Breaking News

याला काय अर्थ आहे साने…आता मला हेलिकॉप्टरमध्ये कोण बसवणार?

मी ही गोष्ट लिहित असताना आपले संजीव साने अनंतात विलिन होत असतील…!

२००९ सालची ही गोष्ट आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर शिवसेना-भाजपाची युती झाली होती. मात्र, तेव्हाच महाराष्ट्रात एक आगळावेगळा प्रयोग केला गेला. राज्यातील सगळे डावे पक्ष, सगळे आरपीआय गट आणि सगळे समाजवादी विचारांचे पक्ष एकत्रित आले होते आणि त्यांनी या ऐक्याला रिपब्लिकन डावी लोकशाही समिती अर्थात “रिडालोस” असे नाव दिले होते. तसेच या रिडालोसचे स्टार प्रचारक होते आरपीआयचे नेते रामदास आठवले आणि समन्वयक होते संजीव साने.

रिडालोसमुळे सर्वच प्रस्थापित पक्षांचे तेव्हा धाबे दणाणले होते. विशेष म्हणजे त्यावेळेस रिडालोसने प्रथमच प्रचारासाठी हेलिकॉप्टर भाड्याने घेतले होते. रामदास आठवले या हेलिकॉप्टरमधून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरणार होते. संजीव साने यांच्यावर हेलिकॉप्टरच्या नियोजनाची सगळी जबाबदारी सोपवण्यात आली होती.

मी त्यावेळेस “महानगर” मध्ये कार्यरत होतो. प्रचाराचं बिगूल वाजलं होतं. सगळे पत्रकार “रिडालोस”वर लक्ष ठेऊन होते. आणि अचानक एकेदिवशी सकाळीच संजीव सानेंचा मला फोन आला… “अर्ध्या तासात तुझी सगळी माहिती मला मेल करा, तुला उद्या सकाळी आठवलेंसोबत हेलिकॉप्टर दौऱ्यावर जायचंय… ” मला क्षणभर काही टोटलच लागेना. मी म्हटलं, “अहो, मी कसा काय जाणार हेलिकॉप्टर दौऱ्यावर? आमच्याकडे वरिष्ठ पत्रकार आहेत, मंत्रालय प्रतिनिधीसुध्दा आहेत. ते कव्हर करतील हा दौरा…! ”

त्यावर सानेंनी आपल्या खासशैलीत मला दरडावलं, “मी सांगतोय ना, तूच जायचंस आठवलेंसोबत हेलिकॉप्टर दौऱ्यावर… लवकर तुझी सगळी माहिती मेल कर…”

तरीही मी म्हटलं, “अहो, निदान संपादकांची तरी परवानगी घेऊ द्या. त्यांच्या परवानगीशिवाय मला येता यायचं नाही. ”

माझं म्हणणं ऐकल्यावर साने थोडे शांत झाले आणि म्हणाले, “ठिक आहे, संपादकांची परवानगी घेऊन लगेच तुझी माहिती मेल कर…! ”

मीही हो म्हणत फोन ठेवला.

पण त्यानंतर थोडा वेळ मला काहीच सूचत नव्हतं. तरीही ही गोष्ट मला संपादकांच्या कानावर घालणं गरजेचंच होतं. म्हणून मी युवराज सरांना फोन लावला. त्यावेळी युवराज मोहिते आणि मीना कर्णिक दोघेजण मिळून “महानगर”च्या संपादक पदाची जबाबदारी सांभाळत होते. यानंतर मी युवराज सरांना सगळा वृत्तांत सांगितला. त्यावर ते म्हणाले, “अरे परवानगी कसली मागतोयस, जा लवकर आणि तुझी सगळी माहिती सानेंना पाठव.”

मला हेलिकॉप्टर दौऱ्यावर जाण्याची परवानगी तर मिळाली होती पण, स्वतःची माहिती पाठवायची म्हणजे नेमकं काय करायचं ते कळत नव्हतं. कारण तोवर मी साधा विमान प्रवाससुध्दा केला नव्हता. नाही म्हणायला ‘राजधानी’ने दिल्लीला जाऊन आलो होतो. मात्र, आता थेट हेलिकॉप्टरमधून प्रवास करायचा होता. त्यामुळे मला काहीच सूचत नव्हतं. याचं कारण म्हणजे तोवर माझ्या संपर्कातील एकाही व्यक्तीने हेलिकॉप्टरमधून प्रवास केलेला नव्हता! विमानाने प्रवास केलेले अनेकजण संपर्कात होते. पण त्यांचा इथे काही उपयोग होणार नव्हता. आणि माझ्याकडे वेळही फार कमी होता. म्हणून मग मी पुन्हा सानेंना फोन केला.

“हॅलो, ऐकाना… संपादकांची परवानगी मिळालीय, पण तुम्हाला नेमकी माहिती काय हवीय? ”

त्यावर साने म्हणाले, “अरे, माहिती म्हणजे… तुझं संपूर्ण नाव, तुझा परमनंट अॅड्रेस, तुझं वय, तुझं वजन, तुझा रक्तगट, तुझा रंग, तुझ्या शरीरावरील जन्मजात खुणा वगैरे वगैरे. सगळं तपशीलवार पाठव. तेही अर्ध्या तासात… ”

मी हो म्हणेपर्यंत सानेंनी फोन ठेवला होता. त्या निवडणुकीत सानेंवर खूप लोड होता. रामदास आठवलेंचा संपूर्ण दौरा तेच आखत होते.

शेवटी मी माझी संपूर्ण माहिती सानेंना मेल केली आणि माझ्या रोजच्या कामाला लागलो. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत फिल्डवरून ऑफिसला पोचणे आणि ७ च्या आधी स्वतः जवळील सर्व बातम्या लिहून संपादकांच्या टेबलावर ठेवणे हा नियम होता. त्यामुळे मी संध्याकाळी ऑफिसमध्ये बातम्या लिहित बसलो होतो आणि बरोबर ७ वाजता “महानगर”च्या कार्यालयात सानेंनचा फोन आला. अर्थात तो फोन माझ्यासाठीच होता.

मी फोन घेतला. समोरून पुन्हा एकदा सानेंचा आवाज आला,

“हॅलो राकेश, अरे सकाळी ८ वाजता पार्ल्याच्या पवनहंस ला पोच. तुम्ही बरोबर साडेनऊ वाजता फ्लाय करणार आहात. ”

मी हो म्हणेपर्यंत सानेंनी फोन ठेवला.

मी तसाच युवराज सरांच्या केबिनमध्ये गेलो आणि त्यांना सानेंच्या फोनविषयी सांगितलं.

त्यावर युवराज सर नेहमीच्या सुरात म्हणाले, “मग आता वेळेत पोचा तिकडे. ते हेलिकॉप्टर आहे. दिलेल्या वेळेतच ते उडते.”

मी होकारार्थी मान हलवली आणि त्यांच्या केबिनमधून बाहेर पडणार तोच पुन्हा युवराज सरांनी आवाज दिला… “कॅमेरा आहे का तुझ्याकडे? ”

मी म्हटलं, नाही, पण करतो अरेंज.

त्यावर ते म्हणाले, ते काही मला माहीत नाही. मला फोटोसहीत बातमी हवीय. नीट सगळं कव्हर करून ये.”

मी हो म्हणालो आणि केबिनच्या बाहेर पडलो. कॅमेरा कुठून आणायचा? यापेक्षा हेलिकॉप्टरमध्ये कसं बसायचं? या विचारानेच मला घाम फुटला होता. मित्राकडून कॅमेरा घेतला. सकाळी निघण्याची सगळी तयारी रात्रीच करून ठेवली.

आणि तो दिवस उजाडला. मी सकाळी साडेसहा वाजताच घर सोडलं… आणि बरोबर सात वाजता युवराज सरांचा फोन आला. त्यांच्या खासशैलीत ते म्हणाले, “अरे कुठे आहेस तू? वाजले किती बघ… आठ वाजेपर्यंत कसा पोचणार तू? आणि लोकल लेट वगैरे असल्या तर…?”

मी म्हटलं, “सर मी निघालोय. पवईपर्यंत पोचलोय.”

त्यावर युवराज सर पुन्हा म्हणाले, “अरे तू पवईला काय करतोयस? तुला विलेपार्लेला जायचंय…”

मी म्हटलं, “सर, मी रिक्षाने थेट पवनहंस ला निघालोय. मी वेळेत पोचेन.”

सरांचा जीव भांड्यात पडला असावा बहुधा! ते म्हणाले, “हां, मग ठिकय. वेळेत पोच. नीट सगळं कव्हर कर… आणि हो, कॅमेरा घेतलास का?”

मी हो असं म्हटलं नि फोन कट झाला.

पुढे मी वेळेपूर्वीच पवनहंस ला पोचलो. तिथल्या सिक्युरिटी ऑफिसर्सने माझी चौकशी केली. मी सगळी माहिती दिल्यानंतर त्यांची खातरजमा झाली आणि ते मला आतमध्ये घेऊन गेले. समोर एक हेलिकॉप्टर उभेच होते. पण मला तिथल्या एक इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वेटींगरुममध्ये नेण्यात आलं. माझ्या सोबत जे काही घडत होतं ते सगळं पहिल्यांदाच घडत होतं… आणि तेही संजीव साने या व्यक्तीमुळे घडत होतं…!

थोड्या वेळाने तिथे अर्जुन डांगळे सर आले. त्यांच्या पाठोपाठ सदाभाऊ खोत आणि त्यांचे एक सहकारी आले. डांगळे सरांनी मला पाहिलं आणि म्हणाले, अरे व्वा, तू आलायस. बरं झालं…!

मला एव्हाना लक्षात आलं होतं की, आज आपल्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराचा प्रचार कव्हर करायला जायचंय. पण नेमकं कुठे ते मात्र अजूनही गुलदस्त्यातच होतं. मी गप्पा मारत मारतच डांगळे सरांकडून त्या हेलिकॉप्टर दौऱ्याची सगळी माहिती मिळवली. आम्ही अहमदनगर जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी निघालो होतो.

अखेरीस आठवलेंसोबत आम्ही सगळे त्या हेलिकॉप्टर मधून उडालो. अर्ध्या तासात आम्ही निफाडला पोचलो. उमेदवाराची रॅली, प्रचारसभा वगैरे सगळं आटोपून आम्ही दुपारी पाचच्या सुमारास निफाडहून पुन्हा मुंबईसाठी उडालो आणि साडेपाचला पवनहंस ला लँड झालो.

मला शक्य तितक्या लवकर ऑफिसला पोचून बातमी द्यायची होती. मात्र, रामदास आठवलेंचं म्हणणं होतं की, मी त्यांच्या सोबत नरिमन पाॅईंटला यावं आणि तिथली पत्रकार परिषदही कव्हर करावी.

मी म्हटलं, “साहेब, मी तिकडे आलो तर मला ऑफिसला पोचायला लेट होईल… मग आज बातमी लागणार नाही.”

त्यावर आठवले म्हणाले, “मी तुला वेळेत ऑफिसला पोचवतो. तू काळजी करू नकोस.”

