Breaking News

गुंतवणुकीसह कर बचतही हवीय? पोस्ट ऑफिसच्या ‘ह्या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक ८० सी खाली करात सवलतही मिळू शकते

मुंबई: प्रतिनिधी

पोस्ट ऑफिस गुंतवणूकदारांना अनेक योजनांमध्ये गुंतवणुकीच्या संधी देते. पोस्टल सेवेसह पोस्ट अनेक प्रकारच्या बचत योजना राबवते. या योजना चांगला परतावा देणाऱ्या आहेत. यामधील काही योजना कर वाचवण्यासाठीही फायदेशीर आहेत. या योजनांना शासकीय हमी मिळते. म्हणजे आपले पैसे कधीही बुडणार नाहीत. यापैकी बऱ्याच योजना अशा आहेत की आयकर कायद्यातील कलम 80 सी अंतर्गत करात सूट मिळू शकते.  कर सवलत मिळणाऱ्या पोस्टाच्या या योजना जाणून घेऊयात.

मुदत ठेव योजना

या योजनेमध्ये एक, दोन, तीन आणि पाच वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येते. मुदत ठेव योजनेत किमान गुंतवणूकीची रक्कम २०० रुपये आहे. जास्तीत जास्त गुंतवणूकीची मर्यादा नाही. ५ वर्षांच्या ठेवीवर कर सूटही मिळते. मुदत ठेव योजनांमध्ये ६.९० टक्के ते ७.७० टक्के व्याज मिळते.

वरिष्ठ नागरिक बचत योजना

या योजनेत ६० वर्ष आणि त्या पुढील वयाच्या वरिष्ठ नागरिकांना गुंतवणूक करता येते. या योजनेत वर्षाला ८.७ टक्के व्याज मिळतं. जर व्याजाची रक्कम १० हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर यावर टीडीएस कापला जातो. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना ८० सी नुसार कर सवलत मिळते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र 

या योजनेंतर्गत १०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. जास्तीत जास्त गुंतवणूकीची मर्यादा नाही. यामध्ये टीडीएसची कोणतीही तरतूद नाही. या योजनेत व्याज दर ७.९० टक्के आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रातील गुंतवणुकीवर ८० सी नुसार कर सवलत मिळते. या योजनेत दर वर्षी व्याज जमा होतं. मात्र, मुदत संपल्यावरच व्याज मिळतं.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ)

पीपीएफ खातं अवघ्या १०० रुपयाने पोस्टात उघडता येतं. या खात्यावर एका आर्थिक वर्षात कमीत कमी ५०० रुपये जमा करणं आवश्यक आहे. तर वर्षाला जास्तीत जास्त दीड लाख रुपये या खात्यात टाकता येतात. पीपीएफमधील गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. या योजनेत चक्रवाढ पद्धतीने वार्षिक ८ टक्के व्याज मिळते. सरकारने १९६८ मध्ये पीपीएफ योजना सुरू केली. या योजनेत आपण पैसे बचत म्हणून सरकारकडे जमा करतो. योजनेचा कालावधी संपल्यावर सरकार आपले पैसे व्याजासहीत देते.

सुकन्या समृद्धी योजना 

मुलींच्या शिक्षणाचा आणि लग्नाच्या खर्चाचा मोठा भार एकाचवेळी पालकांवर येऊ नये या उद्देशाने केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. फक्त मुलींसाठी असलेल्या या योजनेत पैसे गुंतवून मुलींच्या उच्च शिक्षणासाठी निधी जमा करणे पालकांसाठी शक्य होणार आहे. या योजनेत किमान २५० रुपये आणि जास्तीत जास्त १.५० लाख रुपये गुंतवता येतात. सुकन्या समृद्धी योजनेत ८.४० टक्के व्याज मिळते.

Check Also

फेब्रुवारीत महागाईचा दर ५ टक्क्यावर चलनवाढीचा दर ५.१ टक्क्यावर

फेब्रुवारीमध्ये ग्राहक किमतीवर आधारित किरकोळ महागाई फेब्रुवारीमध्ये ५ टक्क्यांच्या आसपास बंद होण्याची शक्यता आहे. सरकारचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *