Breaking News

इंग्रजांशी जवळीक वाढवल्याने अहिल्याबाईंनी पेशव्यांना खडसावलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी दिली करून दिली इतिहासाची आठवण

जेजूरी : प्रतिनिधी

अहिल्याबाई होळकर या जागतिक ओळख असणाऱ्या स्त्रीयांपैकी एक होत्या. त्यांची तुलना रशियाची आणि ब्रिटनची राणी यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत   पेशव्यांनी इंग्रजांशी जवळीक वाढवल्यानंतर अहिल्यादेवींनी पेशव्यांनाही खडसावल्याची इतिहासातील घटनेची आठवण करुन दिली. तसेच अहिल्यादेवी जागतिक स्तरावर छाप सोडणाऱ्या महिला राज्यकर्त्या असल्याचं पवारांनी यावेळी आवर्जून सांगितले.

जेजरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी धनगर समाजातील अनेक नेते उपस्थित होते.

महाराष्ट्रात पहिला आंतरजातीय विवाह छत्रपती शाहू महाराजांनी लावला. शाहू महाराजांनी आपल्या बहिणीचा होळकर कुटुंबात विवाह लावला. आज मात्र समाजात जातीय विषमता निर्माण झालीय. ती दूर करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचे नमूद करत ते पुढे म्हणाले की, एका ऐतिहासिक कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र आलोय. अहिल्यादेवींनी इतिहास घडवून स्त्री शक्तीचं महत्व समाजाला दाखवलं. त्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातले लोक श्रद्धेने येथे येतात. या प्रांगणात येणाऱ्या प्रत्येकाला हा पुतळा प्रेरणा देईल. हा परिसर व्यवस्थित करण्यासाठी माजी-आजी आमदारांनी प्रयत्न केले. अनेक कामे जेजुरीत होतायत. हा परिसर अनेक दृष्टीने चांगला होतोय या गोष्टीचा आनंद वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

जामखेड तालुक्यातील चोंडीला अहिल्याबाई यांचा जन्म झाला. त्यांचे वडील माणकोजीराव शिंदे यांनी मुलींना शिकवण्याचं काम केलं. मल्हारराव होळकर एकदा चोंडीला थांबले. त्यांनी चुणचुणीत मुलगी बागडताना पाहिली. त्यांनी आपले चिरंजीव खंडेराव यांच्यासाठी तिची निवड केली आणि सून म्हणून आणलं. दुर्दैवाने खंडेराव यांना लढाईत मृत्यू आला. मल्हारराव होळकर यांनी सती जायची पद्धत असताना सती न जाण्याचा आग्रह धरला. अहिल्याबाई यांनी प्रांताची जबाबदारी घेतली. इंग्रजी राजवटीशी संघर्ष केला. पेशव्यांनी इंग्रजांशी जवळीक वाढल्यानंतर त्यांनी त्यांना खडसावलं. महेश्वर, इंदौर ही शहरे त्यांनी उत्तम बनवण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्राची जबाबदारी असताना मी ५० टक्के महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. अनेकांना ते आवडलं नाही. त्यावेळी एकच उत्तर दिलं. पंडित जवाहरलाल नेहरुंनंतर इंदिरा गांधींनी देशाला ओळख मिळवून दिली. कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांकडे नाही. आपल्याला समाज उभा करायचाय. स्त्री आणि पुरुष एकत्र करुन अहिल्याबाईंचा आदर्श समोर ठेवून वाटचाल केली पाहिजे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

अहिल्याबाईंची ओळख त्या काळात केवळ देशात नव्हती, तर जगभरात होती. त्यांची तुलना रशियाची राणी, ब्रिटेनच्या राणीशी करण्यात आली. जगातील कर्तुत्ववान स्त्रीयांपैकी अहिल्याबाई होत्या. इंग्लिश लेखकाने त्यांचं हे मोठेपण अधोरेखित केलं. अहिल्याबाईंनी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय दिला, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केलं. अहिल्याबाईंनी जेजुरीच्या खंडेरायच्या परिसराला विकसित करण्याचं काम केलं. त्यांनी हातातील सत्तेचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी केला. २० वर्षांपूर्वी उमाजी नाईक पुतळ्याचं उद्घाटन आपण केलं. आज अहिल्याबाई होळकर यांचा पुतळ्याचं उदघाटन ही सन्मानाची बाब असल्याचे त्यांनी आवर्तून नमूद केले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *