Breaking News

२०२५ मध्ये देशाचे सकल उत्पन्न ५ ट्रिलियन डॉलर होणार सेवाविषयक जागतिक प्रदर्शनाचे राष्ट्रपतीं रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई  : प्रतिनिधी

सेवा क्षेत्र आणि तंत्रज्ञानाच्या समन्वयातून भारताचे सकल घरेलू उत्पन्न २०२५ मध्ये पाच ट्रिलियन डॉलर इतके होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करीत त्यामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा तीन ट्रिलियन डॉलर इतका असेल. रोजगार, उत्पादकता आणि नाविन्यता या क्षेत्रात सेवांचे प्राबल्य आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वेगामुळे सेवा क्षेत्राचे योगदान शेती, उत्पादन क्षेत्र आणि सुविधा क्षेत्रासाठी महत्वाचे ठरले आहे. ‘सेवा क्षेत्र’ हे २१ व्या शतकातील जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे. बारा सर्वोत्कृष्ट सेवा क्षेत्राची सुरुवात हे एक धाडसी पाऊल आहे, त्यामुळे भारताची आणि जगाची अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. भारतीय सेवांचे क्षेत्र वाढून त्या जागतिक सेवा क्षेत्रात आपले स्थान निर्माण करतील, असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे व्यक्त केला.

गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये केंद्रीय वाणिज्य विभाग व महाराष्ट्र शासनातर्फे चौथे सेवांविषयक जागतिक प्रदर्शन आणि १२ सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय सेवा क्षेत्रांचा शुभारंभ राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू, वाणिज्य विभागाच्या सचिव रिटा टिओटिया यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रपती यावेळी म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी या उपक्रमाचे सहयजमानपद भूषविले. देशाच्या आर्थिक आणि गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्राची भूमिका महत्वाची आहे. महाराष्ट्राला मजबूत उद्योगांचा पाया असून आता वाढत्या सेवा क्षेत्रामुळे ते उद्योग क्षेत्राला अधिक पूरक ठरले आहे. भारतात, सेवा क्षेत्राचे योगदान सकल मूल्याच्या ६१ टक्के आहे. तरुण लोकसंख्या, तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे हुशार तंत्रज्ञ यामुळे भारत जगात एका वैशिष्ट्यपूर्ण स्थितीत आहे. जगाला सेवा पुरविण्याच्या स्थितीत आज भारत येऊन पोहोचला आहे. २०१६ मध्ये भारताची जागतिक सेवा निर्यात ३.४ टक्के होती. २०२२ पर्यंत हे प्रमाण ४.२ टक्क्यांवर जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेमुळे भारत हे जगातील गुंतवणूकदारांचे आणि उद्योजकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. गेल्या चार वर्षात सकल घरेलू उत्पन्नाचा दर ६.९ टक्के राहिला आहे. २०१८-१९ साठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ७.४ टक्के राहील असे भाकीत केले आहे. त्यासाठी सेवा क्षेत्राची भरारी हे प्रमुख कारण असणार आहे.

भारत हे जगातील तिसरे सर्वात मोठे स्टार्ट-अप केंद्र आहे. त्यामुळे देशात तरुण उद्योजकांची एक पिढी निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या मुद्रा योजना किंवा स्टार्ट-अप इंडिया योजनेमुळे १२० दशलक्ष उद्योगांना भांडवल मिळाले आहे. मला खात्री आहे की यापैकी काही स्टार्ट-अप हे येणाऱ्या काळात मोठ्या उद्योगात परिवर्तीत होतील. एक बिलियन मोबाईल फोन धारक, इंटरनेटचा वापर करणारे ५०० मिलियन नागरिक आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सर्वांचा परिणाम भारताच्या सेवा क्षेत्रावर होणार आहे.

गेल्या चार वर्षात विदेशी गुंतवणुकीवरील निर्बंध अनेक क्षेत्रात सुलभ करण्यात आले आहेत. परकीय गुंतवणुकीला आकर्षित करणारा जगातील सर्वात मोठा देश म्हणून भारताची ओळख आहे. आर्थिक सेवा, व्यापार आणि प्रोफेशनल सेवा, संशोधन आणि विकास, आदी सेवा क्षेत्रात एप्रिल २००० पासून ५७ टक्के विदेशी गुंतवणूक भारतात झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असल्याचा उल्लेख यावेळी राष्ट्रपतींनी केला.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर होणार-मुख्यमंत्री

आर्थिकवृद्धी आणि रोजगार निर्मितीसाठी सेवा क्षेत्राची भूमिका महत्वाची आहे. भारत हा जगातील तरुणांचा देश म्हणून विकसित होत आहे. २०२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर होणार असून याच वेळी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. उत्पादन निर्मिती आणि सेवा क्षेत्रात महाराष्ट्र देशात कायमच अग्रेसर असल्याचे सांगत सेवा क्षेत्राच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर होण्याकरिता सेवा क्षेत्रावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळेच आज येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक प्रदर्शन भरविण्याचा मान राज्याला मिळाला आहे. सेवा क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील योगदान ५९ टक्के असून ते ६७ टक्क्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

जागतिक स्तरावर भारतीय अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगाने वाढत असून त्यामध्ये सेवा क्षेत्राचा मोठा वाटा आहे. राज्यात सेवा क्षेत्र विस्तारण्यासाठी पायाभूत सुविधांचे विस्तीर्ण जाळे उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या जागतिक प्रदर्शनाच्या निमित्ताने ज्या १२ सर्वोत्कृष्ट सेवा क्षेत्राची निवड करण्यात आली आहे. त्या प्रत्येक घटकासाठी राज्यात पोषक असे वातावरण आहे. डिजिटल सेवांच्या माध्यमातून महाराष्ट्राने मोठी झेप घेतली असून त्याचा वापर करत सेवा क्षेत्राच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. देशाची आर्थिक आणि मनोरंजन क्षेत्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये सेवा क्षेत्र विषयक जागतिक प्रदर्शन आयोजित केले. त्याबद्दल केंद्रीय वाणिज्य विभागाचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.

सेवा क्षेत्रात महाराष्ट्राची आघाडी-केंद्रीय वाणिज्य मंत्री

केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, सेवा क्षेत्रामध्ये भारत जागतिक केंद्र होण्यासाठी राज्यनिहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. महाराष्ट्राने यात आघाडी घेत जागतिक प्रदर्शनाचा सहभागी राज्य झाले आहे. आपल्या देशातील असलेल्या विविध क्षेत्रातील उत्कृष्ट आणि कौशल्यपूर्ण ज्ञानाच्या माध्यमातून जगाला उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करुया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी वित्त, पर्यटन, लॉजिस्टिक सेवा, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र सेवा, आरोग्य सुविधा सेवा, बांधकाम आणि अभियांत्रिकी सेवा क्षेत्र, कायदेविषयक सेवा, पर्यावरण विषयक सेवा, वाणिज्यविषयक सेवा, शैक्षणिक सेवा, माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार सेवा व पायाभूत सुविधा सेवा या १२ सर्वोत्कृष्ट सेवा क्षेत्राची निवड करण्यात आली असून त्यांना सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय सेवा क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे.

यावेळी या क्षेत्रातील मान्यवरांनी प्रातिनिधिक स्वरुपात मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये उदय कोटक, विवेक नायर, आर. दिनेश, सुधांशू वत्स, डॉ. नरेश त्रेहान, विनायक चटर्जी, निशांत पारेख, मसूद मल्लिक, प्रफुल छाजेड, प्रद्मुन्म व्यास आणि हरी नायर यांनी अनुक्रमे वित्त, पर्यटन, लॉजिस्टिक सेवा, माध्यम आणि मनोरंजन, आरोग्य, बांधकाम व अभियांत्रिकी, कायदेविषयक सेवा, पर्यावरण, वाणिज्य, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान या सेवा क्षेत्रांमध्ये असलेल्या विविध संधींविषयी मनोगत व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते ‘इंडिया सर्व्हिसेस’चे बोधचिन्ह आणि वेब पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. सीआयआयचे अध्यक्ष राकेश भारती मित्तल यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. केंद्रीय वाणिज्य विभागाच्या सचिव रिटा टिओटिया यांनी प्रास्ताविक केले. या जागतिक प्रदर्शनास १०० देशांतील ५०० शिष्टमंडळ सहभागी झाले आहेत. या सोहळ्याचा शुभारंभ आणि समारोप राष्ट्रगीताने झाला.

Check Also

इन्फोसिस एडीआर न्यूयॉर्क बाजारात ७ टक्क्याने घसरली १५.३० निचांकीस्तरावर

सूचीबद्ध IT फर्मने FY25 साठी १-३ टक्के महसूल वाढीचा अंदाज नि:शब्द स्थिर चलन (CC) जाहीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *