Breaking News

शरद पवारांच्या पुलोदची पुनःरावृत्ती की मराठेशाहीतील फंदफितुरीची परंपरा ? विधानसभेत दिसणार राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा

साधारणतः १९७८ साली राज्यातील मुख्यमंत्री स्व.वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार पाडत त्यावेळचे काँग्रेस नेते शरद पवार यांनी समाजवादी पक्ष, जनसंघ सारख्या पक्षांना सोबत घेत पुरोगामी लोकशाही दलाचा प्रयोग करत नवे सरकार स्थापन केले होते. त्यास जवळपास ४१ वर्षे झाली. नेमक्या त्याच पध्दतीची राजकिय परिस्थिती राज्याच्या राजकारणात दिसून येत असून यावेळी शरद पवार यांच्याऐवजी त्यांचे पुतणे अजित पवार हे या प्रयोगाचे नेतृत्व करत असल्याचे दिसून येत आहे.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली शिकाँरा अर्थात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु आहेत. या सरकार स्थापनेस राष्ट्रवादीचेच नेते तसेच त्यांचे पुतणे अजित पवार यांचा विरोध होता अशी चर्चा होती. त्यामुळेच अजित पवार यांनी आपल्या काकांना सोडून स्वतंत्रपणे भाजपाच्या देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
पुलोदच्या प्रयोगामुळे राज्यासह देशात सर्वात तरूण मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांचे नाव झाले. तसेच त्यांचा राज्याचा नवा उमदा नेता म्हणून उदयही झाला. आता तोच प्रयोग पुन्हा अजित पवारांच्या रूपाने पाह्यला मिळत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्याचे नेतृत्व म्हणून चित्र निर्माण झाले आहे.
वास्तविक पाहता देशाच्या राजकारणात शरद पवारांचे राजकारण हे बेभरवशाचे आणि अविश्वासाचे असल्याचे मत आहे. नेमके त्याच पध्दतीचे राजकारण त्यांच्याच पुतण्याकडून करण्यात आल्याने नेमके यामागे दस्तुरखुद्द शरद पवार हे तर नाही ना? अशी अटकळ राजकिय वर्तुळात बांधण्यात येत आहे.
१६ व्या आणि १७ व्या शतकात राज्यात मराठेशाही असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांना मराठा साम्राज्यात फंदफितुरी आणि विश्वासघाताला अनेकवेळा सामोरे जावे लागले होते. याच फंदफितुरीतून संभाजीराजांना मुघल बादशाह औरंगजेबाच्या ताब्यात देण्यात आले होते. याशिवाय पानीपतची लढाई असो अथवा पेशवाई असो यासर्वांनाच फंदीफितुरीने ग्रासले होते.
आता २१ व्या शतकात राज्याचे जाणता राजा म्हणून शरद पवार यांचा उल्लेख केला जातो. तसेच मराठा स्ट्रॉंगमॅन म्हणूनही ओळखले जाते. तसेच मराठा समाजाची संपूर्ण मते पवारांच्या भूमिकेवर फिरतात. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मराठा समाजाचे महत्व आणि शरद पवारांची भूमिका महत्वाची मानली जाते.
आतापर्यंत पवारांच्या राजकिय आणि सामाजिक महत्वामुळे त्यांना अंगावर घेणे कुणालाही शक्य झाले नव्हते. तसेच राज्याबाहेरील विशेषतः दिल्लीतील नेत्यांनाही त्यांना नियंत्रित करणे शक्य झाले नाही. अजित पवारांच्या बंडाला राष्ट्रवादीतून कितीसा पाठिंबा आहे. याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी त्याचे चित्र ३० नोव्हेंबर २०१९ रोजी राज्याच्या विधानसभेत दिसणार असून त्यादिवशी भाजपाचे देवेंद्र सरकार राष्ट्रवादीमुळे पडणार की तरणार हे पहावे लागणार आहे.
मराठेशाहीत जशी घराण्यातील फंदफितुरीमुळे राज्याचे नेतृत्व करणाऱ्याला पराभूत व्हावे लागले. त्याच पध्दतीने शरद पवारांच्या समोर त्यांच्याच घरातील अजित पवारांच्या रूपाने फंदफितुरी निर्माण झाली आहे. त्यामुळे ही फंदफितुरी शरद पवारांचा अस्त आणि अजित पवारांचा स्वतंत्र नेता म्हणून उदय होणारी ठरणार की परंपरागत मराठेशाहीचा फंद फितुरीचा शाप ठरणार याचे उत्तर आगामी भविष्यकाळातच मिळणार आहे.

गिरिराज सावंत

Check Also

देशातील तरूणाईच्या रोजगाराबाबत चिंताजनक स्थिती

भारतातील तरुणांच्या रोजगाराची सद्यस्थिती आणि दृष्टीकोन यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अलीकडील अहवालात देशाच्या व्यापकपणे बोलल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *