Breaking News

शिवसेनाप्रमुखांचे स्मारक अंडरग्राऊंड होणार

महापौर बंगल्याची कागदपत्रे स्मारक समितीकडे हस्तांतरीत

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील तमाम शिवसैनिकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी शिवाजी पार्क जवळील मुंबई महापालिकेच्या महापौर निवासस्थानाची कागदपत्रे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्मारक समितीचे अध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. नियोजित शिवसेनाप्रमुखांचे स्मारक अंडरग्राऊंड अर्थात जमिनीखाली दोन मजल्याचे उभारण्यात येणार आहे.

महापौर बंगला हा सीआरझेड-२ खाली आणि हेरिटेजमध्ये येत असल्याने सदर बंगल्याच्या इमारतीच्या ढाच्याला पाडता किंवा त्यात बदल करता येत नाही. त्यामुळे या मुख्य इमारतीच्या जमिनीखाली २ मीटर उंचीचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकामध्ये प्रामुख्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वापरलेल्या वस्तुंचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. तसेच त्यांची काही निवडक व्यंगचित्रांचे दालन असणार असून थ्रीडी इफेक्टमधील बाळासाहेबांचे चलचित्रही याठिकाणी पाहता येणार आहेत. याशिवाय समाज जागृतीसाठी विविध नाट्यकला सादर करणाऱ्या कलाकारांसाठी खुला रंगमंचही उभारण्यात येणार आहे. तसेच बाळासाहेब हे स्वत: व्यंगचित्रकार असल्याने उभारत्या चित्रकारांसाठी शिवसेनाप्रमुखांच्या नावे एक दालनही उभारण्यात येणार आहे.

स्मारक उभारणीची प्रामुख्याने जबाबदारी अनिल पाटील आणि आबा लांबा यांच्यावर राहणार असून त्यांनी तयार केलेल्या आराखड्यास मंजूरीही देण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीचे प्रमुख उध्दव ठाकरे हे असून त्यांच्या नेतृत्वाखालील स्मारक समितीच्या सदस्य सचिव पदी सुभाष देसाई हे आहेत. तर सदस्य पदी भाजपच्या खासदार पूनम महाजन, शिवसेना नेते आदीत्य ठाकरे, वास्तु शास्त्रज्ञ शशी प्रभू, राज्याचे मुख्य सचिव, महापालिका आयुक्त, नगरविकास सचिव आणि विधी व न्याय विभागाचे पदसिध्द सचिव सदस्य पदी राहणार आहेत.     

Check Also

ऐन निवडणूकीच्या धामधुमित सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारातील काँग्रेस आणि भाजपामधील आरोपा प्रत्यारोपामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *