Breaking News

राज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक म्युकरमायकोसीसबाबत जनजागृती करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात दर वर्षी १० जून रोजी दृष्टी दिन साजरा करण्यात येतो. यंदाही यानिमित्त आजपासून ते १६ जून पर्यंत दृष्टी दिन सप्ताह साजरा केला जाणार असून याकाळात कोरोनापश्चात होणाऱ्या म्युकरमायकोसीस आजाराबाबत जनजागृती करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले असून गेल्या वर्षभरात कोरोनाकाळात देखील सुमारे २ लाख २८ हजार  मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

यंदा १० ते १६ जून २०२१ या कालावधीत दृष्टी दिन सप्ताह साजरा करण्यासाठी सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, नेत्र शल्य चिकित्सक व आरोग्य कर्मचारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध आणि उपचार कार्यक्रमांतर्गत मधुमेह रुग्णांकरीता नेत्र तपासणी शिबिर आयोजित करून त्या रुग्णांची फंडस स्कोपी करणे, तसेच म्युकरमायकोसिस डोळ्यांची निगा कशी राखावी याचे मार्गदर्शन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोना काळात वेबीनार अथवा दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून लहान मुलांमधील अंधत्व, कोरोनापश्चात म्युकरमायकोसिस या विषयावर वैद्यकिय महाविद्यालय / रिजनल इन्स्टीटयूट ऑफ ऑप्थल्मोलॉजी/अशासकिय स्वयंसेवी संस्था तसेच खाजगी तज्ञ डॉक्टर यांचे मार्फत प्रतिबंधक उपचार यावर चर्चासत्र आयोजित करावेत, म्युकरमायकोसिसमध्ये डोळयाची निगा कशी करावी याबाबत जनजागृती करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

शासकीय सेवेतील नेत्र शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांनी अहोरात्र काम केले, खडतर परिस्थितीवर मात करून त्यांनी जिद्द व चिकाटीच्या बळावर ८० हजाराहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण करून नेत्रहिनांचे जीवन प्रकाशमय केले. त्यांचा जन्म दिनांक आणि मृत्यू दिनांक १० जून आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रतिवर्षी १० जून हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृती निमित्त दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो. त्याद्वारे सामान्य जनतेमध्ये नेत्रदानाबाबत जनजागृती केली जाते. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या घोषवाक्याचा आधार घेत जाणीवजागृतीचे प्रयत्न सुरु आहेत.

राज्यात आजमितीस ६९ नेत्र पेढया, ७७ नेत्र संकलन केंद्र, १६७ नेत्र संकलन केंद्र कार्यरत आहेत.  मार्च २०२० पासून कोरोना महामारीशी लढा देत आहोत. राज्यातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी कोविड महामारीमध्ये कार्यरत असून देखिल त्यांनी २  लाख २८ हजार इतक्या मोतिबिंदु शस्त्रक्रिया केल्या. १३५५ नेत्र बुब्बुळे संकलन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण तर दोन्ही डोस घेतलेले ५० लाखांवर

राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य असून त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरातचा क्रमांक लागतो. राज्याच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे.

लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र सुरूवातीपासून देशात आघाडीवर असून त्यामध्ये सातत्य कायम राखले आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात २ कोटी ७ हजार ७० नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या सुमारे ५० लाख ८ हजार ४७६ एवढी आहे. महाराष्ट्र पाठोपाठ उत्तरप्रदेशात २ कोटी १५ लाख ६५ हजार नागरिकांना लस देण्यात आली असून गुजरातमध्ये १ कोटी ९१ लाख ८८ हजार नागरिकांचे तर राजस्थानमध्ये १ कोटी ८४ लाख ७६ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *