गाझीपूर (उ.प्र): प्रतिनिधी
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे कृषी कायदे रद्द करावेत अशी मागणी शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी करत शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या दिल्ली पोलिसांना चायना बॉर्डरवर पाठवा असा टोलाही त्यांनी लगावला.
दिल्लीच्या गाझीपूर बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी शेतकरी नेते राकेश टिकैत यांची शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी भेट घेतली. तसेच शेतकऱ्यांच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा असून महाराष्ट्र सरकारही शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची एकच मागणी असून केंद्राने कृषी कायदे रद्दबातल करावे अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या आंदोलनासोबत शिवसेनाचा पाठिंबा असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी यापूर्वीच सांगितले. त्यानुसार आज प्रत्यक्ष भेटून पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. प्रसारमाध्यमात राकेश टिकैत यांचे अश्रु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पाहिले. त्यांचे अश्रु पाहून मन हेलावल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
