Breaking News

शालेय फि कमी किंवा माफीचा दिलासा सरकार न्यायालयातूनच मिळविणार निर्णय न्याय प्रविष्ट असल्याने हस्तक्षेप नाही तज्ञ अधिकाऱ्यांची शासन स्तरावर समिती

मुंबई : प्रतिनिधी

शालेय शुल्क कमी करण्याबाबत किंवा माफ करण्याबाबतचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे सद्यस्थितीत यामध्ये शासनास हस्तक्षेप करता येत नाही. तथापी उच्च न्यायालयात शासनाची बाजू सक्षमपणे मांडून शासनाच्या ८ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयास उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली.

शालेय फी कशाप्रकारे कमी करता येईल याबाबत कायदेशीर बाबी तपासून शासनास अहवाल सादर करण्यासाठी तज्ञ अधिकाऱ्यांची शासन स्तरावर एक समिती स्थापन करण्यात येत आहे. असेही शालेय शिक्षण विभागाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

कोरोना विषाणू या आजाराच्या संसर्गास प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी सार्वजनिक‍ आरोग्य विभागाच्या १३ मार्च २०२० च्या अधिसुचनेन्वये राज्यात साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची अंमलबजावणी सुरु असून राज्यात लॉकडाउन असतांना काही संस्था/शाळा, विद्यार्थ्यांना/पालकांना संपूर्ण फी भरण्याची सक्ती करीत असल्याबाबतच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्यामुळे शालेय शिक्षण विभागाने ३० मार्च २०२० च्या शासन परिपत्रकान्वये सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची व आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती करु नये, लॉकडाउन कालावधी संपल्यानंतर फीस जमा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.

त्यानंतर महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क (विनियमन) अधिनियम २०११ मधील कलम (21) नुसार प्राप्त अधिकारान्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा, कलम (26) (i) व (l) अन्वये प्राप्त अधिकारान्वये शासन निर्णय ८ मे २०२० रोजी सर्व बोर्डांच्या, सर्व माध्यमाच्या व पुर्व प्राथमिक ते इयत्ता १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी, पालकांच्या सोईच्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष २०१९-२० व २०२०-२१ मधील देय/शिल्लक फीस वार्षिक/एकदाच न घेता मासिक/ त्रैमासिक जमा करण्याचा  पर्याय (Option) द्यावा, शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कोणतीही फी वाढ करु नये, शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी जर काही शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही व  त्याबाबतचा खर्च कमी होणार असल्यास पालकांच्या कार्यकारी  समितीमध्ये (EPTA) ठराव  करुन त्याप्रमाणे योग्य प्रमाणात फी कमी करावी, लॉकडाउन कालावधीत गैरसोय टाळण्यासाठी पालकांना ऑनलाईन फी  भरण्याचा पर्याय द्यावा, असे आदेश देण्यात आले.

शासनाच्या ८ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयाविरुध्द उच्च न्यायालय,मुंबई येथे असोसिएशन ऑफ इंडियन स्कूल, संत ज्ञानेश्वर माऊली संस्था, ग्लोबल एज्युकेशन फाऊंडेशन , कासेगाव एज्युकेशन सोसायटी, अनएडेड स्कूल फोरम, ह्युमन सोशल केयर फाऊंडेशन व महाराष्ट्र समाज घाटकोपर या संस्थांनी याचिका दाखल केल्या असून शासनाचा ८ मे २०२० रोजीचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.

उच्च न्यायालयाने राज्य शासनास प्रतिज्ञापत्र/शपथपत्र दाखल करण्याची संधी न देता तसेच शासनाची बाजू ऐकून न घेता २६ जून २०२० च्या आदेशान्वये ८ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयास अंतरिम स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाने २६ जून २०२० रोजी दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशाविरुध्द शासनाने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका (SLP) दाखल केली असता मा. सर्वोच्च न्यायालयाने ४ सप्टेंबर २०२० च्या आदेशान्वये विशेष अनुमती याचिका निकाली काढली असून राज्य शासनास उच्च न्यायालयात १ आठवड्यात शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्या नुसार राज्य शासनातर्फे उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले असून उच्च न्यायालयात राज्य शासनाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी वरिष्ठ वकील अनिल अंतुरकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यासह अतिरिक्त सरकारी वकील गीता शास्त्री व सहाय्यक  सरकारी वकील भुपेश सामंत हे देखील शासनाच्या वतीने काम पाहत आहेत. सद्यस्थितीत प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

या न्यायालयीन प्रकरणी याचिकाकर्त्यांकडून त्यांच्या वतीने उच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वरिष्ठ वकील हरिष साळवे, डॉ. मिलिंद साठे, प्रविण समदानी, प्रतिक सेकसारिया, अमोघ सिंघ, निवित श्रीवास्तव, साकेत मोने, विशेष कालरा, सुबित चक्रवर्ती, अभिषेक सलियान, विशाल दुशिंग, श्रीमती सेठना, खुशबू देशमुख, पियुष रहेजा, विशेष मालविया इ. वकील नियुक्त करण्यात आलेले आहेत.

उच्च न्यायालयामध्ये प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्यापासून म्हणजेच २६ जून २०२० पासून आतापर्यंत एकूण २३ वेळा या प्रकरणाची सुनावणी  उच्च न्यायालयात झाली असून सद्यस्थितीत प्रकरण सुनावणीच्या अंतिम टप्यात आहे. शालेय फीबाबत पालकांना दिलासा देण्याबाबतचे वरिलप्रमाणे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना  ऑनलाईन शिक्षण पध्दतीमुळे ज्या बाबींवरील खर्च कमी होणार आहे त्याप्रमाणात फी कमी करण्याबाबत परिपत्रक निर्गमित करुन सर्व शाळांना सूचना देता येईल किंवा कसे याबाबत विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेतले असता ही बाब उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्यामुळे अशा स्वरुपाच्या सूचना / आदेश निर्गमित करता येणार नाही, असे विधी व न्याय विभागाने कळविले आहे.  तथापी, शालेय शुल्क कमी करण्याबाबत/ माफ करण्याबाबत उच्च न्यायालयात शासनाची बाजू सक्षमपणे मांडून शासनाच्या ८ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयास उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. असेही शालेय शिक्षण विभागाने कळविले आहे.

 

Check Also

सहकारी संस्थांच्या बैठक मुदतवाढीसह हे प्रमुख निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतले ओबीसींच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा पाठविणार

मुंबई: प्रतिनिधी ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणासंबधी काढवयाच्या अध्यादेशाचा प्रस्ताव पुन्हा राज्य सरकारकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *