Breaking News

विधानसभेत मविआच्या १६९ मतांना पाहून भाजपाने केला सभात्याग मनसे आणि मार्क्सवादी आणि एमआयएम तटस्थ

मुंबईः विशेष प्रतिनिधी

राज्यात सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेल्या राजकिय नाट्यावर आज शनिवारी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीवर १६९ आमदारांनी विश्वास दाखविल्याने पडदा पडला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर महाविकास आघाडीच्या सर्वच आमदारांबरोबर बहुजन विकास आघाडीच्या दोन, प्रहार संघटनेच्या एक आणि एका अपक्ष आमदाराने विश्वास दाखविला. विशेष म्हणजे बहुमत सिध्द करण्यासाठी बोलाविण्यात आलेले अधिवेशन आणि नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी बेकायदेशीर असल्याचे सांगत भाजपाने सभात्याग करत विधानसभेतून पळ काढला.

अल्पमतातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार औटघटकेचे ठरल्यानंतर राज्यपालांनी शिकाँरा अर्थात महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले. त्यानुसार या आघाडीचे गटनेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

विधानसभेचे विशेष अधिवेशन आज दुपारी २ वाजता सुरु झाले. त्यावेळी शिवसेनेच्या सर्वच आमदारांनी भगवे फेटे परिधान करत सभागृहात प्रवेश केला. २ वाजण्यास ३ मिनिटांचा अवधी शिल्लक असताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सभागृहात प्रवेश करत विरोधी बाकावर बसलेल्या भाजपा सदस्यांची भेट घेत त्यांच्याशी हस्तांदोलन केले. त्यानंतर पहिल्या बाकावर बसलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांशी हस्तांदोलन केले. त्यानंतर मंत्री म्हणून विराजमान झालेले छगन भुजबळ यांच्याशी हस्तांदोलन करताना भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे सभागृहात आगमन झाले. त्यावेळी भुजबळ यांनी फडणवीस यांना भेटण्याविषयी सुचविले. त्यानुसार ठाकरे हे फडणवीस यांच्या जवळ जात त्यांच्याशी हस्तांदोलन करत त्यांना अलिंगन देण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचे सभागृहात आगमन झाले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरु होताच भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाँईट ऑफ प्रोसिजरखाली मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी घेतलेली शपथ बेकायदेशीर असल्याचा आरोप करत २७ नोव्हेंबर २०१९ रोजी बोलविलेले अधिवेशन त्याच दिवशी संपले. त्यामुळे हे अधिवेशन बोलविण्यासाठी पुन्हा एकदा राज्यपालांचे आदेश आवश्यक होते. परंतु तसे न करता पुन्हा अधिवेशन बोलाविल्याने हे अधिवेशनही बेकायदेशीर ठरत असल्याचा दावा केला.

त्याचबरोबर भाजपाच्या सदस्यांना सभागृहात येता येवू नये म्हणून रात्री १ वाजता अधिवेशन बोलविण्यात आल्याची माहिती देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

यावेळी सत्ताधारी बाकावरून फडणवीस यांच्या वक्तव्यावर हशा उसळत, त्यांची हुर्रे उडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरीही फडणवीस यांनी आपले बोलणे तसेच पुढे सुरु ठेवत अधिवेशन आणि शपथविधी अवैध असल्याचा आरोप केला.

त्यांच्या या आरोपाला उत्तर देताना हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, पहिल्या दिवशी बोलाविलेले अधिवेशन हे राज्यपालांच्या आदेशानुसार आहे. तसेच त्यादिवशी जरी राष्ट्रगीत झालेले असले तरी सात दिवसाच्या आत पुन्हा राज्यपाल अधिवेशन घेण्याबाबत आदेश काढू शकतात. त्यानुसार आज बोलाविण्यात आलेले अधिवेशन आहे. तसेच शपथविधीचा कार्यक्रम हा सभागृहात झालेला विषय नसल्याने तो विषय राज्यपालांच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे त्यावर सभागृहात चर्चा करता येत नसल्याची बाब स्पष्ट करत फडणवीस यांनी केलेला दावा फेटाळून लावत असल्याचे जाहीर केले.

यावर भाजपाच्या सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा होत दादागिरी नही चलेगी असे म्हणत घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे अध्यक्षांनी फडणवीस यांना पुन्हा बोलण्याची संधी दिली. त्यावेळी या सभागृहात संविधानातील मुद्यांवर बोलता येत नसेल तर मला या सभागृहात बसण्याचा अधिकार नसल्याचे जाहीर केले.

त्यावर हंगामी अध्यक्षांनी हे सर्व कामकाज राज्यपालांच्या आदेशान्वयेच होत असल्याने त्यांच्या आदेशाचा मान आपण सर्वांनीच ठेवला पाहिजे असे आवाहन करत पुढील विश्वासमत ठराव मांडण्याचे आदेश दिले. त्यानुसार काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विश्वासमत ठराव मांडला, त्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी पाठिंबा देत शिवसेनेच्या सुनिल प्रभू यांनी त्यास अनुमोदन दिले.

तरीही भाजपाच्या सदस्यांकडून सतत गोंधळ सुरुच ठेवण्यात आला. या गोंधळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेल्या मंत्र्यांची सभागृहाला ओळख करून दिली.

अखेर बोलण्यास संधी देत नसल्याचे कारण पुढे करत भाजपाच्या सदस्यांनी सभात्याग केला. शेवटी भाजपाच्या गैरहजेरीतच उघड मतदानाने महाविकास आघाडीच्या सरकारने १६९ मतांच्या बहुमताचा आकडा पार करत विश्वासदर्शक ठराव जिंकला.

Check Also

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसाठी गोड बातमी: मानधनात वाढ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *