Breaking News

शिवसेना पक्षप्रमुख ठाकरें म्हणाले, आमचं हिंदूत्व थाळ्या-घंटा बडविणारे नाही भाजपाने आमचं सरकार पाडण्याआधी स्वत:च सरकार साभांळावे

मुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यात कोरोनाचं संकट आहे. पण मंदीर उघडत नसल्याने काहीजण मला माझं हिंदूत्व विचारत असून ते म्हणतात मी सेक्युलर झाला की काय? असा प्रश्न विचारत आहेत. आम्हाला कोणाकडून हिंदूत्व शिकण्याची गरज नसून आमचं हिंदूत्व हे थाळ्या-घंटा बडविणार नसून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या प्रमाणे अतिरेक्यांना मारणारं हिंदूत्व असल्याचे सांगत तुम्हाला थाळ्या आणि घंटा बडविण्याशिवाय येत काय असा टोला शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपा नेत्यांना  लगावला.

पारंपारीक शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आज संध्याकाळी ते बोलत होते. यंदाच्यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने शिवाजी पार्क जवळील वीर सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी निवडणक शिवसेना नेते आणि शिवसैनिक या कार्यक्रमाला हजर होते.

शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यात प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते की, हा महाराष्ट्र लेच्या पेच्याचा नाही. या महाराष्ट्राच्या प्रगतीच्या आड कोणी येत असेल तर त्याच्या छाताडावर बसून गुढी पाडवा साजरा करून पुढे गेल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा त्यांनी भाजपा नेत्यांना यावेळी नाव न घेता दिला.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून अनेक जण खोटेनाटे आरोप करत आहेत, टीका टिपण्णी करत आहेत. नुकतेच बिहारमध्ये कोरोनाची लस मोफत देणार असल्याचे जाहीर केले. आणि बाकिचे काय बांग्लादेशी आहेत कि पाकिस्तानी आहेत असा सवाल उपस्थित करत या देशातील प्रत्येकाला लस मिळाली पाहिजे. परंतु काही जणांना जनावरांची लस लागते असं सांगत काहीजण बेडूक उड्या मारत असतात. पूर्वी बेडकाच्या पिलाने बैल पाहिला होता. मात्र आताच्या बेडकाच्या बिलाने वाघ पाहिला आणि वाघाची डरकाळी ऐकताच तो लपून बसला. मग त्याने त्याच्या बापाला सांगितले त्याच्या बापाने डरकाळी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा आवाज किरकिरा निघाल्याची टीका राणे पिता-पुत्रांचे नाव न घेता केली.

हिंदूत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जात आहेत. का तर मंदीर उघडली जात नाहीत म्हणून. वाघाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर तो फटका मारणारचं तो काही शेपूट हलविणारे मांजर नाही. ज्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी सगळे शेपूट घालून कुठे लपून बसले होते मांजर. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी जाहीरपणे सांगितले. मला मंदीरात घंटा बडविणारे हिंदूत्व नकोय तर अतिरेक्यांना मारणारं हिंदूत्व हवंय. माय मरो आणि गाय जगो असे आमचं हिंदूत्व नाही.  इकडे गाय ही माता आणि तिकडे गाय खाता अशी तुमची गत तिकडे गोव्यात असून गोवंश हत्या बंदी नसल्याची आठवण त्यांनी भाजपाला करून दिली.

हिंदूत्वाबद्दल राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले, ते जरा ऐका आणि हिंदूत्व काय आहे ते जरा नीट समजून घ्या. जे काळी टोपी घालणारे आहे ना? त्या टोपीच्या खाली डोकं असेल तर ते काय म्हणाले त्याचा नीट विचार करण्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी राज्यपालांचे नाव घेता लगावला.

तसेच संघाची राजकिय शाखा असलेल्यांनीही त्यांचे विचार नीट ऐकण्याची ,गरज आहे. राजकारण म्हणजे शत्रु बरोबरचे युध्द नव्हे तर विवेक सांभाळून करण्याचे काम असल्याचे भागवतांनी सांगितले. ते नीट समजून घेवून पाडा पाडीचे राजकारण सोडा असे आवाहनही भाजपाला करत मला अनेकजण म्हणतात पंतप्रधान मोदी किती काम करतात तसे काम करा. ते किती फिरतात पहा परंतु सुदर्शन चक्रही फिरत असंत पण ते नुसतं फिरण काय कामाचं असा टोलाही त्यांनी सल्ला देणाऱ्यांना लगावला.

मला भाजपाला टार्गेट करायचं नाही. पण आज स्थिती काय देश रसातळाला चाललाय, तिकडे लक्ष देण्याची गरज आहे. राज्यातही संकट येत आहेत. त्यांना मदतही करतोय परतु त्यासाठी पैसा कोठून आणायचं, आपल्या हक्काचे ३८ हजार कोटी रूपये केंद्र सरकारने अद्याप दिलेले नाहीत. या जीएसटीच्या पैशाला पर्याय आणण्यात आला, कि कर्ज काढा ! पण हे कर्ज कोणी फेडायचं? त्यापेक्षा जीएसटी संकल्पना फसली हे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर करून माफी मागावी आणि त्यात सुधारणा करावी किंवा पुन्हा जुनी व्यवस्था लागू करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

त्यामुळे देशातील सर्व मुख्यमंत्र्यांनी एकत्र यावे याविषयावर मी बोलेन. पैसे मिळावेत यासाठी सर्वच जण पत्रं लिहित आहेत, बोंब मारत आहेत. पण केंद्र सरकार हक्काचे पैसे द्यायला तयार नसल्याचा आरोप त्यांनी केला.

हा देश काही भाजपाला जहागीरीत मिळालेला नाही. १९४७ स्वातंत्र्य हे काही भाजपाच्या सत्तेसाठी मिळवून दिलेले नाही. ते स्वातंत्र्य तुम्हा-आम्हा लोकांसाठी मिळवून दिलेले आहे. कधीकाळी देशात असलेले इंग्रजही आमच्या साम्राज्याचा सुर्य कधीच मावळणार नाही असे म्हणत होते. पण इंग्रज मावळले मात्र सुर्य उगवायचा कुठे थांबलाय असे ठाकरे यांनी सांगत भाजपाची अशीच मस्ती राहीली तर एक दिवस जनताच उठेल आणि सांगेल की दुसरे कोणी ही चालेल हे नकोच नको असे सांगेल असा इशारा त्यांनी भाजपाला दिला.

सध्या बिहारमध्ये निवडणूका सुरू आहेत. सध्या ते म्हणतात कि कुणाच्या कितीही जागा येवोत अगला मुख्यमंत्री नीतीशकुमार अशी घोषणा देत आहेत. त्या हरियाणात सुरुवातीला कुलदीप बिष्णोईबाबतही असेच भाजपानी जाहीर केले होते. परंतु त्यानंतर काय केले तर स्वत:चा मुख्यमंत्री बसवला. त्यानंतर आपल्यासोबत करण्याचा प्रयत्न केला. मात्र आपण त्यांना झटका दिला. आता ते बिहारमध्ये करू पहात आहेत. आम्ही सरसंघचालक भागवतांना राष्ट्रपती करा म्हणलो पण तुम्हाला शिवसेना नकोशी झाली. तिकडे नीतीशकुमारांनी संघमुक्त भारत अशी घोषणा देत पंतप्रधान पदाचा चेहरा सेक्युलर असावा म्हणत रालोआशी असलेली युती तोडून टाकली. त्यानंतर मग कोणी कोणाला हिंदूत्वाची आणि सेक्युलरिझमंची लस दिली असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.

मुंबई पाकव्याप्त  काश्मीर झाल्याचे काहीजण म्हणाले. पण ज्या पंतप्रधान मोदी यांनी मागच्या निवडणूकीत पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात घेणार असल्याची घोषणा केली होती. आधी तो भाग भारतात आणा त्यानंतर बोला असे आवाहन करत महाराष्ट्राची, इथल्या पोलिसांची बदनामी करण्याचे काम काहीजणांकडून सुरु आहे. जर मुंबईत पाकव्यपात् काश्मीर बनले असेल तर ते अपयश मोदींचे आहे राज्य सरकारचे नाही असे सांगत भाजपाचा आरोप त्यांच्यावरच उलटविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला.

Check Also

लेकाच्या अभियानात बापाने उचलला खारीचा वाटा जयंत पाटील यांनी उचलला दहा जणांच्या लसीचा खर्च

सांगली: प्रतिनिधी आज सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लसीचा पहिला डोस घेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *