Breaking News

नवनियुक्त महिला प्रदेशाध्यक्ष सव्वालाखेंनी स्विकारला पदभार, म्हणाल्या… ‘शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारे तीन काळे कायदे’ पुस्तकाचे प्रकाशन.

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांचा पदग्रहण सोहळा प्रांताध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दिमाखात पार पडला. काँग्रेस पक्षाने नेहमीच महिलांना न्याय देण्याचे काम केले आहे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ५० टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय हा काँग्रेसने घेतला. महिला संघटन मजबूत करा, महिलांनी ठरवले तर कोणत्याही लाटेत यश नक्की मिळेल. संध्याताई यांनी जीवनात मोठा संघर्ष केलेला आहे, ज्यांनी जीवनात एवढा संघर्ष केला त्या कुठेच कमी पडत नाहीत. गाव तिथं काँग्रेस हा उपक्रम चारुलता टोकस यांनी सुरु केला होता तसाच मोहल्ला तेथे काँग्रेस करा आणि महिला संघटन मजबूत करा, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील कार्यक्रमाला प्रांताध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, मावळत्या महिला प्रदेश अध्यक्षा चारुलता टोकस, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुश्मिता देव, राज्यस्थानच्या मंत्री ममता भूपेश, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, बी. एम. संदीप, सोनल पटेल, आशिष दुआ, जेनेट डिसुजा, सुशीबेन शहा, मुंबई महिला काँग्रेस अध्यक्ष अजंता यादव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मा. आ. मोहन जोशी, रामकिशन ओझा, राजाराम देशमुख आदी पदाधिकारी तसेच शेकडो महिला उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना संध्या सव्वालाखे म्हणाल्या, काँग्रेस पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्याची योग्य ती दखल घेतली जाते. सातत्याने काम करत रहा काँग्रेसमध्ये न्याय मिळतो असा हा पक्ष आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करणाऱ्या सामान्य गृहिणीला पक्षाने नेहमी जबाबदारी दिली त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. पक्षाने माझ्यावर आताही जी जबाबदारी दिली आहे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन आणि विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. राज्यात महिलांचे संघटन मजबूत करून दिल्लीपर्यंत राज्याचे नाव उज्ज्वल करेन असे त्या म्हणाल्या.

मावळत्या अध्यक्षा चारुलता टोकस यांच्या कार्याचा गौरव मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, भाई जगताप, माणिकराव ठाकरे, ममता भुपेश यांच्यासह सर्व वक्त्यांनी केला तसेच संध्याताई सव्वालाखे यांना शुभेच्छा दिल्या.

केंद्र सरकारने लादलेल्या काळ्या कायद्याची वस्तुस्थिती दाखवणारे, ‘शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारे तीन काळे कायदे’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सुश्मिता देव आणि ममता भुपेश यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.कृषी कायद्यावरून भाजपा, पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक मंत्री, नेते, पदाधिकारी हे जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. परंतु हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून मोजक्याच धनदांडग्या उद्योगपतींच्या हिताचे असून शेतकरी मात्र देशोधडीला लागणार आहे ही काळी बाजू मांडणारी माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

Check Also

इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *