Breaking News

हरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात कमावती व्यक्ती गेलेल्यांनी या संस्थेच्या फोनवर संपर्क साधा

अहमदनगर: प्रतिनिधी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत  घरातील कमावता हात गमावलेल्यांचे अक्षरशः आभाळ हरवले. तथापी मुंबई येथील स्व. विश्वनाथराव बिरेवार फाउंडेशन ट्रस्ट अशा परीवारांचा अनामप्रेम संस्थेच्या माध्यमातून सोबती बनला आहे. तूर्त तातडीचा आर्थिक सहयोग बिरेवार फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून दिला जात आहे. तथापि अशा परीवारांत नवा कमावता हात निर्माण होईपर्यंत त्यांची सोबत करण्याचा निर्धार अनामप्रेम संस्थेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. प्रसिद्ध उद्योजक स्व.बाबुराव बिरेवार यांनी त्यांचे वडील स्व.विश्वनाथराव बिरेवार फाऊंडेशन ट्रस्ट स्थापन केला. सध्या ट्रस्टचा कारभार श्रीमती अलका बिरेवार पाहतात. या ट्रस्टने अशा करोना बाधित परिवारास प्रत्येकी २० हजार रुपयांचा आर्थिक सहयोग स्नेह – सहयोग अभियानाच्या  माध्यमातून देण्याचे ठरवले. यातील १० हजार रुपये तातडीने कुटुंबातील इतरांचे वैद्यकीय उपचार आणि अन्नधान्याच्या गरजा भागवण्यासाठी देण्यात येत आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी गरजेनुसार पुनश्च १० हजारांचा सहयोग बाधित परिवारांना या उपक्रमाव्दारे दिला जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ३ हजार बाधित परिवारांपर्यंत मदत पोहोचविण्याचे उद्दिष्ट अनाम प्रेम ने ठेवले आहे. नगर तालुक्यातील निंबळक आणि ईसळक या गावा तून योजनेचा प्रारंभ झाला. आज अत्यंत गरजू ३ कुटुंबांना हे धनादेश देण्यात करण्यात आले. सरकारी निकषांच्या जाळ्यात न अडकता सुयोग्य कुटुंबाना थेट मदत पोहोचवण्याचा हा पहिला व्यापक प्रयत्न आहे. गरजुंचा थेट घरी जाऊन अनामप्रेम द्वारा स्नेह – सहयोग देण्यात आला. ईसळक येथील तुकाराम रोकडे एप्रिल महिन्यात कोरोना ग्रस्त झाले. ७ दिवसात घरातील सर्वजण कोरोना ग्रस्त झाले. या कुटुंबातील तुकाराम यांची २ मुले, ४ नातू, पत्नी भामाबाई मोलमजुरी करून जगत. उपचार वेळेत न झाल्याने तुकाराम यांचे निधन झाले. उपचार आणि अन्नासाठी वणवण  सोसणाऱ्या या कुटुंबाला प्रथम स्नेह-सहयोग देण्यात आला. निंबळक येथील श्रीमती अनिता बाळासाहेब शिंदे यांना सहयोग देण्यात आला. अनिता यांचे पती बाळासाहेब रस्ता अपघातामुळे उपचार घेत होते. अनिता कारखान्यात काम करून चरितार्थ चालवित होत्या. त्यांच्या मुलाचे शिक्षण करीत होत्या. बाळासाहेब यांनी कोरोनाशी २२ दिवस झुंज दिली. अनिताची आयुष्याची सर्व कमाई त्यातच संपली. खासगी कर्जाचा बोजा वाढला. १० हजाराचा सहयोग या आशा हरविलेल्या कुटुंबास देण्यात आला.

तिसरा धनादेश स्व. परमेश्वर मोरे परिवारास देण्यात आला. विनानुदित शाळेतील हे  शिक्षक कोरोना झाल्यावर रुग्णालयात खाट न मिळाल्याने ३४ व्या वर्षी घरीच मृत्युमुखी पडले. परमेश्वर यांच्या ६० वर्षाच्या आई सरुबाई यांना मुलांची सुशृषा करताना कोरोनाची लागण झाली. मुलाचे दुःख आणि गरिबीमुळे सरुबाई यांनी ४ दिवस कोरोना अंगावर काढला. सरुबाई यांना सरकारी रुग्णालयात भरती करण्याचा प्रयत्न अनामप्रेम संस्थेने केला. परंतु संस्थेच्या रुग्णवाहिकेतच त्या देवाघरी गेल्या. परमेश्वर यांच्या पत्नी उज्ज्वला आणि सागर या ९ वर्षाच्या मुलास आज त्यांच्या घरी जाऊन आर्थिक सहयोग देण्यात आला. या कुटुंबांची संपूर्ण पुनर्वसनाची जबाबदारी अनामप्रेम परिवाराने घेतली. अनामप्रेमचे अजित माने, दीपक बुरम, उमेश पंडुरे, विष्णू वारकरी, ओम भागवत, भोलेनाथ घोरपडे, ज्ञानेश्वर गडाख, अजित कुलकर्णी आदी कार्यकर्ते हे स्नेह – सहयोग  अभियान राबवित आहेत. गिव इंडिया, तसेच काही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या कोविडमुळे कमावती व्यक्ती दिवंगत झालेल्या परिवारांना अर्थसहाय्य देणार आहेत. त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून देण्याचे अभियान स्नेहालय परिवार राबवीत आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी 9011026485, 9011020174 येथे संपर्काचे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर ! विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण सारथी संस्थेचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी मराठा,कुणबी, कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *