Breaking News

क्रॉस चेकिंग, विभागीय चौकश्या सुरु केल्याने शिधावाटप कर्मचारी जाणार संपावर कर्मचारी संघटनेचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी
नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यंत्रणेअंतर्गत मुंबई, ठाणे विभागात पात्र लाभार्थी यांचेपर्यंत शासनामार्फत पुरविल्या जात असलेल्या अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे काम यंत्रणेतील सर्व कर्मचारी-अधिकारी जिद्दीने पार पाडत आहेत. तरीही एका कार्यालयातून दुस-या कार्यालयातील कार्यक्षेत्रात जाऊन तपासण्या करण्याचे आदेश नियंत्रक शिधावाटप व संचालकाकडून देण्यात आले आहेत. यापरिस्थिती अशा तपासण्या शक्य होणार नसल्याने या आदेशाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा मुंबई शिधावाटप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामराजे भोसले यांनी दिला.
मुंबई, ठाणे विभागाअंतर्गत काही कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात संवेदनशील परिस्थिती उद्भवलेली आहे. कल्याण- डोंबिवली, ठाणे परिसरात लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आलेले आहे. तरीही यंत्रणेतील कर्मचारी जीव मुठीत धरून विरार, बदलापूर, पनवेल, अशा दूरवरच्या ठिकाणाहून मजल दरमजल करत कार्यालयापर्यंतचा प्रवास करत आहेत व कार्यालयीन कामकाज सुरळीतपणे पार पाडत आहेत. सदर प्रवास करणाऱ्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचादेखील समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच काही कर्मचारी यांच्या विनाकारण विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचे आदेश दिले आहेत ते तात्काळ रद्द करावेत. सध्या जनतेपर्यंत धान्याचा पुरवठा करणे महत्वाचे आहे. प्रत्येक नागरिकांना धान्य मिळणे आवश्यक आहे. तसेच कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने खिडक्यावरील कामकाज गरज नसताना चालू करू नये. तसेच कर्मचारी-अधिकारी हे लॉकडाउनच्या काळापासून शनिवार, रविवारी सुध्दा सातत्याने काम करत असल्याने नियमीत उपस्थिती ठेवण्यात येऊ नये. विभागात मागील १ वर्षापासून पदोन्नत्या दिलेल्या नाहीत. त्यामुळे यंत्रणेतील कर्मचारी-अधिकारी यांचे मोठे नुकसान झाले आहे. रखडलेल्या पदोन्नत्या देणे आवश्यक आहे. आश्वासित प्रगती योजने अंतर्गत तात्काळ पदोन्नत्या द्याव्यात. अन्यथा बुधवार, ८.७.२०२० व गुरुवार ९.०७.२०२० रोजी काळ्या फिती लावून कामकाज करण्यात येणार असून शुक्रवार, १०.०७.२०२० रोजी सर्व कार्यालयासमोर निदर्शने. तर मंगळवार दि. १४.०७.२०२० रोजी लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार असून बुधवारी १५.०७.२०२० व गुरुवार १६.०७.२०२० रोजी संप करण्याचा इशारा त्यांनी दिला.
या मागण्यांबाबत वारंवार चर्चा करूनही नियंत्रक शिधावाटप यांनी अद्यापही तोडगा काढलेला नाही. तसेच यंत्रणेतील सर्व कर्मचारी-अधिकारी यांनी लॉकडाउनच्या काळात शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी सुद्धा उपस्थित राहून शासनाच्या चार- चार योजनांचे काम सुरळीतपणे पार पाडले आहे. असे असतानाही प्रशासनाच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे कर्मचारी-अधिकारी यांच्यामध्ये कमालीचा असंतोष निर्माण झालेला आहे. आंदोलनाच्या काळात विभागात काही गंभीर परिस्थिती उद्भवल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला.

Check Also

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,निर्भय आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *