संमेलन हे दिल्ली येथे होणार आहे. मराठी साहित्य महामंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे यांनी दिली.
दिल्लीत होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे हे पहिलेच अधिवेशन असून संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच दिल्लीत हे साहित्य संमेलन पार पडणार आहे.
या संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठी ख्यातनाम लेखक पानीपतकार विश्वास पाटील आणि डॉ तारा भवाळकर यांच्या नावांची चर्चा सुरु होती. शेवटपर्यंत अध्यक्ष पदासाठी या दोन्ही लेखकांची नावे चर्चेत होती. अखेर या संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठी डॉ तारा भवाळकर यांच्या नावावर एकमत झाले. त्यानंतर डॉ तारा भवाळकर यांचे नाव जाहिर करण्यात आले.