Breaking News

पुलवामा घटनेचा सोशल मिडीयासह सर्वस्तरात निषेध

नालासोपारा, घाटकोपर, ठाणेसह अनेक ठिकाणी मोर्चे, रेल रोको, निदर्शने 
मुंबंईः प्रतिनिधी

जम्मू व काश्मीर येथील पुलवामा येथे जैश ए-मुहम्मद या अतिरेकी संघटनेच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात देशाच्या ४४ सैनिकांना प्राण गमावावे लागले. त्याचे पडसाद राजकिय क्षेत्राबरोबरच सर्वसामान्य नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमटले असून सोशल मिडीयावरील व्हॉट्सअँप, फेसबुक, ट्टिटरवर पाकिस्तान निषेधाच्या पोस्ट झळकत आहेत. तर मुंबईतील भेंडीबाजार, नालासोपारा, घाटकोपर, ठाणे येथील मुस्लिम नागरीकांनी निषेध मोर्चे, बंद, रेल रोकोचे आंदोलन केले.
सोशल मिडीयातील व्हॉट्सअँप, फेसबुक आणि टि्टरवर अनेकांनी शहीदांना श्रध्दांजली वहात पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच पाकिस्तानला धडा शिकवाच अशी मागणी करणारे अनेक पोस्टही व्हायरल झाल्या. तर काहीजणांनी पुलवामा येथील घटनेचे फोटो व्हायरल करत घटनेची तीव्रता दाखवित घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. तर काहींनी काळा दिनाचे डीपी लावून श्रध्दांजली वाहीली.
भेंडी बाजार बंद
दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भेंडी बाजार या मुस्लिम बहुल भागातील दुकानदार, व्यापाऱ्यांनी बाजार बंद ठेवला होता. या वेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पाकिस्तानी ध्वजही जाळले.
ठाणे, घाटकोपरमध्येही निषेध
ठाण्यातील राबोडी भागातील मुस्लीम समाजातर्फे हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. लोकांनी मौलवींसह रस्त्यावर उतरत निषेध केला. तर यंग व्हॉइस क्लबच्या तरुणांनी घाटकोपर पूर्व स्थानकाजवळ पाकिस्तानी अतिरेकी संघटनेच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूल’ तसेच क्लारास कॉलेज ऑफ कॉमर्स यांनी ३८वा वार्षिक महोत्सव दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून रद्द केला.
बॉलीवूडच्या कलाकारांनीही या हल्ल्याचा निषेध करताना आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले. कराची आर्ट कॉन्सिलकडून ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांना कराची साहित्य महोत्सवाचे आमंत्रण देण्यात आले होते. दोघांनीही हे आमंत्रण स्वीकारले होते. यासाठी दोन दिवसांचा कराची दौराही दोघे करणार होते. मात्र त्यांनी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेता जितेंद्र जोशीने समाजमाध्यमावर कविता पोस्ट करत या हल्ल्याचा निषेध केला आहे. निलाजऱ्या लोकांचे जगणे अप्पलपोटी, मने कोरडी रक्तानेही भिजली नाही.. अशा शब्दांत जितेंद्रने संताप व्यक्त केला आहे.
अभिनेता आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान, उरी द सर्जिकल स्ट्राइक फेम विकी कौशल, अजय देवगण, अभिषेक बच्चन, मनोज वाजपेयी, अक्षय कुमार, रणवीर सिंग, करण जोहर, अर्जुन कपूर, आर. माधवन, वरुन धवन, ऋषी कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख, अनुपम खेर, आयुष्यमान खुराना, विनोदी अभिनेते जॉनी लिवर, परेश रावल, गीतकार लेखक प्रसून जोशी, प्रसिद्ध मराठी अभिनेते सुबोध भावे यांनी जवानांप्रती आपल्या सहृदय भावना व्यक्त करत त्यांना समाजमाध्यमावरून श्रद्धांजली वाहिली आहे. तर अभिनेत्री कंगना राणावत हिने मणिकर्णिका या हिंदी चित्रपटाचे यश साजरे करण्याचे ठरवले होते. यासाठी तिने मेजवानी शनिवारी आयोजित केली होती. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर कंगनाने ही मेजवानी रद्द केली.

Check Also

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,निर्भय आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *