Breaking News

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीवरून विरोधकांचे रणकंदन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब: राजदंड पळविला

नागपूर : प्रतिनिधी

अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची कमी करून त्याऐवजी त्यांच्या तलवारीची उंची वाढविण्याची योजना राज्य सरकारची असल्याची सत्य माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे. त्यामुळे पुतळ्याची उंची कमी करण्याचा कोणताही अधिकार राज्य सरकारला नसल्याचा टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करत याप्रकरणी सरकारने खुलासा करण्याची मागणी विधानसभेत केली. नेमक्या त्याचवेळी भाजपचे अतुल भातखळकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत हा काय भलतच काय महाराजांबद्दलचे वक्तव्य करत असले फालतू मुद्दे उपस्थित करू नका अशी टीका केली. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शशिकांत शिंदे, काँग्रेसचे अब्दुल सत्तार, विजय बांभळे यांनी राजदंड पळविला.

त्यामुळे सभागृहात विरोधी बाकावरील सर्व सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा होत सरकार पुतळ्याची उंची जाणून बुजून कमी करत असल्याचा आरोप करत सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली. विरोधकांच्या या गोंधळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुतळ्याची उंची कमी करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून पूर्वी फक्त त्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. तसेच त्यास अद्याप कोणतीही मंजूरी दिली नसल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. याच कालावधीत सत्ताधारी बाकावरील सर्व सदस्यही अध्यक्षांकडील मोकळ्या जागेकडे धावत विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी करू लागले.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी हे सत्तेतील लोक हे मनुवादी विचारांचे असल्यानेच त्यांच्याकडून अशा पध्दतीचे राजकारण करण्यात येत आहे. त्यामुळेच या सरकारने पुतळ्याची ची वाढविण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप करत सरकार महाराजांबद्दल जाणीवपूर्वक अशा पध्दतीचा निर्णय घेत आहे. त्यामुळे सरकारने आपला निर्णय बदलावा असे आवाहनही त्यांनी केले.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार यांच्या शब्दावर हरकत घेत त्यांनी वापरलेला मनुवादी शब्द कामकाजातून काढून टाकावा अशी मागणी केली. याच कालावधीत सभागृहात मोठ्या प्रमाणावर गोंधळ वाढल्याने सभागृहाचे कामकाज १५ मिनिटासाठी तहकूब केले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *