Breaking News

ज्येष्ठ नागरीकांची वयोमर्यादा महिनाभरात निश्चित करणार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती

नागपूर : प्रतिनिधी

राज्यातील ज्येष्ठ नागरीकांसाठी प्रवासात राखीव जागा ठेवणे, त्यांना वैद्यकीय उपचार सुविधा पुरविणे आदी गोष्टी राबविण्याबाबत राज्य सरकारने धोरण या आधीच ठरविण्यात आले आहे. त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच ज्येष्ठ नागरीकांची वयोमर्यादा निश्चित करण्यासाठी महिनाभरात कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

विधानसभेत ज्येष्ठ नागरीकांसाठी अनेक रूग्णालयात उपचार सेवा सुरु करण्याबरोबरच त्यांना सदनिका खरेदीच्या करात सवलत देण्याचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यममातून भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी उपस्थित केला. त्यास उत्तर देताना मंत्री बडोले यांनी वरील माहिती दिली.

अनेक मोठ्या रूग्णालयात ज्येष्ठ नागरीकांसाठी उपचाराच्या सुविधा दिल्या जात नसल्याबाबतचा मुद्दा उपस्थित करत अशा उपचार न करणाऱ्या रूग्णालयांवर कारवाई करणार का? असा सवालही लोढा यांनी उपस्थित केला. त्यावर अशा रूग्णालयांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले.

याच अनुषंगाने भाजपचे संजय केळकर यांनीही ज्येष्ठ नागरीकांच्या मानधनाबाबतचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर राज्य सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांनी ज्येष्ठ नागरीकांना वयाचे दाखले दिले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करावी अशी मागणी केली. त्यावर सर्व तहसीलदारांना वयाचे दाखले देण्याबाबतचे आदेश देण्याबाबत निर्देश दिले जातील असे सांगितले.

तसेच संजय गांधी निराधार योजनेतंर्गत मानधन ज्येष्ठ नागरीकांना मिळावे यासाठी सर्व तहसीलदार आणि योजनेच्या अध्यक्षांना निर्देश देणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

 

Check Also

६२ वसतिगृहे या जिल्ह्यांमध्ये सुरु करण्यास सरकारची मान्यता

सामाजिक न्याय विभागांतर्गत स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून ऊसतोड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *