Breaking News

पूरग्रस्त भागातील दौऱ्यावरून शरद पवारांचा नेमका कोणाला टोला ? पूरग्रस्तभागात ग्राऊंडवर काम करणाऱ्यांचे लक्ष विचलित होईल असे इतरांनी दौरे करु नयेत - शरद पवार

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात एखादी आपत्ती आल्यानंतर त्या भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांचे दौरे लोकांना धीर देण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी दौरे करुन लोकांना दिलासा देण्यासाठी लक्ष घालणे योग्य ठरते. आता स्थानिक प्रशासन, तेथील संघटना आणि कार्यकर्ते पुनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे इतर लोकांनी पूरग्रस्त भागात दौरे करुन ग्राऊंडवर काम करणाऱ्यांचे लक्ष विचलित होईल असे काम करु नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅलार्ड पिअर्स येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक, आरोग्य मंत्री राजेश टोपे, खासदार सुनिल तटकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार व पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी आमदार विद्याताई चव्हाण, ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जग्गनाथ शिंदे, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे आदी उपस्थित होते
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आलेला पूर आणि दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवीतहानीबरोबर नुकसानही झाले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोकणचा दौरा केल्यानंतर भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी दौरा केला. त्यानंतर आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे ही कोकणच्या दौऱ्यावर गेल्याने शरद पवारांचा टोला नेमका राज्यपाल कोश्यारी यांना की भाजपा नेत्यांना अशी कुजबुज सुरू झाली.
यावेळी शरद पवार यांनी लातूर भूंकप पुनवर्सन कार्याची आठवण करुन दिली. लातूर भूंकपाच्यावेळी पंतप्रधान नरसिंह राव यांना लातूरचा दौरा करायचा होता. मात्र मी त्यांना दहा दिवस न येण्याची विनंती केली. तुम्ही आलात तर सर्व यंत्रणा तुमच्यासाठी कामाला लागेल, असे सांगितले. माझे ऐकून नरसिंह राव हे दहा दिवसांनी दौऱ्यावर आल्याची आठवणही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
राज्यावर अशाप्रकारचे संकट आल्यानंतर मी दौऱ्यावर जात असतो. मात्र यावेळी मी देखील दौऱ्यावर जाणे मुद्दाम टाळले आहे. आज राज्यपाल पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जात आहेत. पूरग्रस्तांना उभे करण्यासाठी केंद्राकडून अधिक मदत मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे. मात्र इतर लोकांनी तिथे दौरे करणे टाळावेत असेही ते म्हणाले.
महापूरातील १६ हजार कुटुंबांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून अडीच कोटीची मदत ;शरद पवारांची घोषणा…
महापूरामुळे बेघर झालेल्या १६ हजार पिडितांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून सुमारे २० हजार घरगुती भांडी आणि पांघरूण किटस असे अडीच कोटीचे साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.
दरम्यान याअगोदर मुंबई युवकचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी दिलेल्या बाधित क्षेत्रातील लोकांना औषधोपचार करण्यासाठी जाणाऱ्या पाच रुग्णवाहिकांना हिरवा कंदील शरद पवार यांनी दाखवला.
सहा जिल्ह्यातील चार जिल्हयात सर्वाधिक नुकसान झाले आहे. याबाबत राज्य सरकार धोरण जाहीर करेल. शिवाय आज काही जाहीर केले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात माळीण येथे जी घटना घडली होती. त्याची माहिती देताना त्या लोकांचे कसे संपूर्ण पुनर्वसन करणं आव्हान होतं मात्र ते आव्हान पेलत पुनर्वसन करण्यात सरकार यशस्वी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या महापूरामुळे १६ हजार घरे म्हणजेच १६ हजार कुटुंबांना मदत द्यायची गरज आहे. यामध्ये रत्नागिरी – चिपळूण – खेड यामध्ये ५ हजार, रायगड जिल्ह्यात – ५ हजार, कोल्हापूर २ हजार, सांगली २ हजार, सिंधुदुर्ग – ५००, सातारा – १ हजार आदींचा समावेश आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून १६ हजार लोकांना २० हजार घरगुती भांडी, याशिवाय ज्या घरांचे नुकसान झाले त्यातील लोकांना २० हजार अंथरुण – पांघरूण कीट (सोलापूरी चादरी) शिवाय एक लाख कोरोना प्रतिबंधक मास्क, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्यावतीने डॉक्टरांची २५० पथके तपासणी व औषधे घेऊन दाखल झाली आहेत. याशिवाय गंभीर रुग्णांना औषधे व रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. २० हजार बिस्किटे व टोस्ट ब्रिटानिया कंपनीकडून घेऊन वाटप करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने येत्या दोन दिवसात हे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी रायगड जिल्ह्याची जबाबदारी खासदार सुनील तटकरे, रत्नागिरीची जबाबदारी आमदार शेखर निकम, माजी आमदार संजय कदम, सिंधुदुर्गसाठी अरविंद सावंत, सातारसाठी मंत्री बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकर, सांगली जिल्ह्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय जिल्हा पातळीवर देखील पक्षाचे नेते, कार्यकर्ते आपापल्यापरीने मदत करतील. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी पूरग्रस्त भागासाठी पाच रुग्णवाहिका दिल्या असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. तसेच माजी आमदार आणि ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जग्गनाथ शिंदे हे पूरग्रस्त भागाला औषधे पुरविण्याचे काम करणार आहेत.
दौरे धीर देण्यासाठी असतात. जबाबदारी दिली आहे त्यांनी कामगिरी पूर्ण करण्यासाठी काम करावे. शासकीय यंत्रणा व स्थानिक पातळीवर लोक काम करत आहेत. त्यामुळे इतरांनी दौरे करु नयेत गर्दी करु नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *