Breaking News

केंद्रीय मंत्री इराणी म्हणाल्या, महिला व बाल कल्याण विभागाचे काम चांगले मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबरील बैठकीत स्मृती इराणी यांचे प्रशंसोद्गार

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे महिला व बालकल्याण क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. कुपोषणमुक्ती, माता व बाल आरोग्य यातही उत्कृष्टपणे काम सुरू असल्याचे प्रशंसोद्गार केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज येथे काढले.
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेऊन महिला व बालकल्याण विभागाकडून करण्यात येत असलेल्या कामाची माहिती घेतल्यानंतर त्या बोलत होत्या.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रांच्या योजनांच्या बरोबरीने राज्याच्या यंत्रणेने ग्रामीण क्षेत्रासह नागरी भागात महिला व बालकल्याणातील कुपोषणमुक्ती आणि आरोग्याशी निगडित योजना आणखी सक्षमपणे राबवू असे सांगितले.
कुपोषण मुक्ती आणि महिला आरोग्याच्या क्षेत्रात राज्यातील यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहेत. यामुळे कुपोषण मुक्ती सह बालमृत्यू दर कमी करण्यात यश आले आहे. केंद्राप्रमाणेच राज्याच्या यंत्रणेनेही नागरी भागात विशेषत्वाने काम करण्याची गरज आहे. नागरी भागात या योजना आणखी सक्षम राबविल्यास आणखी प्रभावी कामगिरी नोंदविता येणार असल्याचे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री इराणी म्हणाल्या, ‘महाराष्ट्राचे महिला व बालकल्याण क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. राज्यात कुपोषण मुक्ती, माता व बाल आरोग्य यात उत्कृष्टपणे काम सुरू आहे. ‘माँ’ या पोषण अभियानातही महाराष्ट्र अव्वल राहील असा विश्वास वाटतो. राज्यात या क्षेत्रात आस्थेवाईकपणे काम सुरू आहे. पायाभूत आणि सुविधांप्रमाणेच ही आस्था बदलाची गोष्ट मोठी महत्त्वाची बाब आहे.’
यावेळी स्मार्ट अंगणवाडी, माता-बाल लसीकरण, पोक्सो अंतर्गत न्यायालयीन प्रक्रिया व कार्यवाही, बाल मृत्युदर रोखण्यासाठीचे विविध उपाय योजना, जाणीव-जागृतीचे उपक्रम, प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी आधाराश्रमांची उभारणी आदी विषयांवर चर्चा झाली.
याप्रसंगी महिला व बालकल्याण विभागाचे केंद्रीय सचिव पवनार, प्रधान सचिव भूषण गगराणी, राज्याच्या सचिव आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या आयुक्त इंद्रा मालो, अजय खेरा आदी उपस्थित होते.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *