Breaking News

देशमुखांवरील कारवाई आणि भाजपातेर आघाडीबद्दल काय म्हणाले शरद पवार? पवारांच्या उपस्थितीत पुण्यात सुबोध मोहिते यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई-पुणे: प्रतिनिधी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई, नागपूर येथील पाच घरांवर ईडीने छापे टाकले. या ठिकाणी ईडीनं शोधसत्र सुरू केले. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे काय बोलणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता असतानाच पवार म्हणाले की, केंद्रीय यंत्रणांना आलेल्या नैराश्यातून ही कारवाई सुरू असून आम्हाला त्याची यत्किंचितही चिंता वाटत नाही.

पुण्यामध्ये नुकत्याच उद्घाटन करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये सुबोध मोहिते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

ईडी वगैरे आम्हाला काही नवीन नाहीत. अनिल देशमुख काही पहिले नाहीत. अनेकदा सत्तेचा या पद्धतीने वापर करण्याचा पायंडा आत्ताच्या राज्यकर्त्यांनी दाखवला आहे. त्याची आम्हाला यत्किंचितही चिंता वाटत नाही. अनिल देशमुखांवर केंद्र सरकारच्या काही यंत्रणांनी याआधीही कारवाई केली होती. पण त्यातून त्यांना काय हाती लागले हे मला माहिती नाही. माझ्यामते काहीही हाती लागलं नाही. त्या नैराश्यातूनच अजून कुठून त्रास देता येईल का? या विचारातून हा त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे. त्याची चिंता करण्याचं आम्हाला काही कारण नसल्याचे ते म्हणाले.

जो विचार आपल्याला मान्य नाही तो विचार दडपण्याचा प्रयत्न या प्रकारच्या यंत्रणा वापरून केला जातो. हे काही नवीन नाही. अनेक राज्यांमध्ये देखील आणि महाराष्ट्रात देखील यापूर्वी आपण कधी हे पाहिलं नव्हतं. केंद्राची सत्ता यांच्या हातात आल्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी पाहायला लागलो. मला वाटतं याचा काही परिणाम होणार नाही. लोक देखील त्याची गांभीर्याने नोंद घेत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांना काँग्रेसनं घेतलेल्या स्वबळाच्या भूमिकेविषयी विचारले असता त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेचं स्वागतच करत प्रत्येक राजकीय पक्षाला स्वत:ची संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. त्याबद्दल आमची काहीच तक्रार नाही. आपल्या कार्यकर्त्यांची उमेद वाढावी यासाठी आम्ही सगळेच बोलत असतो. त्यासाठी काँग्रेस असे काही प्रयत्न करत असेल, तर त्यांचं आम्ही स्वागत करतो, हा प्रयत्न त्यांनी अवश्य करावा असा सल्लाही त्यांनी यावेळी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिला.

शरद पवारांच्या दिल्ली निवासस्थानी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीची मोठी चर्चा दिसून आली. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता ते म्हणाले की, २२ जून रोजी झालेल्या या बैठकीमध्ये राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र, या बैठकीत बिगर भाजपा आघाडीची चर्चा झाली नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी सांगितले. आज देशात जे राजकीय, आर्थिक व सामाजिक वातावरण बनले आहे, त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी राष्ट्रमंचाची काय भूमिका असेल. यावर सर्वांचे मत घेण्यात आलं आहे. यामध्ये काही अराजकीय व्यक्ती देखील सहभागी होते. जावेद अख्तर, न्यायमूर्ती एपी शहा यांनी देखील आपलं मत मांडलं. म्हणून हा काही राजकीय कार्यक्रम नव्हता. ज्याचा चुकीच्या पद्धतीने प्रचार करणं उचित ठरणार नाही.

आघाडीसाठी आम्ही काही आत्ता बसलेलो नाही. त्यासाठी चर्चाही केलेली नाही. पण पर्यायी आघाडी उभी करायची असेल तर काँग्रेसला सोबत घेऊनच करावी लागले. हीच भूमिका मी त्या बैठकीत मांडली. देशात आज लोकांना काही पर्याय असावा अशी जनतेची भावना आहे. ही लोकेच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी राजकीय नेतृत्वाची असते. ती आम्हाला निश्चितपणे करावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आघाडीची चर्चाच केली नसल्यामुळे नेतृत्वावरही चर्चा केलेली नाही. पण सामुदायिक नेतृत्व हेच सूत्र पुढे ठेऊन आम्हाला पुढे जावं लागेल. मी फार वर्ष असले उद्योग केले आहेत. त्यामुळे सध्या यामध्ये पडायचं नाही. त्यांना मार्गदर्शन करणं, शक्ती देणं, मदत करणं, त्यांना एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत बिगर भाजपा आघाडीचे नेतृत्व करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या पोस्टवर भाजपाच्या कंगणा राणौतची सावध भूमिका

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कंगना राणौतची आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर वाद सुरू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *