Breaking News

भाजपाच्या सोमैय्यांनी जाहिर माफी मागावी अन्यथा…शिवसेना आमदाराचा इशारा आमदार रविंद्र वायकरांनी पाठवली मानहानीची नोटीस

मुंबई : प्रतिनिधी

कोकणातील अन्वय नाईक यांची कोर्लाई येथील मालमत्ता खरेदीप्रकरणी व महाकाली येथील जागेच्या संदर्भात खोटे आणि बिनबुडाचे आरोप करुन जनमानसात आपली, कुटुंबांची व पक्षाची प्रतिमा मलिन करत असल्याप्रकरणी जोगेश्‍वरीचे आमदार रविंद्र वायकर यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांना मानहानीची नोटीस पाठवित नोटीसीनुसार सोमैय्या यांनी वरील दोन्ही प्रकरणी जाहिर माफी न मागितल्यास, क्रिमिनल कायदेशीर कारवाईस सामोरे जावे असा इशाराही वायकर यांनी दिला.

काही महिन्यांपुर्वीच किरीट सोमैय्या यांनी सौ. मनिषा रविंद्र वायकर तसेच सौ. रश्मी उद्धव ठाकरे यांनी अलिबाग कोर्लाई येथे खरेदी केलेल्या संयुक्त जमिनीवर १९ बंगले असल्याचा तसेच वरील माहीती निवडणुक आयोगाकडे लपविल्याचा दावा केला होता. एवढेच नव्हे या जमिनीवरील बंगल्याचा वापर व्यवसायासाठी (एका बंगल्याची किंमत रुपये ५ कोटी आहे.) केल्याचा आरोप पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला. परंतु यावेळी त्यांनी कुठलेही सबळ पुरावे सादर केले नव्हते. त्याचबरोबर महाकाली गुंफा जमीन घोटाळ्यात वायकर यांना अविनाश भोसले व शाहीद बलवा यांच्याकडून रुपये २५ कोटींचा मोबदला मिळाल्याचा आरोपही सोमैय्या यांनी पत्रकार परिषदेत केला होता. या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून त्यांनी खोटया प्रकरणी बिनबुडाचे आरोप करीत वायकर, त्यांचे कुटुंब तसेच पक्षाची नाहक बदनामी तर केलीच, जनमानसातील त्यांची लोकप्रतिनिधीची प्रतिमाही मलिन केली.

यातील कोर्लाई जमिन प्रकरणी सोमैय्या यांच्या आरोपांची काही विविध प्रसारमाध्यमांनीच पोलखोल केली. परंतु मार्च महिन्यात पत्रकार परिषद घेऊन सोमैय्या यांनी महाकाली गुंफा येथील जमीन प्रकरणी पुन्हा वायकर यांच्यावर खोटे आरोप करीत जनमानसातील त्यांची लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करण्याचा जाणून बुजून प्रयत्न केला. सातत्याने  नाहक आरोप करीत आपली, कुटुंबाची तसेच पक्षाची बदनामी करणार्‍या सोमैय्या यांना अखेर रविंद्र वायकर यांनी मानहानीची नोटीस पाठवली आहे. या नोटीसीत सोमैय्या यांनी कुठलेही सबळ पुरावे न देता केलेले आरोप जाहिररीत्या मागे घेत जाहिर माफी न मागितल्यास पुढील क्रिमिनल कारवाई करण्याचा इशाराही वायकर यांनी या नोटीसीद्वारे दिला.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *