मुंबईः विशेष प्रतिनिधी
मुंबई पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्या यांच्या अटकेनंतर राजकिय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची लवकरच उचलबांगडी होणार असल्याचे संकेत देण्यात येत असून राज्याच्या मंत्रिमंडळातही फेरबदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटी दरम्यान वाझेप्रकरणी चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी वाझे प्रकरणावरून राज्यातील महाविकास आघाडीची प्रतिमा मोठ्या प्रमाणावर मलिन झाली असल्याने ती सावरणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर व्यक्त केले. तसेच अर्थसंकल्पिय अधिवेशन काळात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेनुसार तातडीने पोलिस दलात बदल करण्याची सूचना करत मंत्रिमंडळात फेरबदलाची आवश्यकता असल्याचे भूमिका शरद पवार यांनी मांडल्याचे शिवसेनेच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
याशिवाय राज्य सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्याबाबत शरद पवार यांनी फारसे चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्यामुळे शिवेसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचे फेरबदल करण्याबाबत चर्चा झाली असून या अनुषंगानेही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी होणार असल्याचे संकेत असून त्यांच्याबरोबर ठाणे पोलिस आयुक्त यांचीही बदली होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर राज्याच्या मंत्रिमंडळातही फेरबदल करण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसात मुंबई पोलिस आयुक्त आणि मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास त्यात नवल वाटायला नको.
दरम्यान, सचिन वाझे प्रकरण राज्य सरकारला चांगलेच महागात पडत असल्याचे दिसून येत असल्याने भाजपामध्ये मात्र चांगलेच वातावरण पसरले आहे. त्यामुळे पुढील साडेतीन वर्षे राज्यात सत्ता जरी महाविकास आघाडीची राहिली तर त्यावर जरब मात्र भाजपाची राहणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