आता मला आठवलेंना नाही म्हणणं शक्य नव्हतं. म्हणून मग मी त्यांच्यासोबत त्यांच्याच गाडीतून नरिमन पाॅईंटला निघालो. त्यावेळेस रामदास आठवलेंना ‘लाल दिवा’ होता. मी आयुष्यात पहिल्यांदाच लाल दिव्याच्या गाडीत बसलो होतो. तेही संजीव सानेंमुळेच…! विलेपार्ले ते नरिमन पाॅईंट हे अंतर आम्ही अवघ्या वीस मिनिटांत कापलं होतं. वरळी सी-लिंकवरून थेट नरिमन पाॅईंट…!

पार्टी ऑफिसला आठवलेंच्या गाड्यांचा ताफा पोचला. तसे सगळे प्रेस फोटोग्राफर, कॅमेरामन, पत्रकार सगळ्यांनीच आठवलेंच्या गाडीला गराडा घातला. आठवले गाडीतून खाली उतरले आणि त्यांच्या पाठोपाठ मीही गाडीतून खाली उतरलो. मला आठवलेंच्या गाडीतून उतरताना पाहून सगळे पत्रकार चकीत झाले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता… ‘हा आठवलेंच्या गाडीत कसा?’

त्यानंतर ती पत्रकार परिषदही पार पडली. तेव्हाच एका सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्राच्या वरिष्ठ पत्रकाराने मला गाठलं आणि विचारलं, “काय रे, तू आठवलेंच्या गाडीतून कसा काय उतरलास?”

मी म्हटलं, “अहो सर मी आठवलेंसोबत हेलिकॉप्टर दौऱ्यावर गेलो होतो. तिथूनच थेट आम्ही इकडे आलो.”

तो वरिष्ठ पत्रकार चकीत झाला. मला खोदून खोदून विचारू लागला.

मीही हसत हसत त्यांना म्हटलं, “सर, बायलाईन स्टोरी आहे. सकाळी बातमी वाचा…”, एवढं म्हणून मी तिथून पळ काढला नि थेट चर्चगेट गाठलं. ऑफिसला पोचलो. बातमी लिहिली. बातमी पहिल्या पानावर लागली. बायलाईन लागली. (‘महानगर’मध्ये बायलाईन स्टोरीसाठी तेव्हा मरणाची मेहनत करावी लागत असे.)

सकाळी नऊ वाजता संजीव सानेंचा फोन आला…

” राकेश, छान लावलीयस रे बातमी. आठवलेंनाही आवडली तुझी बातमी.”

सानेंच्या या दोन वाक्यांमुळे मला प्रचंड आनंद झाला होता. पण फोन ठेवताना मी त्यांना म्हंटलं, “तुमच्यामुळे मला हेलिकॉप्टरमध्ये बसता आलं. अन्यथा माझ्यासारख्या सामान्य मुलाला कोण हेलिकॉप्टरमध्ये बसवणार?”

यावर साने केवळ हसले आणि त्यांनी फोन ठेवून दिला…!

आणि आज स्वत: एकटेच हेलिकॉप्टरमध्ये बसून निघून गेले…!

अहो साने, माणगावच्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाची वाट तुम्हीच मला दाखवलीत…

समता आंदोलनात तर बोटच नाही अख्खा हात धरून हक्काने ओढत घेऊन गेलात.

तुम्ही आणि मोहन काका (मोहन सकपाळ. तेही सोडून निघून गेले.) दोघांनी मिळून की ठरवून ते मला ठाऊक नाही पण, मला समाजवादी चळवळीचा एक कार्यकर्ता बनवलंत…

तुम्ही दाखवलेल्या वाटेवरच आम्ही चालत असतानाच आज असे अचानक तुम्ही हात सोडून निघून गेलात…

साने हे तुम्ही चांगलं नाही केलंत.

याला काय अर्थ आहे साने?

आता मला आणि माझ्यासारख्या सामान्य मुलांना कोण हेलिकॉप्टरमध्ये बसवणार?

सांगाना साने…!

– सांध्य.

Check Also

६२ वसतिगृहे या जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यास सरकारची मान्यता

सामाजिक न्याय विभागांतर्गत स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून ऊसतोड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *