Breaking News

संजय राऊतांनी अजित पवारांना मिश्किल विनंती करत दिला इशारा अजित पवार मुख्यमंत्र्यांचं ऐकतात आपण त्यांना सांगू

पुणे : प्रतिनिधी

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी म्हणून निवडणूकांना सामोरे जायचं की स्वतंत्र जायचं याबाबत अद्याप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे एकमत झालेले नाही. त्यामुळे कधी राष्ट्रवादी तर कधी काँग्रेसकडून एकला चलो चा नारा देण्यात येत आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीबरोबरील संभाव्य युतीच्या निमित्ताने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अजित दादा, आमचं ऐका अशी मिश्किल विनंती करत नाहीतर गडबड होईल असा इशाराही दिला.

पुणे येथील भोसरीत शिवसेनेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये काहीकाळ हशा पिकला. त्यानंतर लगेच संजय राऊत म्हणाले की, माझं पुढचं वाक्य ऐका नाही तर लगेच बाहेर ब्रेकिंग न्युज सुरु होतील आणि भलताच गोंधळ होईल.

पालकमंत्री आपले नाहीत. राज्यात जरी सत्ता असली, तरी या भागात आपलं कुणी ऐकत नाही असं म्हणतात. पण असं होता कामा नये. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. अजित पवार देखील उपमुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्र्यांचं ऐकतात. आपण त्यांना सांगू, दादा ऐकलं तर बरं होईल. नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत आज, असा गर्भित इशारा देत मात्र त्याचे पडसाद फारसे गंभीरपणे उमटू नयेत म्हणून लगेच खुलासा करत ते पुढे म्हणाले की, मुख्यंमत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत. कारण उद्या आम्हाला दिल्लीवर देखील राज्य करायचं आहे. साऊथ ब्लॉक, पंतप्रधान कुठे बसतात, गृहमंत्र्यांचं कार्यालय कुठे आहे, तिथे आपल्याला टप्प्याटप्प्याने पोहोचायचं आहे. या सगळ्याचा अंदाज घ्यायला मुख्यमंत्री दिल्लीत आहे. त्यामुळे अजित पवारांना आम्ही सांगू की आमच्या लोकांचंही ऐकत जा तुम्ही, आमच्या लोकांना नाराज करू नका, नाहीतर गडबड होईल.

संजय राऊत यांनी एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आघाडी धर्माची जाणीव करून दुसऱ्याबाजूला शिवसैनिकांना आघाडी होईल का? नाही झाली तर काय? त्या भानगडीत कशाला पडायचं आपण ? आपल्याला एकट्यानं लढण्याची सवय आहे. आलात तर तुमच्याबरोबर, नाहीतर तुमच्या शिवाय. कशाकरता आपण रेंगाळत बसायचं. आपण सगळ्या जागांची तयारी केली पाहिजे. उद्या आपल्यासमोर चर्चेला बसतील. मग या घ्या, त्या घ्या. आपण सन्मानाने आघाडी करण्याचा प्रयत्न करू. पण स्वाभिमान सोडून भगव्या झेंड्याशी तडजोड आपण करणार नाही हे लक्षात घ्या. एकदा ठरलं लढायचं म्हटल्यावर आपण लढू असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी शिवसैनिकांसमोर व्यक्त केला.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे, महापालिकेतला महापौरही शिवसेनेचा असला पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. कुणाची भिती बाळगायचं कारण नाही. भाजपा काय करणार? किंवा पालकमंत्र्यांचा जास्त दरारा आहे, आपलं कुणी ऐकत नाही. आपलंही ऐकणार, तुम्ही छाती पुढे करून सत्ता आहे म्हणून जा ना. कलेक्टर, पोलीस आयुक्तांकडे जाताना छाती पुढे काढून जा की आपली सत्ता आहे. तू या सत्तेचा नोकर आहेस, माझा मुख्यमंत्री वर बसलाय ही उभारी मनात पाहिजे. तुम्ही जबाबदारी घ्या, काही झालं तर मला सांगा. मी येतो इथे असा सल्लाही त्यांनी शिवसैनिकांना देत राष्ट्रवादी काँग्रेसला अप्रत्यक्ष इशाराही दिला.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जाऊ तिथे शिवसेनेच्या नावाने प्रचंड घोषणा, जयजयकार होतात. पण महानगरपालिकेत भोसरीतून शिवसेनेचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. ही खंत आहे आम्हाला. भोसरीनी थोडा हात दिला असता, तर अढळराव लोकसभेत असते अशी खंत व्यक्त करत मी मागे म्हणालो होतो की ५५ ला आमचा मुख्यमंत्री होतो, तर किमान ४०-४५ ला पिंपरीत आपला महापौर झाला पाहिजे. महाविकास आघाडी आहे. सगळ्यांना थोडं थोडं मिळतं, तसं आम्हालाही मिळायला हवं. इतकी वर्ष आपण राज्याच्या राजकारणात आहोत. बाळासाहेब ठाकरेंचा जन्म पुण्यातला. इथे त्यांनी अनेक माणसं जोडली, सभा घेतल्या. पण पुणे आणि पिंपरीत शिवसेनेचा भगवा फडकू शकला नाही, ही खंत आपल्या मनात कायम असल्याची भावनाही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

Check Also

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसाठी गोड बातमी: मानधनात वाढ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *