Breaking News

आदर्श ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना जीवनगौरव पुरस्कार

यंदाचा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून पत्रकारिता पुरस्कार जाहीर

मुंबई : प्रतिनिधी

 मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने देण्यात येणारा सन २०१८ चा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार आदर्श ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना घोषित करण्यात आला आहे. मानपत्र, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप  आहे.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. त्यामध्ये पत्रकारिता क्षेत्रात बहुमुल्य योगदान देणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन२०१८ च्या जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील धडाडीच्या व नावाजलेल्या पत्रकारांमध्ये दिनू रणदिवे यांचे नाव घेतले जाते. रणदिवे यांचा जन्म डहाणुतील आदिवासी बहुल भागात सन १९२५ साली झाला. त्यांनी १९५६ साली पत्रकारितेला सुरूवात केली. दलित, उपेक्षित, शोषित, कामगार यांचे प्रश्न मांडतानाच त्यांनी राजकीय पत्रकारितेतही आपला ठसा उमटवित मोलाचे योगदान दिले आहे. देशाचा स्वतंत्र लढा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि गोवा मुक्ती संग्रामातही त्यांनी सहभाग घेतला आहे.  

वृत्तपत्र प्रतिनिधीसाठी दिला जाणारा या वर्षाचा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार इंडियन एक्सप्रेस (मुंबई) चे प्रतिनिधी विश्वास वाघमोडे यांना तर; इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधीसाठी दिला जाणारा पुरस्कार न्यूज १८ लोकमत गडचिरोली येथील प्रतिनिधी महेश तिवारी यांना जाहीर करण्यात आला आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांसाठी देण्यात येणारा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार  न्यूज १८ लोकमत (मुंबई) च्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांना जाहीर झाला आहे. मानचिन्ह,शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांचे वितरण लवकरच समारंभपूर्वक करण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे आणि कार्यवाह प्रमोद डोईफोडे यांनी दिली.

Check Also

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,निर्भय आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *