Breaking News

या सरकारचं आता फार झालं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची टीका

नाशिकः प्रतिनिधी
या सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत नाही … मुलाबाळांच्या भवितव्याचा विचार नाही. बळीराजाला सन्मानाने जगण्याची संधी भाजप सरकार देत नाही.या सरकारचं आता फार झालं… अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारबद्दल संताप व्यक्त केला.
महाआघाडीचे नाशिकचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ त्यावेळी ते बोलत होते. या जाहीर सभेला शरद पवार यांच्याबरोबरच, माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी, उमेदवार समीर भुजबळ, काँग्रेसचे नेते आणि माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, नाशिकचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब पगार आदींसह महाआघाडीचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी शरद पवार यांनी मोदी आणि त्यांच्या सरकारवर तोफ डागली. या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आस्था राहिलेली नाही असे सांगतानाच मनमोहनसिंग यांच्या काळात आणि मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कशी वागणूक दिली जात आहे आणि त्यावेळी कशी दिली जात होती. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात शेती आणि शेतकऱ्यांना प्राधान्य होते. परंतु, आता प्राधान्य दिले जात नाही. पिकांना दिल्या गेलेल्या भाववाढीची आकडेवारी सांगून मोदी कसे ढोल बडवत आहेत. परंतु आमच्या काळात आम्ही करुन दाखवत होतो असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला.
मोदी जातील तिकडे हे मी केलं, ते मी केलं सांगत आहेत. सर्जिकल स्ट्राईक जवानांनी केलं. परंतु ५६ इंचाची छाती सांगत आहे मी केलं अहो तुम्ही काय केलं. जे केलं ते आपल्या जवानांनी केलं. दुसरीकडे आपला जवान अभिनंदन यालाही सोडवून आणलं सांगत आहेत. मग पाकच्या तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधवला का सोडवून आणत नाही. त्यावेळी कुठाय तुमची ५६ इंचाची छाती असा संतप्त सवालही त्यांनी केला.
मोदी महाराष्ट्रात सभेला आले त्यावेळी वर्धा, गोंदिया, नांदेड या तीन सभेत माझ्यावर टिका केली आणि लातुरात चुकीच्या जागी गेले असं वक्तव्य केले. तीन ठिकाणी टोकाची टिका केली. त्यामध्ये माझ्या कुटुंबावर टिका केली. माझे भाऊ, बहिणी आणि त्यांची मुलं, नातवंडं सगळी आपापल्या ठिकाणी मस्त आहेत. दरवेळी आम्ही कुटुंब एकत्र येतो आणि आहोत. परंतु मोदी यांचं वेगळं आहे. अहो यांचं कुटुंबच नाही. त्यांना कुटुंबाचा अनुभव कसा मिळणार आणि कळणार असा टोला लगावतानाच मोदींना देशाच्या प्रश्नांची नाही माझ्या कुटुंबाची जास्त काळजी पडलीय अशी जोरदार टिकाही त्यांनी केली.
शेती खातं असतानाचा नाशिकच्या कांद्याची परिस्थिती अवघड होती. त्यावेळी कांदा निर्यात करण्याबाबतचा निर्णय घेतला होता. मला अर्थशास्त्र समजून घेण्याची माहिती नाशिकच्या शेतकऱ्यांकडून नेहमीच मिळत आली आहे असा अनुभवही नाशिकबाबत शरद पवार यांनी सांगितला.
बाबाहो, लोकांनी पाच वर्ष चुकुन संधी दिली. कारण तुम्ही काही तरी कराल असं जनतेला वाटलं होतं म्हणून परंतु आता सर्वांनी तुम्ही दिलेल्या संधीचं काय केलात हे बघितलं आहे. त्यामुळे लोकं पुन्हा संधी देतील असं वाटत नाही. नेहरु, गांधी व माझ्यावर टिका करुन काही होणार नाही हे लक्षात घ्या असा निर्वाणीचा इशाराही शरद पवार यांनी भाजपला दिला.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *