Breaking News

विक्रम गोखलेरूपी भगवं वादळ येणार आरक्षण व राजकारणावर आधारीत ‘राष्ट्र’

मुंबईः प्रतिनिधी

मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनय कौशल्याचा ठसा उमटविण्यात यशस्वी ठरलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. याच कारणामुळे गोखले जेव्हा एखाद्या चित्रपटात दिसणार असतात, तेव्हा त्यांच्या चाहत्यांसोबतच सर्वांच्या नजरा त्या चित्रपटावर खिळतात. लवकरच ते ‘राष्ट्र’ या आरक्षण व राजकारणावर आधारीत आगामी मराठी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. निर्माते बंटी सिंग यांनी इंदर इंटरनॅशनलच्या बॅनरखाली ‘राष्ट्र’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

आजवर बऱ्याच चित्रपटात राजकारण्याची भूमिका साकारणाऱ्या गोखलेंनी ‘राष्ट्र’मध्ये साकारालेले पुढारी सर्वार्थाने वेगळे आहेत.  कपाळाला कुंकवाचा भला मोठा टिळा, डोळ्यांना चष्मा, भगवा कुर्ता, भगवा पायजमा आणि भगवं उपरणं असा पूर्णपणे भगवा वेष विक्रम गोखले यांनी ‘राष्ट्र’मध्ये धारण केला आहे. भगव्या वेशभूषेवरून गोखले यांनी या चित्रपटात हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पुढाऱ्याची व्यक्तिरेखा साकारल्याचं सहजपणे जाणवतं. असं असलं तरीही या व्यक्तिरेखेला बरेच कंगोरे असून ते उलगडण्याचा प्रयत्न गोखलेंनी लीलया केला आहे. निर्माते बंटी सिंग आणि दिग्दर्शक इंदरपाल यांनी या चित्रपटात आरक्षणाचा महत्त्वपूर्ण उपस्थित केला आहे. आरक्षण माणसांना जोडत नाही तोडतोय… अशा आशयाचे संवाद या चित्रपटात ऐकायला मिळतील. याखेरीज “माझ्या तळपायाची आग मस्तकात जायच्या आत, आरक्षण आणि राजकारण हे दोन्ही मुद्दे घेऊन इथून निघायचं. ही माझी जागीर आहे, हे माझं वर्तुळ आहे, इथे फक्त माझ्या आज्ञेचं पालन होईल”, अशा आशयाचे विक्रम गोखलेंच्या मुखातील संवाद त्यांची चित्रपटातील व्यक्तिरेखा स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहे. यावरून ‘राष्ट्र’मध्ये गोखलेंच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर जणू भगवं वादळच घोंघावताना दिसणार यात शंका नाही.

प्रथमच मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन करताना इंदरपाल यांनी महाराष्ट्राच्या मातीतील कथानकाची निवड केली आहे. इथल्या लाल मातीच्या राजकारणातील बारकावे अभ्यासपूर्ण शैलीत मांडत त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणाचा अचूक वेध घेतला आहे. रुपेरी पडद्याच्या पटावर राजकारणाच्या बुद्धीबळाचा डाव यशस्वीपणे मांडण्यासाठी इंदरपाल यांनी मराठीतील तगड्या कलाकारांची निवड केली. त्यामुळे कागदावर उतरवलेलं कथानक पडद्यावर चितारणं इंदरपाल यांना अधिक सोपं गेलं. ‘राष्ट्र’चा विषय खूप वेगळा आणि वर्तमान परिस्थितीवर भाष्य करणारा असल्याने त्याला न्याय देण्यासाठी दिग्गज कलाकारांची निवड केली जाणं ही कथानकाची गरज असल्यानेच मराठीतील नामवंत कलाकारांना निवडण्यात आल्याचं इंदरपाल म्हणाले. विक्रम गोखले हे ‘राष्ट्र’मधील हुकूमी एक्का आहेत. विक्रम गोखलेंनीही आपल्या व्यक्तिरेखेत जीव ओतला आहे. या व्यक्तिरेखेसाठी विक्रम गोखले हीच आमची पहिली आणि अखेरची पसंती होती असं निर्माते बंटी सिंग यांनी सांगितले. कथा ऐकताच गोखलेंनी होकार दिल्याने कुठेही अडचण न आल्याचंही बंटी सांगतात.

अनोखी स्टाईल आणि काव्यरचनांमुळे नेहमीच चर्चेत असणारे सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री रामदास आठवले आणि स्वाभिमान शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनीही या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. गोखलेंच्या जोडीला मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, मिलिंद गुणाजी, रीमा लागू, संजय नार्वेकर, दीपक शिर्के, सिया पाटील आणि गणेश यादव अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. संगीतकार निखिल कामत यांनी ‘राष्ट्र’ला संगीत दिलं आहे.

Check Also

जरांगे पाटील यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना चिंततो…, रितेश देशमुखची सूचक पोस्ट जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेत त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो

राज्य सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी गावात पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *