Breaking News

न्यायालयाचा चंद्रकांत पाटील यांना दिलासा मात्र आव्हान कायम निवडणूक शपथपत्राबाबतची याचिका न्यायालयाने निकाली काढली

मुंबईः प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीत खोटे शपथपत्र सादर केल्याप्रकरणी पुणे न्यायालयात दाखल करण्यात आलेली चंद्रकांत पाटील यांच्या विरोधातील याचिका निकाली काढल्याने पाटील यांना दिलासा मिळाला. मात्र न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात सत्र न्यायालयात लवकरच आव्हान देणार असल्याची माहिती याचिकाकर्त्ये डॉ. अभिषेक हरिदास यांनी दिली.
चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणूकी दरम्यान आणि विधान परिषदेचे आमदार असताना दोन वेगवेगळे शपथपत्र सादर केले. यातील एका शपथपत्रात ते वडिलांचे नाव बच्चू असे नमूद केले तर दुसऱ्या शपथपत्रात बच्चाराव असे नमूद केले. त्याचबरोबर पाटील यांच्या विरोधात कोल्हापूरातील पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद असल्याची माहिती लपविल्याप्रकरणी पुणे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती असे त्यांनी सांगितले.
याप्रकरणात पोलिसांना तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशनुसार पोलिसांनी तपास केल्याचे दिसत नसल्याचे मत व्यक्त करत या न्यायालयाने दिलेल्या या निकालाच्या विरोधात आपण जिल्हा सत्र न्यायालयात अपील करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या निकालावर बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता ते महसूल मंत्री आणि नंतर पक्षाचा प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत मारलेली मजल ही काही हितशत्रूंना मानवत नाही आणि त्यामुळेच मला अडचणीत आणण्यासाठी खोटे शपथपत्र दाखल केल्याची तक्रार करून मला त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र सत्याचाच विजय होतो हे न्यायालयाच्या निकालाने दाखवून दिले आहे.
कोथरूड विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी खोटे शपथपत्र दाखल केले असा आरोप करत अभिषेक हरिदास यांनी भारतीय लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 125 (अ) अन्वये पाटील यांच्या निवडीविरुद्ध न्यायालयात दाद मागितली होती. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 202 अंतर्गत पुण्यातील फौजदारी न्यायालयात (JMFC) याबाबतचा खटला दाखल करण्यात आला होता. न्यायाधीश जान्हवी केळकर यांनी विस्तृत निकालपत्रात आ.चंद्रकांत विरुद्धचे सर्व आरोप फेटाळून लावले व सदर खटला निकाली काढला.
प्रसिध्दीपत्रकात पाटील यांनी म्हटले आहे की, अशा खोट्या आरोपांची आता सवय झाली आहे. या आरोपांमुळे मानसिक त्रास होतो हे जरी खरे असले तरी अशा कट-कारस्थानातून मी अधिक तावून सुलाखून बाहेर पडून पुन्हा एकदा समाजसेवेचे जे व्रत स्वीकारले आहे ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा सज्ज होतो.
तक्रारदाराच्या सर्व तक्रारींची व सोबतच्या साक्षी पुराव्यांची शहानिशा करुन न्यायालयाने निरीक्षण नोंदविताना चंद्रकांत पाटील यांच्या विरुद्धचे सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. यात प्रामुख्याने…
1) चंद्रकांत पाटील यांनी शपथपत्रात जोडलेली आयकर विवरणपत्र योग्य असल्याचे निरीक्षण नोंदविले.
2) तसेच निवडणूक लढवत असताना चंद्रकांत पाटील यांनी कोणत्याही लाभाच्या पदावर नसल्याने हा दावा ही फेटाळण्यात आला.
3) त्याचबरोबर चंद्रकांत पाटील ज्या पदांवर पदसिद्ध होते त्या पदावरील व्यक्तीस मानधन मिळत नसल्याने शपथपत्रात उत्पन्न लपविले असे म्हणणे देखील अयोग्य असल्याचे निरीक्षण ही न्यायाधीशांनी नोंदवले.
4) तसेच चंद्रकांत पाटील यांच्या विरुद्ध कोल्हापूरच्या न्यायालयात दाखल गुन्हा प्रकरणी देखील न्यायाधीशांनी तक्रारदाराचे म्हणणे फेटाळले.

 

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *