Breaking News

लक्षवेधी आंबेडकर-शिंदे लढतीसह चव्हाण, निंबाळकर-पाटील यांचे भवितव्य पणाला दुसऱ्या टप्प्यातील १० जागांसाठी गुरूवारी मतदान

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील लक्षवेधी लढत ठरणार असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित आघाडीचे अँड. प्रकाश आंबेडकर विरूध्द सुशीलकुमार शिंदे यांच्यासह नांदेडमधील अशोक चव्हाण, बीडमधील प्रितम मुंडे आणि उस्मानाबाद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजीतसिंह आणि ओमराजे निंबाळकर यांचे भवितव्य उद्या गुरूवारी ईव्हीईएम मशिन्समध्ये बंद होणार आहे. या चारही मतदारसंघातील निवडणूका अटीतटीचे होणार असल्याने या सर्व उमेदवारांचे भवितव्य पणाला लागणार आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपच्या शरद बनसोडे यांना ५ लाखाहून अधिक मतदान मिळाले होते. तर काँग्रेसचे नेते सुशिलकुमार शिंदे यांना २००९ आणि २०१४ च्या निवडणूकीत ३ लाख २५ ते ५० हजार मतदान मिळाले होते. मात्र यंदा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अँड.प्रकाश आंबेडकर हे उभे राहील्याने शिंदे यांना मिळणाऱ्या दलित आणि मुस्लिम समाजाच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणावर फुट पडणार आहे. तसेच पद्मशाली समाज, लिंगायत, मराठा, धनगर, माळी समाजाची मतेही मागील खेपेला भाजपकडे वळाली होती. यंदा ती वंचित आघाडीकडे फिरणार की काँग्रेसकडे येणार याबाबत कोणीही ठामपणे सांगू शकत नसल्याने सध्यातरी शिंदे-आंबेडकर लढतीचा फायदा भाजपच्या जय सिध्देश्वर महाराज यांना होणार असल्याचे सोलापूरात बोलले जात आहे.

तर बीड लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला भाजपच्या विद्यमान खा.प्रितम मुंडे यांचा विजय एकतर्फी मानला जात होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या प्रचाराची धुरा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी समर्थपणे हाताळली असल्याने मुंडे यांची दमछाक होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच गतवेळच्या निवडणूकीच्या तुलनेत यंदा मुंडे यांच्या मताधिक्यातही मोठ्या प्रमाणावर घट होणार असल्याचे बोलले जात आहेत.

तर मराठवाड्यातील नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विरोधात भाजपकडून प्रतापराव चिखलीकर हे उभे आहेत. चव्हाण यांच्या पराभवासाठी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेते नांदेडमध्ये सातत्याने सभा घेत आहेत. त्यामुळे चव्हाण हे चांगलेच जेरीस आले असून त्यांच्या मताधिक्यात मोठ्या प्रमाणावर घट होणार असल्याचे बोलले जात आहे.

यापाठोपाठ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पद्मसिंह पाटील यांच्या मुलाला राणा जगजीतसिंह यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून पद्मसिंहाचे एकेकाळचे कट्टर विरोधक पवनराजे निंबाळकर यांचे सुपुत्र ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघातून विद्यमान खा. प्रा.रवी गायकवाड यांना उमेदवारी नाकारत निंबाळकर यांना तिकिट देण्यात आले आहे. त्याचा राग मनात धरून गायकवाड यांनी निंबाळकर यांच्याच विरोधात अब्रु नुकसानीची पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे निंबाळकर यांना पक्षांतर्गत विरोधकांसह पद्मसिंह पाटील यांच्या राजकिय वर्चस्वाविरोधात लढावे लागणार असल्याने ही लढतही लक्षवेधी लढत ठरणार आहे.

या दुसऱ्या टप्प्यात १० मतदारसंघातील १ कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील.  या टप्प्यात एकूण १७९ उमेदवार असून २० हजार ७१६ मतदान केंद्र आहेत; तर त्यापैकी सुमारे २१०० मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट होणार आहे.

या टप्प्यातील सर्वाधिक ३६ उमेदवार बीड मतदार संघात असून सर्वात कमी १० उमेदवार लातूर मतदार संघात आहेत. याव्यतिरिक्त बुलढाणा १२ उमेदवार, अकोला ११ उमेदवार, अमरावती २४ उमेदवार,  हिंगोली २८ उमेदवार, नांदेड १४ उमेदवार, परभणी १७ उमेदवार, उस्मानाबाद १४ उमेदवार आणि सोलापूर मतदारसंघात १३ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

दुसऱ्या टप्प्यात मतदान होणारे मतदार संघ : बुलढाणा- १९७९ मतदान केंद्र (एकूण मतदार १७ लाख ५९ हजार), अकोला – २०८५ मतदान केंद्र (एकूण मतदार १८ लाख ६१ हजार), अमरावती – २००० मतदान केंद्र, (एकूण मतदार १८ लाख ३० हजार), हिंगोली- १९९७ मतदान केंद्र (एकूण मतदार १७ लाख ३२ हजार), नांदेड -२०२८ मतदान केंद्र (एकूण मतदार १७ लाख १८ हजार), परभणी -२१७४ मतदान केंद्र (एकूण मतदार १९ लाख ८४ हजार), बीड – २३२५ मतदान केंद्र (एकूण मतदार २० लाख ४१ हजार), उस्मानाबाद – २१२७ मतदान केंद्र (एकूण मतदार १८ लाख ८६ हजार), लातूर -२०७५ मतदान केंद्र (एकूण मतदार १८ लाख ८३ हजार), सोलापूर -१९२६ मतदान केंद्र (एकूण मतदार १८ लाख ५० हजार).

Check Also

सुनिल तटकरे आणि सुनेत्रा अजित पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार…

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता रायगड लोकसभेचे उमेदवार सुनिल तटकरे आणि बारामती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *