Breaking News

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची लवकरच दिल्लीवारी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार

मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यातील सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे. शिवसेना सरकारला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याची प्राथमिक तयारी झालेली असून अंतिम बैठकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे लवकरच काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी नवी दिल्लीला जाणार असल्याचे शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
राज्याच्या सत्ताकारणापासून भाजपाला दूर ठेवण्यासाठी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्यासाठी सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसकडून तयारी दाखविण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेत राज्यातील राजकिय परिस्थिती आणि जनतेत असलेल्या भावना याची माहिती दिली. त्यानंतर काँग्रेसकडूनही त्याबाबत सकारात्मक पावले टाकण्यात आली. या अनुषंगाने काँग्रेसचे बडे नेते अहमद पटेल यांनी उध्दव ठाकरे यांच्याशी फोनवरून बोलणेही केले. मात्र सोनिया गांधी यांच्याशी ठाकरे यांची अद्याप चर्चा झाली नाही. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याकरीता उध्दव ठाकरे हे लवकरच नवी दिल्लीला जाणार असल्याचेही ते म्हणाले.
साधारणतः १८ तारखेला शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट झाल्यानंतर १९ आणि २० नोव्हेंबर रोजी काँग्रेस नेत्यांची पक्षांतर्गत बैठक होणार आहे. त्यामुळे २२ ते २३ तारखेच्या दरम्यान उध्दव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची बैठक केव्हाही होवू शकते असे त्यांनी सांगितले.
कदाचित या दोन बड्या नेत्यांच्या बैठकीनंतरच राज्यातील नव्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीचा कार्यक्रम ठरविला जाणार असल्याची शक्यताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *