Breaking News

पवार म्हणाले, “सत्ताधारी नेत्याने सांगितले जालियनवालाचा उल्लेख केल्याने पाहुणचार” भाजपातेर पक्षांनी एकत्र येवून लखीमपूरप्रश्नी विरोध करण्याची गरज

सोलापूर : प्रतिनिधी

अजित पवार यांच्या घरी सरकारी पाहुणे आलेत. पण आपणाला सरकारी पाहुण्यांची कधी चिंता नसते. त्यामुळे त्याची चिंता करण्याचे कारण नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगत त्या दिवशी मला दिल्लीत सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, तुम्ही जालियनवाला हत्याकांडाचा उल्लेख केलात. ते काही रूचले नाही आणि तुमच्याकडे पाहुणचार झाला असा गौप्यस्फोट ही त्यांनी केला. त्याचबरोबर तुम्ही छापा मारा नाहीतर काहीही करा पण मी माझं मत सोडणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

सोलापूर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात शरद पवार बोलत होते. यावेळी स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित होते.

लोकशाहीमध्ये एखाद्या प्रश्नावर मत मांडायचा अधिकार आहे की नाही? आणि लोकशाहीत मत माडलं म्हणून तुम्ही घरांवर अशा पद्धतीने आणि ते देखील कुणाच्या बाया-बापड्याच्या, मुलींच्या ज्यांचा संबंध नाही. त्यांच्या घरावर तुम्ही छापे मारणार असाल, तर ठीक आहे तुम्ही मारा.. त्याची चिंता नाही. पण, हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, जिजामातेचा महाराष्ट्र आहे. सावित्राबाईंचा महाराष्ट्र आहे. आहिल्याबाईंचा महाराष्ट्र आहे. इथे आमची भगिनी कधीही लाचार होणार नाही. तुम्ही छापा मारा नाहीतर काही वाटेल ते करा पण आपलं मत कधी सोडणार नाही असा निर्धार व्यक्त करत सामान्य माणसांची बांधिलकी कदापी सोडणार नाही, या निष्कर्षाशी आपण सगळेजण आहोत असेही ते म्हणाले.

दिल्लीवरून महाविकासाघाडी सरकारला विविध गोष्टींवरून रोज त्रास दिला जातोय. आज या ठिकाणी सरकार सुरू आहे, हे आघाडीचं सरकार आहे. सगळ्यांना घेऊन चालेलं आहे. आघाडीचं सरकार असून देखील कुणी काहीही म्हटलं तरी अत्यंत समंजसपणाने काम करत आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अतिवृष्टी झाली पहिला हप्ता देण्यासाठी ३६० कोटी रुपये काल दिलेत, आणखी दिले जाणार आहेत. शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढायचं आहे. त्याच्या भल्यासाठी सरकार आहे, ही भूमिका असताना दिल्लीवरून या सरकारला अनेक गोष्टींवरून रोज त्रास दिला जात असल्याचा आरोप करत केंद्रावर टीका केली.

मी आवाहन करतो की, महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी मिळून शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या भाजपा सरकारचा निषेध केला पाहिजे. ११ ऑक्टोबर रोजी या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारला आहे. हा बंद आपण यशस्वी केला पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांना शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही. लखीमपुर खीरी इथे आठ लोक मारले गेले. तुमच्या हातात सत्ता दिली ती लोकांचे भले करण्यासाठी, मात्र याचे विस्मरण भाजपाला पडले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचे पाप भाजपाने केले. याबद्दल देशभरात संताप आहे. भाजपाची आर्थिक नीती महागाईला निमंत्रण देणारी आहे. अशा राज्यकर्त्यां विरोधात जनमानस निर्माण करण्याचे काम विरोधी पक्षाला करावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता सामान्य लोकांच्या हितासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *