Breaking News

शाहू महाराजांचे जन्मस्थळ आणि महालक्ष्मी मंदीराच्या विकास आराखड्यास मंजूरी सार्वजनिक बांधकाम मंत्री चद्रकांत पाटील यांची विधानसभेत माहिती

नागपूर : प्रतिनिधी

कोल्हापूरातील छत्रपती शाहू महाराज यांचे जन्मस्थळ आणि पुरातन महालक्ष्मी मंदीराच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. महालक्ष्मी मंदीराच्या विकासासाठी ७८ कोटी रूपये तर शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी १३ कोटी रूपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

विधानसभेत राज्यातील पुणे, कोल्हापूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शशिकांत शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान उपस्थित केला. त्यावर शिवसेनेचे सुनिल मिंचेकर यांनी याबाबत उपप्रश्न उपस्थित केला. त्यास उत्तर देताना मंत्री पाटील यांनी वरील माहिती दिली.

महालक्ष्मी मंदीराच्या आराखड्यास मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अंतिम मंजूरी मिळणे बाकी आहे. मात्र मंदीराच्या विकासासाठी ७८ कोटी रूपयांच्या निधीस मंजूरी देण्यात आलेली आहे. तसेच शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाच्या ठिकाणी वस्तुसंग्रहालय उभारण्यात येणार असून मंजूर केलेल्या १३ कोटी रूपयांपैकी ३ कोटी रूपये कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून देण्यात आले आहेत. तसेच यासाठी दोनवेळा निविदा मागविण्यात आल्या. परंतु दोन्ही वेळी कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे

वस्तुसंग्रहालय आणि विकासाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्वत:च करण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यासबरोबर राज्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी १७७३ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आतापर्यंत २३ जिल्ह्यांनी पर्यटन स्थळाच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडे प्रस्ताव सादर केल्याची माहीती पर्यटन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी दिली.

Check Also

काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या पोस्टवर भाजपाच्या कंगणा राणौतची सावध भूमिका

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाटे यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कंगना राणौतची आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर वाद सुरू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *