Breaking News

भाजपाबाबतची शरद पवारांची भविष्यवाणी अखेर झाली खरी तीन राज्यातील दारूण पराभव होणार असल्याचे भाकित

मुंबई: प्रतिनिधी

देशातील पश्चिम बंगाल, तामीळनाडू, केरळ, पाँडीचरी, आसाम राज्याच्या विधानसभा निवडणूकांची घोषणा झाल्यानंतर या पाचही राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली. त्यानंतर अवघ्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बारामती येथील पत्रकार परिषदेत बोलताना पश्चिम बंगाल, केरळ आणि तामीळनाडू राज्यात भाजपाचा दारूण पराभव होणार असल्याचे भाकित केले होते. त्यानुसार तामीळनाडूत, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये आकाळ पाताळ एक करून भाजपाने विजय आपलाच असल्याचे जाहिर केले. परंतु पश्चिम बंगालमध्ये गतवर्षीच्या तुलनेत वाढीव जागा भाजपाला मिळाल्या असल्या तरी त्यांना सत्ता स्थापनेच्या जवळही जाता आले नाही. त्यामुळे शरद पवार यांनी १४ मार्च २०२१ रोजी केलेले भाकित खरे ठरल्याचे दिसून येत आहे.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची अर्थात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सत्ता उखडून टाकू असा चंग बांधत भाजपा नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा प्रदेशाध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री कार्यकर्त्ये पश्चिम बंगालमध्ये धडकले होते. तसेच २०० च्या पार जागा मिळविणार असल्याचे भाकित केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले होते. मात्र भाजपाला ८० जागांचा अर्थात दोन अंकी संख्येचा आकडाही पार करता आला नाही. त्या उलट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने २१० हून अधिक जागांवर आघाडी घेतली असून त्यांचीच सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले.

तर केरळ राज्यात भाजपाने डाव्यांच्या विरोधात आकाश पाताळ एक करत हिंदू विरूध्द ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदाय असा सामना तयार करण्याचा प्रयत्न केला. या राज्यातही भाजपाने डाव्यांना सत्तेतून पाय उतार करण्याची भाषा केली होती. मात्र गतवेळी भाजपाला या राज्यात १ जागा मिळाली होती. मात्र संध्याकाळी वृत्तांकन करे पर्यत सुरुवातीला ३ जागांवर आघाडीवर असलेल्या भाजपाला पुन्हा शुन्यावर यावे लागल्याचे दिसले. तर विद्यमान डाव्या पक्षांच्या आघाडीला १०० हून अधिक जागांवर आघाडी असल्याने सलग दुसऱ्यांदा डाव्यांना सत्ता मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तामीळनाडूमध्ये स्व. जयललिता यांच्या अण्णा द्रमुक पक्षाच्या मदतीन तामीळनाडूत सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथील जनतेने द्रमुक नेते स्टॅलिन यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवित १५० हून अधिक जागांवर आघाडी दिली आहे. त्यामुळे निर्विवाद बहुमत द्रमुकला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पाँडीचरीत मात्र काँग्रेसच्या सत्तेला धक्का बसला असून तेथे सर्वाधिक जागांवर भाजपाला आघाडी आहे. तर आसममध्ये गतवेळीप्रमाणे भाजपाने आपला गड राखत पुन्हा एकदा काँग्रेसला सत्तेपासून दूर रोखण्यात यशस्वी ठरला आहे.

त्यामुळे भाजपाने गतवेळच्या तुलनेत जर पश्चिम बंगालमध्ये जास्तीच्या जागा मिळाल्या असल्या तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपाला चांगलीच लढत देत २१० हून अधिक जागा जिंकत भाजपाला धोबीपछाड दिली.

Check Also

“आदित्य ठाकरे मुख्यमंत्री” उद्धव ठाकरे -देवेंद्र फडणवीस आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीत

महाराष्ट्रासह देशात लोकसभा निवडणूका जाहिर होऊन पहिल्या टप्प्यातील मतदानही पार पडले. या मतदानानंतर आता दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *