Breaking News

रेम्डेसिवीर इंजेक्शन ३० टक्के अधिक किंमतीने विकता येणार अन्यथा.. किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रालाही प्रस्ताव पाठविला

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात कोविड-19 या साथरोगाचे रुग्ण ऑक्टोंबर, २०२० ते जानेवारी २०२१ या काळात बरेच कमी झाल्याचे दिसून आले होते. परंतु फेब्रुवारी, २०२१ च्या मध्यापासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असून दरदिवशी सुमारे १० हजार नवीन रुग्ण वाढत आहेत. आज रोजी राज्यात ९८८५९ सक्रीय रुग्ण आहेत. सदर परिस्थिती बघता राज्यात कोविड-19 या साथरोगाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यापार्श्वभूमीवर जनतेला स्वस्त दरात हे इंजेक्शन उपलब्ध व्हावे यासाठी छापील किंमतीच्या ३० टक्के अधिक रूपयांना विकण्याची मुभा रूग्णालयांना देण्यात आली आहे.

कोविड-19 आजाराच्या रुग्णांवरील उपचारासाठी बऱ्याच औषधांचा वापर होत असून प्रामुख्याने रेम्डेसिवीर इंजेक्शन हे औषध या आजारावर प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. राज्यात जानेवारी, २०२१ अखेर पर्यंत कोविड रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून आले, त्याचबरोबर रेम्डेसिवीर इंजेक्शनची मागणी देखील कमी झाल्याचे दिसून आले. फेब्रुवारी, २०२१ पासुन रुग्णालये व रुग्णालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना या औषधाची विक्री किंमत कमी करण्यात आली, परंतु छापील विक्री किंमत कमी करण्यात आली नाही. त्यामुळे  सदर विक्री किंमत कमी करण्यात आलेल्या किमतीचा लाभ रुग्णांना न मिळता त्यांचेवर छापील विक्री किमतीनुसार आकारणी होत असल्याने ग्राहकांना नाहक आर्थिक भुर्दंड पडत असल्याचे दिसून आले.

याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी या प्रकरणी कार्यवाही घेण्याच्या दिलेल्या सूचने नुसार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता रेम्डेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादकांनी सदर औषधाची विक्री रुग्णालयांना तसेच रुग्णालयांना पुरवठा करणाऱ्या घाऊक विक्रेत्यांना सुमारे ८०० ते १३०० रुपयांनी म्हणजे सरासरी १ हजार ४०/- रुपये किंमतीत केल्याचे आढळून आले. तथापि याबाबत रुग्णालयांनी रुग्णांना आकारलेल्या किंमतीबाबत पडताळणी केली असता काही रुग्णालये त्यांच्या खरेदी किमतीवर १० ते ३० % अधिक रक्कम आकारून बहुतांश रुग्णालये खरेदी किंमत कमी असूनदेखील छापील किंमत आकारून मोठ्या प्रमाणावर नफा कमावत असल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे याबाबत अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांनी याबाबत दखल घेवून सदर रेम्डेसिवीर इंजेक्शन ची उत्पादकांची विक्री किंमत व प्रत्याक्षात रुग्णांना आकारण्यात येणारी किंमत यामधील तफावत कमी करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरवात केली. यासंदर्भात सदर रेम्डेसिवीर इंजेक्शन उत्पादित करणाऱ्या उत्पादकांची ६/३/२०२१ व  ९/३/२०२१ रोजी अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या उपस्थितीत बैठका घेण्यात आली व तसेच रुग्णालयाची देखील ८/३/२०२१ रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकांमध्ये याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.  बहुतांश रुग्णालये खरेदी किंमत कमी असूनदेखील रुग्णांना छापील किंमत आकारत असल्याचे दिसून आले आहे. याबाबतचा प्रशासनाने शासनास सविस्तर अहवाल सादर केला असून शासनाने रुग्णालयांना सदर रेम्डेसिवीर इंजेक्शनच्या खरेदी किंमतीवर जास्तीत जास्त ३०% जास्त किंमत आकारण्याबाबत निर्देश देण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले आहे.

याबाबत आज रोजी अन्न व औषध प्रशासनाने रेम्डेसिवीर इंजेक्शन च्या सर्व उत्पादकांना सदर औषधाच्या किंमती त्यांच्या विक्री किंमतीच्या जास्तीत जास्त ३०% जास्त आकारून MRP निश्चित करण्याबाबतचे निर्देश दिलेले असून लवकरच रेम्डेसिवीर इंजेक्शनच्या किंमती कमी होण्याची अपेक्षा आहे.

तसेच रेम्डेसिवीर इंजेक्शन या औषधाची  घाऊक व किरकोळ विक्री किमतीतील तफावत बघता व्यापक जनहिताच्यादृष्टीने केंद्र शासनाने औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ अंतर्गत अधिकाराचा वापर करून रेम्डेसिवीर इंजेक्शन 100mg ची अधिकतम किरकोळ विक्री किंमत निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी राष्ट्रीय औषध किंमत नियंत्रण प्राधिकरण, नवी दिल्ली यांना  सादर केला  आहे.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *