Breaking News

फुले, साठे, चर्मकार आणि अपंग महामंडळाकडून पुन्हा कर्ज वाटप होणार

राष्ट्रीय महामंडळाकडून मिळणाऱ्या ३२५ कोटींचे कर्जास शासन हमी : मंत्री बडाले

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील मागास प्रवर्गातील आणि अपंग व्यक्तींना स्वंयरोजगार करता यावा म्हणून महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, चर्मकार व चर्मोद्योग विकास महामंडळ आणि राज्य अपंग वित्त विकास महामंडळाकडून करण्यात येणाऱे कर्ज वाटप थांबविण्यात आले होते. मात्र आता या चारही आर्थिक विकास महामंडळांना राष्ट्रीय महामंडळाकडून ३२५ कोटी रूपयांचे कर्ज मिळणार आहे. त्यामुळे स्वंयरोजगारासाठी कर्ज मागणाऱ्यांस कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच राष्ट्रीय महामंडळाकडून मिळणाऱ्या कर्जाज राज्य सरकारने हमी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

ही चारही आर्थिक विकास महामंडळे सामाजिक न्याय विभागांतर्गत येत असून यापैकी महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाला १२५ कोटी रूपये, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळास ७० कोटी रूपये, संत रोहीदास चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळास ५० कोटी रूपये आणि महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळासाठी ७० कोटी रूपयांचे कर्ज केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या राष्ट्रीय महामंडळाकडून एकूण ३२५ कोटी रूपयांचे कर्ज मिळणार आहे. त्यामुळे या चारही महामंडळाकडे स्वयंरोजगारासाठी कर्जाची रक्कम मागणाऱ्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 या चार महामंडळांना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली (NSFDC), राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली (NSKFDC), राष्ट्रीय विकलांग वित्त एवं विकास निगम, नवी दिल्ली (NHFDC) या केंद्रीय महामंडळांची हमी नसल्यामुळे गेली अनेक वर्ष मागासवर्गीय लाभार्थी कर्जापासून वंचित रहात होते. यासाठी या महामंडळास राज्य शासनाने हमी देणे आवश्यक होते. आज मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३२५ कोटी रुपयांची हमी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे या महामंडळाकडील अनेक कर्ज प्रस्ताव मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या सर्व महामंडळांची हमी शुल्क दर शेकडा २ रुपयांवरुन ५० पैसे इतका कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *