Breaking News

१० स्मार्ट सिटी करणार होतात…एकतरी करायची ना… राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी

दहा स्मार्ट सिटी करणार होता ना… मग एक तरी करायची होती ना… करता येत नाहीतर पडता कशाला त्यामध्ये…अशी खोचक टीका करत भाजप सरकारच्या अनेक फसव्या योजना आणि राज्यात बिघडलेली कायदा व सुव्यस्था…मेक इन महाराष्ट्रातील गायब उदयोग…आणि रोजगार…यासह अनेक मुद्दयांना हात घालत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजप सरकार आणि सरकारचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

भाजप सरकार बोलते खूप आणि करत काही नाही. म्हणजे या सरकारची कथनी एक आणि करणी वेगळी असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना आमदार छगन भुजबळ यांनी भाजप सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.

या चार वर्षात राज्यावर लाखो कोटी रुपयांचे कर्ज वाढले. बेरोजगारी वाढली, नोकऱ्या काही दिल्या नाही… लोकांवर समृध्दी महामार्ग लादला… बुलेट ट्रेन… असे जाचक प्रकल्प जनतेवर लादले जात आहेत. ओबीसी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या मिळाल्या नाहीत. सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले असून या सरकारने राज्य दिवाळखोरीकडे ढकलल्याचा आरोप त्यांनी केला.

याआधीच्या युती सरकारने भरमसाठ कर्ज राज्यावर केलं. त्यानंतर आघाडी सरकार आल्यावर विकास केला आणि १५ वर्षात २ लाख कोटीचं खर्च केला. आताच्या सरकारने आतापर्यंत ४ लाख ६२ हजार कोटी रुपयांचे कर्ज केले आहे. या अधिवेशनात २० हजार कोटीच्या पुरवणी मागण्या मान्य केल्या. हिवाळी अधिवेशनात ११ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मान्य करून घेतल्या. एकूण ३१ हजार कोटी रुपयांची पुरवणी मागणी मान्य केली. याचा अर्थ राज्याची अर्थस्थिती कोलमडली आहे. मात्र सरकार त्यावर काहीही कार्यवाही करत नसल्याचा आरोप केला.

राज्याचा महसूल कमी झाला आहे. महसूली खर्चासाठी कर्जाची रक्कम वापरली जात आहे. बुलेट ट्रेनसाठी जपानकडून १ लाख कोटींचं कर्ज घेतलं. समृध्दी महामार्गासाठी दक्षिण कोरियाकडून कर्ज घेतले. ऋण काढून सण साजरी करण्याचं काम राज्य सरकार करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

राज्यात पाण्याची परिस्थिती वाईट असताना महाराष्ट्राचे पाणी दुसरीकडे दिले जात आहे. दमन गंगा, नार-पार या धरणाचे पाणी गुजरातकडे पाठवले जात आहे. आज मराठवाडयात पाणी नाही. जिल्हया जिल्ह्यात पाण्याची चणचण भासत आहे. गुजरातमधले धरणे भरण्यासाठी मदत केली जात आहे आणि महाराष्ट्रात दुष्काळ असताना पाणी तिकडे जात आहे त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रातील जनता भाजप सरकारला माफ करणार नाही असा इशाराही आमदार छगन भुजबळ यांनी दिला.

परदेशातील गुंतवणूक घसरली आहे. महाराष्ट्र ३ नंबरला आला आहे. कर्नाटक, गुजरात पुढे जात आहे.  महाराष्ट्रात फक्त ३८ हजार कोटीचे प्रस्ताव आले आहेत. स्टँड अप इंडिया फ्लॉप ठरली आहे. सरकारने सांगितले होते की १ कोटी उद्योगासाठी देण्यात येतील मात्र प्रत्यक्षात दिले फक्त १६ लाख ८८ हजार रुपये. सरकारने नोटाबंदी करून देशातील जनतेचं वाटोळं केलं. दहशतवाद संपणार असे म्हटले होते कुठे झाला दहशतवाद कमी? असा संतप्त सवालही त्यांनी यावेळी केला.

कौशल्य विकास योजनेचा बोजवारा उडाला आहे. संस्था सर्व बुडल्या आहेत. लोक त्या संस्थांमध्ये कामाला लागले होते. त्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. पारनेर येथे दोन लहान मुलींवर अत्याचार करण्यात आले. पोलिसांचा दरारा राहिला नाही. सत्तेतील लोक अग्रलेख लिहीत आहे की, पोलीस मार खात आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केला जात आहे.  सनातन संस्थेचे राज्य आले असं भासत आहे. कोणाचेही खुन केले जात आहेत त्यांना रोखणारे कोणीही नाही. साधकांच्या घरात स्फोटकं सापडत आहेत. सरकार मेक इन इंडिया म्हणतं हे काय बॉम्ब बनवायला आहे का ? असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.

गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशी पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतला परंतु त्यामध्ये फक्त खुल्या प्रवर्गातील विदयार्थ्यांनाच शिक्षणासाठी परदेशी पाठवले गेले. मग सरकार असा भेदभाव का करत आहे असा सवालही त्यांनी शेवटी केला.

Check Also

छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ओबीसींचे नेते मंत्री छगन भुजबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *