Breaking News

भाजपा-शिवसेनेचे शेवटच्या २४ पैकी २३ तास झाले तरी काहीही घडेल राष्ट्रवादी काँग्रेसच सर्वेसर्वा शरद पवार यांचे स्पष्ट संकेत

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणूकीत जनतेने भाजपा-शिवसेनेच्या पारड्यात मतांचे पारडे टाकले आहे. तरीही त्यांच्याकडून अद्याप सरकार स्थापन केले जात नाही. मात्र त्यांना दिलेल्या मुदतीतील २४ तासापैकी २३ तास झालेले असतील तरी त्या शेवटच्या तासात कोणता तरी मार्ग निघेल अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त करत राज्यातील संभाव्य राजकिय घडामोडीत काहीही घडू शकते असे स्पष्ट संकेत दिले.
नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुनिल तटकरे, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, नवाब मलिक आदी उपस्थित होते.
राज्याच्या जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे. आमचे संख्याबळ नसल्याने आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही. सरकार स्थापन करण्याइतपत संख्याबळ मिळाले असते तर आम्ही इतका वेळ घालविला नसल्याचा टोला भाजपाला मारला. आम्हाला विरोधकाची संधी दिली असली तरी मात्र भाजपा-शिवसेनेकडून आम्हाला ती संधीच पार पाडू दिली जात नसल्याची मिश्किल टिपण्णीही त्यांनी केली.
शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा देवून सरकार स्थापन करणार का? असा सवाल उपस्थित केला असता ते म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करुन निवडणूक लढवली असल्याने निर्णय मिळूनच घेणार आहोत. मात्र शिवसेनेला आधी भाजपासोबतची युती तोडावी लागेल. त्यानंतर आम्ही स्पष्ट भूमिका घेवू असे ते म्हणाले.
भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यास ते पाडणार का असा सवाल पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले की, आधी त्यांना सरकार तरी स्थापन करू द्या अशी मिश्किल टोलाही त्यांनी लगावला.
सेना – भाजप २५ वर्षाची युती आहे. त्यामुळे ते एकमेकांशिवाय राहणार नसल्याची माहिती मला कोणीतरी सांगितली आहे. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी युतीमध्ये २५ वर्षे सडल्याचे वक्तव्य मागे केल्याबाबत आठवण पवारांना करून दिली असता ते म्हणाले की, ते युतीमध्ये सडली असं म्हणाले तरी ते युती करुन लढले असा टोलाही त्यांनी लगावला.
दिल्लीत पोलिसांना जी वागणुक मिळाली आहे, त्याबद्दल खंत व्यक्त करतानाच युनिफॉर्ममध्ये असलेल्या व्यक्तींवर हल्ला होतो. म्हणजे संरक्षण करणारी यंत्रणा संकटात येते आहे हे स्पष्ट होत आहे. राज्यात व देशात पोलिसांची अवस्था सध्या गंभीर आहे. पोलिसांना २४- २४ तास ड्युटी करावी लागते. कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे जर कोसळले तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. पोलिसांना दिल्लीतील नागरीकांनी पाठींबा दिला होता. त्याबद्दल दिल्लीच्या नागरीकांचे आभार व त्यांची भूमिका कौतुकास्पद असल्याचे सांगत दिल्लीतील पोलिस दल हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या गृह विभागाकडे येत असल्याचे सांगत या गोष्टीकडे केंद्राने गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी मांडले.
दिल्ली ही देशाची राजधानी असल्याने तेथे प्रत्येक घटना जगभरात पोहोचते. या घडलेल्या घटनेमुळे देशाच्या प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो. त्यामुळे अशा घटनांबाबत काळजी घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
अयोध्या प्रकरणाचा निर्णय ६ नोव्हेंबरला लागणार होता. पण आता तो दिवस पुढे ढकल्यात आल्याने कुठला दिवस ठरेल तो ठरेल. परंतु कुठल्याही समाजघटकांनी आपल्या विरोधात निर्णय आहे असं वाटून घेवू नये असे आवाहन करत प्रत्येकांनी कायदा व सुव्यवस्था राखली जाईल याची खबरदारी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.
पटेल रस्ता बांधण्यासंदर्भात भेटले असतील
काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकिय सल्लागार अहमद पटेल हे केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते नितीन गडकरी यांची दिल्लीत भेटल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, गडकरी यांच्याकडे गेल्यावर फक्त रस्ते बांधणीचे काम होते. त्यामुळे ते रस्त्याच्या संदर्भातच त्यांच्या भेटीसाठी गेले असतील. त्यामुळे त्यांच्या भेटीचा वेगळा राजकिय अर्थ काही असेल मला तरी वाटत नाही.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *