Breaking News

पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे मुंबई, महाराष्ट्राचा फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

नवी मुंबई : प्रतिनिधी

मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या वेगाने पायाभूत सुविधांची कामे सुरु असून २०२२ पर्यंत मोठा विकास झालेला आपण पाहाल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास व्यक्त करत राज्यातील विकास कामांच्या अंमलबजावणीची प्रशंसा केली. हवाई वाहतूक आणि जल वाहतूक क्षेत्रातही झपाट्याने विकास होत आहे. यामुळे देशाला जागतिकीकरणाचा खरा लाभ मिळेल. त्याचबरोबर मुंबईतील या विकासकामांसह शिवरायांचे प्रेरणा देणारे स्मारक देखील समुद्रात उभे राहिलेले असेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्र्स्टच्या चवथ्या कंटेनर टर्मिनलचे लोकार्पण इलेक्ट्रॉनिक पध्दतीने कळ दाबून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उलवे गावाजवळील कोंबडभुजे येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल सी.विद्यासागर राव, केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी, नागरी हवाई वाहतूक मंत्री पी. अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रायगडचे पालक मंत्री रविंद्र चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते. हा कार्यक्रम प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आला होता.

आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानी असलेल्या या रायगड भूमीमध्ये हे आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. या स्वराज्य भूमीला माझा प्रणाम” छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी जेएनपीटीच्या चवथ्या टर्मिनलचे उद्घाटन आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमीपुजन अशा दोन संधी मिळणे हा चांगला योगायोग आहे. सागरी शक्तींचे महत्व ओळखणारे छत्रपती शिवराय हे पहिले राष्ट्रपुरुष होते. ते किती दूरदृष्टी असलेले होते याची कल्पना आज जेव्हा आम्ही सागरी शक्तींमध्ये वाढ करीत आहोत तेव्हा लक्षात येते.

आज देशाला लाभलेल्या ७ हजार ५०० कि.मी. सागरी किनाऱ्याचा सर्वांगिण विकास करून सागरी शक्ती वाढविण्यासाठी आम्ही महत्वपूर्ण पाऊले उचलल्याचे सांगून प्रधानमंत्री म्हणाले की, १०० हून अधिक जलमार्गाचे नियोजन आम्ही केले आहे. नवी मुंबईत उभारण्यात येणारे हे आंतरराष्ट्रीय विमानतळ स्वातंत्र्यानंतरचे पहिले ग्रीन फिल्ड विमानतळ असेल. अनेक सरकारे आली पण एअरपोर्टचे स्वप्न तसेच राहीले होते. १९९७ मध्ये वाजपेयी सरकारच्या काळात त्या ठिकाणी विमानतळ व्हावे अशी कल्पना पुढे आली होती. मी पंतप्रधान झाल्यावर देशातील महत्वपूर्ण पायाभूत सुविधांना वेग देण्यासाठी “प्रगती” नावाचा एक कार्यक्रम सुरु केला. त्यामार्फत राज्यांतील सचिवांशी थेट चर्चा करून येणाऱ्या अडचणी सोडविल्या.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लोकप्रिय मुख्यमंत्री असा उल्लेख करुन ते म्हणाले की, अशाच एका व्हिडीओ कॉन्फरसिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई विमानतळाचे काम विविध परवानग्या अभावी थांबले असल्याचे सांगितले. आम्ही तात्काळ त्याचवेळी सर्व आवश्यक परवानग्या दिल्या. १० लाख कोटी रुपयांचे विविध प्रलंबित प्रकल्प मार्गी लावले असून त्यात हाही एक प्रकल्प होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, २०१९ च्या डिसेंबरपर्यंत या विमानतळाचा एक टर्मिनल व एक धावपट्टी तयार होऊन यावरून पहिले विमान उडेल. महाराष्ट्र आणि मुंबईच्या जीडीपीमध्ये या विमानतळ विकासामुळे निश्चितपणे एक टक्क्याने वाढ होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. या विमानतळासाठी ९८ टक्क्यांहून अधिक जमीन शेतकऱ्यांनी स्वत:हून दिली असून देशातील सर्वोत्तम पॅकेज आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे.

याप्रसंगी केंद्रीय नागरी हवाई मंत्री अशोक गजपती राजू यांनी आपल्या प्रस्तावनेत हवाई वाहतूक क्षेत्रात सामंजस्य करार करणारे महाराष्ट्र शासन हे पहिले राज्य असल्याचे सांगून कौतूक केले.

बंदर विकासामुळे भुमिपुत्रांना नोकऱ्या- गडकरी

सागरमाला प्रकल्पामुळे कोकणातील मच्छिमारांना मोठा फायदा होणार असून ते आता ट्रॉलर्समुळे खोल समुद्रात २०० नॉटीकल इतक्या अंतरावर मासेमारी करू शकतील. मुंबईमध्ये पुढील काळात ९५० क्रुज येणार असून त्यामुळे रोजगारामध्ये मोठी वाढ होणार आहे. रायगड आणि मुंबई या दोन्ही जिल्ह्यातील युवकांना नौकाबांधणी आणि सागरी क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत असून सव्वा लाख भूमीपुत्रांना त्यातून नोकऱ्या उपलब्ध होतील. तसेच माल वाहतुकीला चालना देण्यासाठी मनमाड ते इंदोर या रेल्वेमार्गाच्या निर्मितीसाठी जेएनपीटीने ६ हजार कोटींची गुंतवणूक केल्याचेही केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

तसेच जालना, वर्धा येथे ड्राय पोर्ट उभारणी सुरु असुन नाशिक व सांगली येथे लवकरच कार्यान्वित केले जाईल. नवी मुंबईतील कंटेनर वाहतूक कमी करण्यासाठी बीपीटी येथे कंटेनरसाठी विशेष व्यवस्था करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाविषयी

नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनी रु. १६ हजार कोटी इतका खर्च असलेले विमानतळ विकसित करण्यासाठी स्थापन करण्यात आली. सिडको आणि राज्य शासन हे एनएमआयएएलचे भागीदार आहेत. एकूण २२६८ हेक्टरवर उभारण्यात येणाऱ्या विमानतळाचे गाभा क्षेत्र ११६१ हेक्टर इतके आहे. स्वातंत्र्यानंतरचे भारतातील सर्वांत मोठे ‘ग्रीनफिल्ड’ विमानतळ असा लौकिक असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रति वर्ष ६० दशलक्ष प्रवासी संख्या हाताळू शकेल.

जेएनपीटी टर्मिनलविषयी

सदर विमानतळ प्रकल्पामुळे १० गावांतील सुमारे ३५०० कुटुंबांचे, स्थानिक उद्योगांचे व बांधकामांचे स्थानांतरण करावे लागणार आहे. प्रकल्पबाधित ग्रामस्थांना ‘भूमी, अधिग्रहण, पुनर्वसन व पुन:स्थापना, पारदर्शकता आणि योग्य मोबदला कायदा-२०१३’ नुसार पुर्नवसन व पुन:स्थापनेचे सर्वोत्तम पॅकेज देण्यात आले आहे.

जेएनपीटी चवथे टर्मिनल-  एकाच वेळी तीन कंटेनर जहाजे हाताळण्याची सुविधा,भारतातील एकमेव ऑन डेक डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉर पूर्तता सुविधा, सात हजार ९१५ कोटी रुपयांची गुंतवणूक, डबल स्टेकिंगसह दिड कि.मी लांबीची ३६० टीईयू कंटेनर ट्रेन्स हाताळण्याची क्षमता,  मोठ्या कंटेनर व्हेसल्स हाताळण्यासाठी २२ रो रुंद  आऊटरिच मोठ्या क्रेन्स, सागरमाला अंतर्गत महाराष्ट्रातील बंदरांवर आधारीत औद्योगिकीकरणाला मोठी चालना मिळेल. २०२२ पर्यंत तीन टप्पे पूर्ण होणार. चवथ्या कंटेनर टर्मिनल कार्यान्वित झाल्यानंतर वर्षाला २४ लाख कंटेनर हाताळण्याची क्षमता निर्माण होणार.

 

Check Also

महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच ‘या’ परिक्षांच्या तारखा जाहीर करणार

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परिक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *