Breaking News

भाजपाच्या बालेकिल्ल्यात शिवसेना विजयी तर अशोक चव्हाणांनी राखली जागा दादरा-नगर हवेलीत कलाबेन डेलकर आणि देगलूर मध्ये जितेश अंतापूरकर

मुंबई: प्रतिनिधी

दादरा-नगर हवेलीचे प्रशासकाकडून झालेल्या जाचामुळे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट मागे आत्महत्या केल्याने रिक्त झालेल्या लोकसभेच्या पोट निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवार आणि स्व.मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी तब्बल ५० हजाराहून अधिक मताधिक्कांनी विजय मिळविला असून या निमित्ताने शिवसेनेने पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर आपले खाते उघडले. तर दुसऱ्याबाजूला भाजपाने प्रतिष्ठेची केलेली देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीत नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपले वर्चस्व कायम राखत जितेश अंतापूरकर यांना निवडूण आणले.

देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपामध्ये आणत त्यांना उमेदवारी जाहिर केली. तसेच अशोक चव्हाण यांच्या वर्चस्वा खाली असलेली ही जागा काहीही करून हिसकावून घ्यायची यासाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे थळ ठोकून होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही आपला जोर लावला. मात्र सुभाष साबणे यांना ६६ हजार ९०७ मते मिळाली. तर जितेश अंतापूरकर यांना काँग्रेसबरोबरच शिवसेना आणि राष्ट्रवादीची मते मिळाल्याने त्यांनी १ लाख ८ हजार ८४० मतांनी विजय मिळविला. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील राजकारणात आपलाच शब्द चालणार हे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दाखवून दिले.

वास्तविक पाहता या निवडणूकीकडे भाजपा विरूध्द महाविकास आघाडी असाच रंग चढविण्याचा प्रयत्न भाजपाकडून झाला. परंतु प्रत्यक्षात ही लढाई भाजपा विरूध्द काँग्रेस अशीच राहीली. काही महिन्यापूर्वी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली जागा भाजपाने हिसकावून दाखवित ग्रामीण भागातही भाजपाला जनाधार मिळत असल्याचे दाखवून दिले होते. याचीच पुर्नरावृत्ती देगलूर-बिलोली मतदारसंघातही घडवून आणण्याचा प्रयत्न भाजपाचा होता. परंतु भाजपाला यावेळी ते शक्य झाले नाही.

दरम्यान गुजरातला लागून असलेल्या दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघात भाजपाचा वरचष्मा राहीला आहे. येथील स्व. मोहन डेलकर हे ही यापूर्वी भाजपाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडूण आले होते. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. मात्र तेथील भाजपाचा नेता असलेल्या प्रशासक आणि त्यांच्यात बेबनाव झाला. तसेच त्याच्याकडून सातत्याने त्रास देण्यात येत असल्याचे आरोप त्यांनी सूसाईड नोट मध्ये करत आत्महत्या केली. त्यानंतर शिवसेनेकडून कलाबेन डेलकर यांना शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली. तसेच त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी तेथील मराठी समुदायाची बैठक घेतली होती.

कलाबेन डेलकर यांनी १ लाख १६ हजार ८३४ मते मिळवित येथील जागेवर विजय मिळविला. तर त्यांचे प्रतिस्पर्धी महेश गावित यांना ६६ हजार १५७ मते मिळाली. त्यामुळे तेथील भाजपाचा जनाधार घटत असल्याचे दिसून येत आहे.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *