Breaking News

गृहमंत्री वळसे-पाटील यांची मोठी घोषणा तर आढळराव पाटलांचे त्यांनाच आव्हान भाजपापाठोपाठ आता शिवसेनाही आग्रही

पुणे: प्रतिनिधी

कोरोनामुळे राज्यात काही प्रमाणात निर्बंध अद्यापही लागू असताना बैलगाडी शर्यतीवरून भाजपा आमदार गोपीनाथ पडळकर, सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला आव्हान देत या शर्यतीचे आयोजन केले. याप्रकरणी पडकरांसह अनेकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले असतानाच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव-पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याच उपस्थितीत १५ दिवसात गृहमंत्र्यांच्या मतदारसंघ असलेल्या आंबेगावात बैलगाडा शर्यत घेणार असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे शर्यतप्रकरणी पोलिसांकडून दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्याची मोठी घोषणा गृहमंत्री वळसे-पाटील यांनी करून काही मिनिटांचा अवधी लोटत नाही तोच आढळराव यांनी आव्हान दिले.

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील उपजिल्हा रूग्णालयातील नव्या सुविधांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ही घोषणा केली होती. तेथेच शिवाजी आढळराव पाटील यांनी त्यांना आव्हान दिले.

गेल्या काही दिवसांत बैलगाडा शर्यतीवरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयानं बंदी घातली आहे. मात्र, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांमध्ये या शर्यती सुरु आहेत. त्या धर्तीवर महाराष्ट्रातही बैलगाडा शर्यत सुरु करावी अशी आक्रमक मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून होत आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील विविध भागात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आले होते.

बैलगाडा शर्यती दरम्यान जिथे गुन्हे दाखल झाले असतील ते गुन्हे मागे घेऊ आणि लोकांची यातून मुक्तता करण्याचा प्रयत्न करु, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी करत पुढे खटले दाखल होणार नाही म्हणून बैलगाडा शर्यत भरवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

विशेष म्हणजे गृहमंत्री वळसे-पाटील यांनी घोषणा करून काही मिनिटांचा अवधी लोटत नाही तोच त्याच व्यासपीठावरून शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गृहमंत्र्यांच्याच जिल्ह्यात बैलगाडा शर्यत होणार असं आव्हान दिलं आहे. आढळराव-पाटील यांनी त्यासाठी राज्य सरकारला १५दिवसांचा अल्टिमेटम दिला.

सांगलीतील झरे गावात पडळकरांनी बैलगाडा शर्यत आयोजित केल्याप्रकरणी त्यांच्यासह ४१ जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत. आता गृहमंत्री वळसे-पाटील यांनी गुन्हे मागे घेण्याची घोषणा केल्याने दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत.

Check Also

तर ओबीसींच्या डोळ्यात धुळफेक ठरेल…संभाजी बिग्रेडचा प्रस्ताव आल्यावर निर्णय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मत

पुणे (देहू) : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारकडून काढण्यात येणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *