Breaking News

पवारांचे आश्वासन एसटी कर्मचाऱ्यांना, पण निधीसाठी परिवहन मंत्री भेटणार पुन्हा अर्थमंत्र्यांना दिवाळीपूर्वी थकित वेतन मिळावे यासाठी संघटनेच्या नेत्यांनी केली शरद पवारांशी चर्चा

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात सर्वप्रथम लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊन काळात सर्वच परिवहन सेवा बंद ठेवण्यात आली. त्यामुळे एसटी महामंडळाच्या तोट्यात आणखी वाढ झाली. त्यामुळे मागील पाच महिन्यापासून विनावेतन एसटी कर्मचारी काम करत आहेत. मध्यंतरी अर्थमंत्री अजित पवार यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी भेटून एक महिन्याच्या पगाराची तजवीज केली. मात्र त्यानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे राहील्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने पुन्हा महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेवून त्यांच्यावर कैफीयत मांडली. त्यावर पवारांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी लवकरच चर्चा करून दिवाळीपूर्वी वेतन देण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्याचे आश्वासन दिले. परंतु ही चर्चा जरी झाली तर निधीसाठी परिवहन मंत्र्यांना पुन्हा अर्थमंत्री पवार यांचीच भेट घ्यावी लागणार असल्याचे समजते.

मागील चार-पाच महिने एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नसल्याने अनेक ड्रायव्हर, कंडक्टरांची आर्थिक ओढाताण होत आहे. यातील अनेकांनी पगार मिळत नसल्याने आर्थिक गरज भागविण्यासाठी नोकरीवर येण्याऐवजी भाजीपाला विकण्याचे स्टॉल टाकले आहेत. तर काहीजणांनी चहा आणि वडापावच्या टपऱ्या टाकून दैंनदिन आर्थिक गरज भागविण्याचे प्रयत्न सुरु केल्याची माहिती एसटी महामंडळातील कंट्रोलर दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

कल्याण आगारात मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांची दररोज लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. परंतु एसटी महामंडळाकडे गाड्या चालविण्यासाठी ड्रायव्हर-कंडक्टर नसतात. त्यामुळे या रस्त्यावर कमी प्रमाणात एसटी चालविली जाते. याबाबत कारणे विचारली तर पगारी नाहीत हो आम्हाला त्यामुळे अनेक जण दुसरे उद्योग करून स्वत:चा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत. तसेच पगारी मिळत नसल्याने अनेकांना नोकरीवर हजर व्हा म्हणून सांगता येत नसल्याची अडचण या डेपोतील एका कंट्रोलर दर्जाच्या अधिकाऱ्याने सांगितली.

काही महिन्यांपूर्वी परिवहन मंत्री अनिल परब यांनी याच प्रश्नी अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेवून पगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यावर अजित पवारांनी राज्याच्या तिजोरीतून एक महिन्याचे वेतन देता येईल ऐवढीच रक्कम एसटी महामंडळाला उपलब्ध करून दिली. त्यात आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाल्याने शरद पवारांनी परिवहन मंत्र्यांशी चर्चा केली तर पुन्हा परिवहन मंत्री हे अजित पवार यांचीच भेट घेवून चर्चा करून पगारीसाठी निधी मागतील. त्यापेक्षा शरद पवारांनी थेट अजित पवार आणि अनिल परब यांची एकत्रित बैठक घेवून यावर कायमस्वरूपी मार्ग काढावा अशी मागणी काही एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कामगारांची गैरसोय होऊ नये, दिवाळीपूर्वी थकित वेतन मिळावे यादृष्टीने परिवहनमंत्र्यांशी तातडीने चर्चा करण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी एसटी संघटना प्रतिनिधींना दिले.

एसटी कामगारांच्या थकित वेतनाच्या प्रश्नावर महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

Check Also

लेकाच्या अभियानात बापाने उचलला खारीचा वाटा जयंत पाटील यांनी उचलला दहा जणांच्या लसीचा खर्च

सांगली: प्रतिनिधी आज सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लसीचा पहिला डोस घेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *