Breaking News

निवडणूकीतील पराभव टाळण्यासाठी साध्वी प्रज्ञा सिंहांच्या त्या वक्तव्याशी भाजपची फारकत भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांचा खुलासा

मुंबई : प्रतिनिधी

साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेले वक्तव्य वैयक्तिक असून भाजपा त्या वक्तव्याशी सहमत नाही. त्यांना अटक केली त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते व त्यांना अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली होती. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात जे पोलीस अधिकारी – कर्मचारी व नागरिक मरण पावले ते सर्व हुतात्मे आहेत असे आमचे मत असून आम्हाला शहिदांबद्दल आदर असल्याची भूमिका भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी स्पष्ट करत साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्याशी भाजपचा संबध नसल्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला.

साध्वीच्या वक्तव्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्वच पुरोगामी पक्षाच्या नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. ऐन निवडणूकीत होणारे डँमेज कंट्रोल रोखण्यासाठी भाजपकडून सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भाजपच्या विजयासाठी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या नावावर मते मागत असतानाच साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मात्र पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या आयपीएस अधिकारी स्व. हेमंत करकरे यांच्याबद्दल संतापजनक वक्तव्य केले. याचा राजकिय फटका बसण्याची शक्यता असल्याने भाजपकडून त्या वक्तव्याशी संबध नसल्याचे सांगत दूर राहण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

भारतीय जनता पार्टी शेटजी – भटजींचा पक्ष असून अंबानी भाजपा चालवत असल्याचे आरोप काँग्रेसकडून करण्यात येतात. पण त्या पक्षाचे अध्यक्ष जानवेधारी ब्राह्मण असल्याचे सांगितले जाते तर उद्योगपती अंबानी काँग्रेसच्या उमेदवाराच्या विजयासाठी जाहीर पाठिंबा देतात, यावरून काँग्रेसच शेटजी-भटजींचा पक्ष असल्याचे स्पष्ट झाल्याचा टोलाही त्यांनी यावेळी मारला.

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, मधू चव्हाण आणि विश्वास पाठक उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात सहा प्रचार सभा झाल्या. भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. अमित शाह यांच्या चार सभा झाल्या तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ४३ सभा झाल्या. मुख्यमंत्र्यांच्या सभा छोट्या छोट्या शहरातही झाल्या. सर्वत्र जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना महायुतीचा विजय होईल हे स्पष्ट आहे. महायुतीला गेल्यावेळी राज्यात मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा महायुतीला जागा मिळतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यात निवडणुकीत महायुतीच्या बाजूने वारे वाहत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता आपण मुख्यमंत्र्यांची जात कधी काढली असे विचारून सारवासारव करावी लागत असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांना काँग्रेस पक्ष ज्या कारणांसाठी सोडावा लागला, ही दुर्दैवी घडामोड आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची महिलांविषयीची भूमिका स्पष्ट होते. दोन महिला काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करत असताना अशी परिस्थिती कशी निर्माण झाली, हे त्या पक्षाने स्पष्ट केले पाहिजे. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु संघवी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन गेले. त्यांच्यासारख्याची काँग्रेस पाठराखण करते आणि प्रियांका चतुर्वेदी यांना वाऱ्यावर सोडते हे विशेष आहे. प्रियंका चतुर्वेदी यांच्या निमित्ताने काँग्रेसचा भेसूर चेहरा समोर आला. काँग्रसने त्यांना न्याय दिला नाही. काँग्रेस वागणुकीमुळे महाराष्ट्रातील महिला घाबरल्याचा आरोप त्यांनी केला.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *