Breaking News

खालुबाजा एका सनई वाजंत्री कलाकाराची कथा-लेखक सुदेश जाधव

खाडीच्या पलीकडे खालूबाजाचा जोर जोरात आवाज येऊ लागला तसा रंग्याच्या हाताला घाम सुटू लागला. रंग्या दारात बसून खालुबाजाचा येणारा आवाज आणि झुडपातून उडणारा गुलाल जणू आपल्या तोंडावर उडतो आहे असा भास कारित कर्कश सनई ऐकत राहिला. सनई चा आवाज त्याच्या कानातून आरपार जात होता. सनई वाजवणारा जेंव्हा फरफरत वाजवायचा तेंव्हा रंग्याची तळपायाची आग मस्तकाला जायची आणि तोंडातून सहज शब्द निघायचे “ काय रांडचा वाजतोय बापसाची गांड कय ” त्याला कर्कश सनई सहन झाली नाही .तसाच तडतड उठून तो दारुच्या अड्यावर गेला आणि पिव्वरची दारू कच्ची मारली काळीज चिरत जाणाऱ्या दारूने काही क्षणासाठी त्याच्या कानाचे पडदे बंद केले खरे, पण मेंदूच्या तारा हलल्यानंतर त्याला त्या सनईचा फाटका आवाज अगदी जवळ ऐकू येऊ लागला. आणि बेसूर सनई धक्क्यावर बसून ऐकु लागला. हळूहळू त्याला सनईची नशा चढू लागली उन्ह वाढत चाललं दारू अंगातून निघू लागली. तापलेल्या उन्हात त्याने खिशातला दारूचा फुगा काढला आणि गटागटा पिऊ लागला आणि हात टेकत टेकत धडपडत घराकडं दुपारच्या जेवणासाठी जाऊ लागला. हडप्यात गुंडाळून ठेवलेली सनईची पिशवी लटपटत लटपटत काढली. हे त्याच्या बायकोने पाहिलं तिने धावत येऊन पिशवी हिसकावली आणि हडप्यात फेकून दिली.

बायको त्याला शिव्या देऊ लागली “ बाराबोड्याच्या मेल्या मरून का जात नाय फासाला जायचा हाय काय जा तिथ पडवीत पासली पड चटय टाकलेय ” रंग्या जाऊन पडवीत पडला त्याच्या डोक्याला मुंग्या येऊ लागल्या दारू आता बऱ्यापैकी उतरली होती त्याचे डोळे हळू हळू  पडवीची कौल मोजता मोजता झाकू लागले . त्याच्या कानावर आता सनईपेक्षाही भयानक शब्द पडू लागले.  “माग माफी नालायका माग माफी नायतर सालं काढू . माग माफी” एकदम सगळ्यांचा गोंधळ त्याच्या कानांना चवताळून चाऊ लागला.  त्याला आता बुद्धाची काळवंडलेली मूर्ती अर्ध्या वीजलेल्या मेणबत्त्या आणि अगरबत्तीमधून स्पष्ट दिसू लागली. पुन्हा किचाट त्याच्या कानावर ऐकू येऊ लागला “ चामड्याचे ढोल आणि खालुबाज्यात वाजवायचा नाय असा आपल्या संघटनेत ठरलं असताना देखील तू वाजवायला गेलास. वरतून शिमाग्यात वाजवायला गेलास काय ,या पुढं सनई वाजवालीस तर तुझ्या मैतालापण हात लावायला येणार नाय कोन कलाल काय ?  उठ आणि बुद्धाच्या पुढ्यात माफी माग ” अध्यक्ष जोर जोरात ओरडत होता . रंग्यानं माफी मागीतली नाही म्हणून त्याला जितकं तुडवता  येईल तितका तुडवला. “आणि हा किंवा याच्या घरातला कोणीही  माणूस मेला तर आपल्यातला एकही माणूस पुढं जाणार नाय” असा निर्णय देऊन बैठक संपवली. बुद्धाच्या  पायाजवळच्या अगरबत्या मेणबत्त्या वीजलेल्या बघून अध्यक्षाने पुन्हा त्या पेटवायला लावल्या आणि लाईट बिल जास्त येतं म्हणून  गाभाऱ्यातली  लाईट घालवायला सांगितली. त्यानंतर रंग्याने जास्तीच्या सुपाऱ्या घेणं सुरु केलं  पण संघटनेच्या  विस्वस्तांनी रंग्याची सनई हडप्यात टाकण्यास भाग पाडलं. कित्तेक वर्ष तोंडाला सनई नाही दारू झोंबून उठायची. रंग्याचा भाचा कधी मधी गावाला यायचा तेंव्हा जबरदस्ती वाजवायला सांगायचा पण रंग्याला हिंमत जरी झाली तरी बायको वाजवुन द्यायची नाही.

समाज पुढारला पण रंग्याच्या सनईवरची धूळ कधी उडाली नाही. आता जयंतीला मोठ मोठे करमणुकीचे कार्यक्रम होतात सगळी  साहित्य वाजतात. गेल्या वर्षी तर अध्यक्षांनी बासरीवाल्याला पाचशे रु बक्षीस दिलं होतं. आंबेडकरांच्या जन्माचा एका लाघुनाटकात सीन दाखवताना जी काय  बासरी वाजली ती बेहद.  अभिनयाला नाही पण बासरीला वन्स्मोर झाला. आणि रंग्यालाही घरात झोपून त्या बासरीने खडबडून जागं केलं होतं  पण त्याने शिव्या हासडून गप्प पुन्हा झोपला होता. रंग्याच्या भाच्याला सनई वाजवण्याची आवड होती . रंग्याचं पाहून पाहून तो मुंबईत सनई वाजवायला  शिकला क्लासिकल , पण रंग्याची  सनई म्हणजे गालात दोन अंडी ठेवली तरी ती शिजायची अशी पूर्ण तालुक्यात चर्चा होती. त्याला मामाचीच सनई आवडायची.रंग्यान त्याच्या लहानपणी हट्टापायी प्लास्टिकच्या पायपाची बासरी बनून दिली होती आणि ती त्याने मामाची आठवण म्हाणून तशीच ठेवली होती . रंग्याच्या बायकोन पाणी भरायला रंग्याला उठावलं.  रंग्याच्या दळभद्री स्वप्नाचा   अश्याप्रकारचा शेवट नसावा हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं.  शांत झाला अंथरुणात तसाच गुढगे  छातीशी धरून समोरच्या रस्त्याकडे पहात बसला. खालच्या  अंगाला राहणारी लहान लहान पोरं पेपेटी वाजवत ओरडत खेकलत त्याला जाताना दिसली. त्या कर्कश आवाजांना ना सुर ना ताल पाहून त्याला आता तो आवाज शांत वाटू लागला. इतक्यात फाटक्या तोंडाचा नंद्या पाण्यावर  जाता जाता त्या लहान पोरांच्या त्या आवाजाला वैतागून पोरांना शिव्या घालू लागला. तशी पोरांनी पेपेटी  तोंडात तशीच ठेऊन आपापल्या घरात धूम ठोकली. रंग्या काही दिवसांनी खाजणात झाडावर लटकलेला सापडला. त्याची सनई बायाकोनं त्याच्यासोबत पाठवली नाही स्वताचं  कपाळ आपटून घेत तीनं त्या सनईला  छातीशी धरल. आता सनई हडप्यात नाही बाबासाहेबाच्या आणि बुद्धाच्या फोटोच्या मधोमध टांगलेली असते.आता खालुबाजा कुठेही वाजला कि रंग्याच्या बायकोची नजर सनईकड जाते.

Check Also

शेतकरी पोराच्या लग्नाची गोष्ट… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

केशव रत्नाकरची वाट बघत होता. दिवे लागणीची वेळ होत आली तरी सकाळी गेलेला माणूस अजून कसा आला नाही याची काळजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *