Breaking News

स्वरगंगेच्या काठावरती वचन दिलेला शुक्रतारा सोडून गेला पहाटे अखेरचा स्वरश्वास घेतला

मुंबई : प्रतिनिधी

मागील तीन दशकाहून अधिक काळ आपल्या स्वरावजाने अबालवृध्दांवर शुक्रताऱ्याची मोहिनी घालणारे आणि मराठी स्वरविश्वात शुक्रताऱ्यासारखे अढळस्थान निर्माण करणारे गायक अरूण दाते यांनी आज रविवारी पहाटे सहा वाजता कांजूर मार्ग येथील आपल्या राहत्या घरी अखेरचा स्वरश्वास घेतला. ते ८४ वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते सतत आजारी होते. त्यांच्यावर आज दुपारी २ वाजता सायन येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अरूण दाते हे मुळचे मध्य प्रदेशमधील इंदौरचे. त्यांचे वडील रामूभैय्या दाते हे ही त्याकाळचे प्रतिष्ठित गायक होते. त्यामुळे अरूण दाते यांनीही आपल्या गायनाचा वारसा पुढे चालवावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेनुसार अरूण दाते यांनीही गायनकलेचे शिक्षण घेवून हा वारसा पुढे सुरु केला. १९५५ साली पहिल्यांदा त्यांनी आकावाणीवर गायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी विविध प्रकारची गाणी गायली. मात्र काही कालावधीनंतर त्यांनी भावविश्वातील गाणी गायला सुरुवात केली. विशेष म्हणजे प्रसिध्द संगितकार यशवंत देव यांनी त्यांच्याकडून पहिले भावविश्व प्रकारातील गाणे गाऊन घेतले. त्यानंतर त्यांनी त्याच प्रकारची गाणी गाण्यास सुरुवात घेतली म्हणण्यापेक्षा त्यास वाहून घेतले.

१९६२ साली पहिल्या गीताची ध्वनीमुद्रीका प्रकाशित झाली. त्यांनी गायलेले शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातूनी,  येशील येशील येशील-राणी पहाटे पहाटे येशील,   भातुकलीच्या खेळामधील राजा आणिक राणी ,   दिवस हे तुझे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे,   या जगण्यावर शतदा प्रेम करावे आणि स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तु मला अशा हळुवार मनाच्या गाभाऱ्याला स्पर्श करणारी गाणी त्यांनी गायली.

त्यांची शुक्रताऱ्याची मैफल राज्याच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असली तरी तरूणांपासून ते अबालवृध्दांपर्यंत सर्वजण गर्दी करत. तसेच त्यांची प्रत्येक संगीत मैफल ही नेहमीच हाऊसफुल्ल असायची.

शोकसंदेश

ज्येष्ठ गायक अरूण दाते यांच्या निधनाने मराठी भावविश्वाला शब्दस्वर देणारा एक श्रेष्ठ भावगीत गायक आपण गमावला आहे. मराठी रसिकांमध्ये भावगीते लोकप्रिय करण्यात श्री. दाते यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या भावस्पर्शी मखमली आवाजाचा साज ल्यालेली अनेक गाणी अजरामर झाली असून त्यात विशेषतः  भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शुक्र तारा मंद वारा, स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला अशी अनेक गीते संस्मरणीय ठरली आहेत.  त्यांच्या निधनाने मराठी भावगीतांच्या क्षेत्रातील एक शुक्रतारा जणू निखळला आहे. (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस )

अरूण दाते यांनी संगीत क्षेत्रातील आपल्या प्रदीर्घ प्रवासात रसिकांना दिलेला गाण्यांचा गोडवा चिरंतन स्मरणात राहिल. दाते यांनी मराठी भावगीतांमधून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या सुमधूर आवाजातील मराठी भावगीतांनी रसिकांच्या ह्रदयात पटकावलेले अढळ स्थान, हीच त्यांच्या संगीत सेवेला मिळालेली खरी दाद आहे. ‘या जन्मावर,या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असा संदेश देणाऱ्या अरूण दातेंच्या निधनाने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली. (राधाकृष्ण विखे-पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते)

“या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करायला” शिकवणाऱ्या आदरणीय अरुण दाते साहेबांच निधन ही मराठी व भारतीय संगीताची मोठी हानी आहे. त्यांच्या भावपूर्ण आवाजातली हृदयाला हात घालणाऱ्या अद्वितीय गाण्यांमूळे भारतीय संगीताच्या नभांगणात हा “शुक्रतारा” अमर राहणार आहे. (धनंजय मुंडे, विधान परिषद विरोधी पक्षनेते)

आयुष्यावर प्रेम करायला शिकविणारा भावगीतातील शुक्रतारा निखळला. (अशोक चव्हाण, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष)

मराठी संगीत क्षेत्रातील सुप्रसिध्द भावगीत गायक अरुण दाते यांच्या निधनाने मराठी भावगीतातला शुक्रतारा निखळला. जवळपास ५० वर्षाहून अधिक काळ श्री.दाते यांनी मराठी संगीतासाठी योगदान दिले. शुक्रतारा मंदतारा, अखेरचे येतील माझ्या, भातुकलीच्या खेळामधली, स्वरगंगेच्या काठावरती अशी विविध एकाहून एक सरस गाणी गाणारे आणि जगण्यावर प्रेम करायला लावणारे गायक श्री.दाते यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. (विनोद तावडे, सांस्कृतिक मंत्री)

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *