Breaking News

१५ हजार ‌शेतकर्‍यांच्या आत्महत्या हे सरकारचे अपयश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा आरोप

अहमदनगरः प्रतिनिधी
राज्यात आतापर्यंत १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे भाजप – शिवसेना सरकारचे अपयश आहे. मात्र राज्यातील सगळ्या जनतेने गुण्यागोविंदाने नांदावे ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. हे राज्य सुजलाम सुफलाम कसे होईल याकडे राष्ट्रवादीचे लक्ष असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी व्यक्त केली.
आज बेकारीने तोंड वर काढले आहे. तरुण आज नोकरीसाठी वणवण फिरत आहेत. सरकार उद्योगांना पोषक वातावरण तयार करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
उद्याची निवडणूक भारताची नाही. ही महाराष्ट्राची आहे. चांदा ते बांदापर्यंत महिला सुरक्षित नाहीत. हे सरकारचे अपयश आहे. सरकारने किती तरुणांना नोकर्‍या दिल्या. व्यापारांना काय दिले असा सवाल करत गोरगरीबांना महागाईने वेढले आहे. आपल्या राज्याला या भाजप सरकारने कर्जबाजारी केल्याची टीकाही त्यांनी केली.
५४ वर्षात अडीच लाख कोटीचे कर्ज होते. परंतु यांनी पाच वर्षात ५ लाख कोटीचे कर्ज करुन ठेवले आहे. नियोजनाचा अभाव या सरकारकडे आहे.
आमच्या विचाराचे सरकार आणि आमची सत्ता दिली तर स्थानिकांना नोकरीत ७५ टक्के जागा देण्याचा कायदा करु. तसेच राज्यातील काही लाख जागा रिक्त आहेत. त्या दोन महिन्यात लागलीच भरण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
लाखाचा पोशिंदा समाधानी नाही. त्याच्या पिकाला योग्य भाव मिळत नाहीय. आम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या सरकारच्या काळात शेतकऱ्यांमध्ये दरी निर्माण करण्याचे काम झाल्याचा आरोप त्यांनी केला.
अहमदनगर शहराला ३५० कोटीचे पॅकेज देतो असे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले होते. परंतु हे पॅकेज अद्याप मिळालेले नाही फक्त गाजर दाखवण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांना अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.
मुख्यमंत्री ठरवण्याची जहांगीर तुमची नाही -डॉ. अमोल कोल्हे
मुख्यमंत्री ठरवण्याची तुमची जहांगीर नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवण्याचा अधिकार महाराष्ट्रातील तरुणांना, जनतेला असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले.
रयतेचे राज्य पुन्हा आणण्यासाठी ही राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली. मात्र पाच वर्षे काम करण्यात यश न आल्याने जनादेश द्या हे सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांना महाजनादेश ही यात्रा काढली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
भविष्य साकारण्याची संधी येत्या विधानसभा निवडणुकीत मिळणार आहे त्याचा विचार करा. भाजपची महाजनादेश, तर शिवसेनेची जनआशिर्वाद यात्रा जनतेवर लादलेली आहे. मात्र राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा मनाने काढण्यात आलेली आहे. भविष्याचे चित्र तरुणांच्या समोर आज स्पष्ट दिसत नाही. जनसामान्यांचा आवाज ईव्हीएम नको बॅलेट पेपरवर हवा असेल तर तो आवाज बुलंद करण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रेनिमित्त शिवस्वराज्याची सनद यावेळी वाचून दाखवली.
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार संग्राम जगताप, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, माजी आमदार अरुणकाका जगताप, आमदार विदया चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Check Also

नाना पटोले यांचा विश्वास, मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही संपणार; पराभव अटळ

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *