Breaking News

आधी मदत जमा करा, नंतर वरातीमागून घोडे नाचवून उपयोग नाही मराठवाड्याच्या दौऱ्यावर देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर

पुणे: प्रतिनिधी

निसर्गवादळ असो वा तौक्ते चक्रीवादळ यावेळी राज्य सरकारकडून मोठ मोठ्या पॅकेजच्या घोषणा देण्यात आल्या पण आजही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आपत्तीग्रस्तांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे आता घोषणा खूप झाल्या, आता थेट मदतीची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा व्हावी, ही मदत काही महिन्यानंतर नाही तर आता तातडीने करा व बळीराजाला दिलासा द्या अशी आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज करत नंतर वराती मागून घोडे नाचून उपयोग नसल्याचा उपरोधिक टोलाही महाविकास आघाडी सरकारला लगावला.

पुणे येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मी दोन दिवसाच्या मराठवाड्याचा दौ-यावर जाणार आहोत. वाशिम, बीड, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड येथील अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी करुन तेथील शेतकऱ्यांना भेटून, त्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून तेथील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आज एवढे दिवस होऊनही कुठल्याही प्रकारची तातडीची मदत आपतग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. मंत्री धनंजय मुंडे यांनीही पंचनामे करू नका पण मदत करा अशी मागणी केली आहे, तर वडेट्टीवार यांनीही पंचनामे न करता मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी फक्त बोलून दिलासा किंवा धीर मिळणार नाही. तर यासंदर्भात त्यांनी त्वरित आदेश काढले पाहिजेत. त्यामुळे राज्य सरकारने एकच स्पष्ट भूमिका घेऊन मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणीही केली.

पीकांच्या नुकसानीचे व शेतीचे पंचनामे करायचे तेव्हा करा पण आता तातडीची मदत शेतकऱ्यांना देण्याची आवश्यकता आहे. कारण वरातीमागून घोडे नाचवून काही उपयोग नाही. आता जर मदत दिली आणि शेतकऱ्याला धीर दिला तर त्याचा उपयोग आहे. मराठवाडा आज पूर्णपणे उध्वस्त झाला आहे, हवालदिल झाला आहे, त्याची शेती पाण्याखाली गेली आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मदत जाहिर करावी असेही ते म्हणाले.

एका बाजूला बळीराजा संकटात असताना दुसऱ्या बाजूला नेत्याच्या स्वागताला फटाके फोडणे हे दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. सरकारने संवेदनशील भावनेने वागले पाहिजे. परंतु या ठिकाणी सरकार संवेदनाहीन दिसत आहे. महाविकास आघाडीची एक ठरलेली भूमिका आहे. ती म्हणजे काही झाले तर केंद्रावर ढकलायचे आणि मोकळे व्हायचे. आतापर्यंत सुमारे दीड हजार कोटी केंद्राने शेतक-यांसाठी मदत केली आहे. एनडीआरएफच्या माध्यमातून मदत केली आहे. तौक्ते चक्रीवादळ असो, निसर्ग चक्रीवादळ असो किंवा पुराने झालेले नुकसान असो, सगळ्या संकटात त्या त्या वेळेला केंद्राने मदत केलेली आहे. आम्हीही केंद्राकडे मदतीची मागणी करू. त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. केंद्राकडे बोट दाखवून आपल्या जबाबदारीपासून राज्य सरकारला दूर पळता येणार नाही. कुठली गोष्ट झाली की केंद्र आणि राज्य असा वाद उभा करायचा आणि आपल्या मूळ जबाबदारीला, बगल द्यायची अशी रणनीती या महाविकास आघाडी सरकारची आहे. केंद्राकडे बोट दाखवून लोकांचे लक्ष त्याठिकाणी वळवायचे, असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे अशी टीकाही त्यांनी केली.

अजूनही शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या नुकसानीचे पैसे मिळाले नाहीत. कोकणात तौक्ते चक्रीवादळ झाले, निसर्गवादळ झाले त्याची मदत अजून मिळालेली नाही. घोषणा मोठ्या झाल्या, परंतु आजही पैसे मिळाले नाहीत. मदत मिळवून देण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत केंद्र सरकारकडे येऊ, देवेंद्रजी, चंद्रकांत दादा येतील. परंतु केंद्राकडे बोट दाखवणे बंद करा. शेतकऱ्यांना ताबडतोब मदत करा. संकटाच्या काळात राजकीय भूमिका कोणी घेऊ नये असेही त्यांनी स्पष्ट केले.

जलयुक्त शिवार ही योजना फडणवीस साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. ज्या जलयुक्त शिवारमुळे महाराष्ट्रात पाण्याची पातळी राखली गेली. पाण्याचा साठा नीटपणे होऊ शकला. ही अभिनव योजना होती, ज्याचे कौतुक इतर राज्यांनीही केले. म्हणून जलयुक्त शिवार योजनेला दोष देण्यात येऊ नये. शेतकरी आज संकटाच्या परिस्थितीत सापडलाय पण काही जणांच्या डोक्यातून राजकारण जात नाही. म्हणून जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये काही जणांकडून करण्यात येतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

राजभवन हा राजकीय अड्डा झाल्याचे वक्तव्य नवाब मलिक यांनी केले होते. त्याला उत्तर देताना दरेकर म्हणाले की, नवाब मलिक आणि संजय राऊत यांचे बोलणे गंभीरपणे लोक घेत नाहीत, आम्हालाही गंभीरपणे घेण्याची गरज वाटत नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ मिडीयात आले पाहिजे, या दृष्टिकोनातून त्यांची वक्तव्ये असतात. लोकांशी निगडित, लोकांच्या समस्या यावर त्यांना कधी बोलावेसे वाटत नाही. मराठवाड्यातील दुष्काळाबद्दल नवाब मलिक, संजय राऊत बोलले नसल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

Check Also

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांसाठी गोड बातमी: मानधनात वाढ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

मुंबई: प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *