Breaking News

प्रशांत किशोर- शरद पवार यांची भेट: नव्या निवडणूक रणनीतीची नांदी पण काहीकाळ वाट पहावी लागणार

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ओळख ही खरी तर दिल्लीच्या तक्ताला धडका मारणारा नेता अशीच आहे. त्यानंतर गुढ राजकिय व्यक्तीमत्व आणि बदलत्या परिस्थितीवर मात करत स्वत:चे वेगळे अस्तित्व टिकवून ठेवणारा नेता, दूरदृष्टीचा नेता म्हणून ही सबंध देशभरात ओळखले जाते. निवडणूकीच्या आधीच राज्यात काय वारे वहातेय अंदाज घेवून त्या रणनीतीवर स्वत:च्याभोवती राजकारण फिरविण्याची त्यांची हातोटी आहे. मात्र आज भाजपाला छप्पर तोड विजय मिळवून देणारे राजकिय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने या भेटीकडे सर्वसामान्य जनतेपासून राजकिय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचाविल्या गेल्या आहेत.

स्व.इंदिरा गांधी यांच्या काळात त्यांनाच आव्हान देत राज्यात पुलोदचा प्रयोग करून राज्यात सत्ता हस्तगत केली. त्यांच्यानंतर काँग्रेसला आपण पुरेशे आव्हान देवू शकत नाही किंवा काँग्रेसला पर्याय देवू शकत नसल्याची राजकिय जाणीव होताच पवारांनी स्व.राजीव गांधी यांच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करत राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व स्वत:च्या हाती ठेवले. त्यानंतर पुन्हा काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाला आव्हान देत काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांच्याबरोबर काँग्रेस नेते स्व.पी.ए.संगमा आणि तारीख अन्वर हे दोन नेतेही बाहेर पडले. या तिघांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. परंतु पक्षावर कोणाची कमांड हवी या वादातून संगमा हे राष्ट्रवादीतून बाहेर पडत त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला. तर तारीक अन्वर हे काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून बाहेर पडले.

या दोघांच्या जाण्यानंतरही पवारांनी एकट्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवित काँग्रेसबरोबर १५ वर्षे सत्ता उपभोगली आता पुन्हा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन करून त्याची सारी सुत्रेही स्वत:च्या हाती राहतील याची काळजी घेतली. या सर्व घटनांमागे पवारांनी नेहमीच महाराष्ट्रातील राजकारण स्वत:भोवती कसे फिरत राहील याची काळजी घेतली. आणि ही काळजी घेत असताना २०१४ साली आणि २०१९ साली विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत झालेल्या चुका दुरूस्त करण्यासाठी पुढील रणनीती आखून पुन्हा आपले राजकिय वर्चस्व कसे राहील यासाठी त्यांचा सतत प्रयत्न करत असतात. त्यातून पक्षापासून दुरावलेल्या मतदाराला पुन्हा पक्षाशी जोडण्यासाठी सत्तेच्या माध्यमातून त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु केले. जेणेकरून त्याचा फायदा आगामी निवडणूकीत होईल याची खुणगाठ पवारांनी यापूर्वीच बांधली आहे.

भाजपाच्या छप्परतोड विजयामुळे प्रकाशाच्या झोतात आलेले प्रशांत किशोर हे नेहमीच आपली रणनीती तयार करताना गेल्या पाच वर्षात कोणत्या पक्षाने काय काम केले, चुका काय झाल्या, कोणता मतदार तुटला यापासून कोणत्या जमेच्या बाजू आहेत, कोणत्या कमकुवत आहेत याची सविस्तर माहिती ज्या पक्षाचे काम घेतले आहे. त्या पक्षाला देतात. त्यासाठी किशोर हे सूचनांची यादी त्या त्या पक्षाच्या प्रमुखाला देत असतात. त्याचे ताजे उदाहरण म्हटले तर पश्चिम बंगाल निवडणूकीनंतर प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीतील त्यांची वक्तव्ये.

किशोर यांच्या त्या मुलाखतीतून त्यांचा भाजपावर असलेला राग खासकरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याप्रती असलेली भावना पहिल्यांदाच जगजाहीर झाली. तसेच त्यांच्या काम करण्याच्या पध्दतीची माहितीही सर्वांसमोर आली. गुजरात निवडणूक, बिहारमधील नितीश कुमार-लालू प्रसाद यांच्या युती असतानाची निवडणूक, पंजाबची विधानसभा निवडणूक आणि आता कट्टर भाजपा विरोधक ममता बॅनर्जी यांच्यासाठी आखलेली रणनीती यासाठी महत्वाची आहे.

शरद पवारांना पंतप्रधान व्हायची मनिषा आहे हे आता सर्वश्रुत आहे. २०१४ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीनंतर बदलेल्या राजकिय परिस्थितीत अस्तित्व टिकवून ठेवण्याचे आव्हान सर्वच भाजपेतर पक्षाच्या नेत्यांबरोबर पक्षांसमोर उभे टाकले आहे. याचा अंदाज पवारांनाही आला. त्यानुसार २०१९ च्या निवडणूकीत त्यानुसार पावलेही टाकली. परंतु २०१४ च्या निवडणूकीवेळी गमावलेला पक्षावरील विश्वास त्यांना मिळविता आला नाही. मात्र आपल्या चतुर डावपेचाने राज्यात सर्वाधिक जागा मिळवूनही प्रथम क्रमांकाचा पक्ष असलेल्या भाजपाला १०५ जागा असूनही विरोधी पक्षात बसायला भाग पाडले हे ही थोडके नाही.

मागील दिड वर्षाच्या काळात केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे त्यांना उत्तर भारतात होत असलेला विरोध या गोष्टींचा त्यांनी पहिल्यांदा अंदाज घेतला. हे आंदोलन पुढे वाढत राहील्यानंतर या आंदोलनाला पाठबळ देण्याचे काम पवारांचे, झारखंडमध्ये भाजपाला सत्तेपासून रोखण्यात आणि केरळ, पश्चिम बंगाल आणि तामीळनाडू मध्ये डिमकेच्या स्टॅलीन यांना पुरविलेली रसद म्हणावी तशी माध्यमांमध्ये आलेली नसली तरी या सर्व ठिकाणी पवारांनी पंतप्रधान पदी तिसऱ्या आघाडीची किंवा युपीएच्या मदतीने बसता यावे यासाठी सर्व रणनीती आखल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांकडूनच सांगितले जात आहे. याशिवाय कोरोना विषाणू, शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या खतांच्या वाढविलेल्या किंमती, पेट्रोल-डिजेल दरवाढ याप्रश्नांसह पवारांकडून इतर पक्षांच्या नेत्यांकडून दखलपात्र हरकत घेण्याआधी सर्वात आधी घेतली जाते. त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या जवळपास महत्वाच्या धोरणात्मक निर्णयावर त्यांचाच प्रभाव असल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे भविष्यकाळाचा किमान पाच वर्षीय राजकारणाचा आडाखा आणि अभ्यास करून शरद पवार हे आपले राजकारण करतात अशी माहितीही राष्ट्रवादीचे नेते खाजगीत सांगतात. तर सातत्याने देशातील राजकिय पक्षांच्या राजकारणाचा अभ्यास करून त्या त्या पक्षाला राजकिय रणनीती आखण्यात मदत करणारे प्रशांत किशोर यांची भेट झाल्याने मोदींचा पराभव आणि भाजपाला पुन्हा त्यांच्या मुळ राजकिय स्थानावर आणण्याच्यादृष्टीने दोन्ही रणनीतीकार कोणती रणनीती आखतात याचे उत्तर आगामी काळातच मिळणार असले तरी महाराष्ट्राबरोबरच देशातील राजकारणात उलथा-पालथी घडणार यासाठी काही काळ आपल्याला वाट पहावी लागणार.

Check Also

मोदींचे फाळणी विषयीचे ते ट्विट पंतप्रधान म्हणून की भाजपाचे नेते म्हणून? वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवर फाळणीच्या दु:खाची आठवण मात्र पीएमओच्या खात्यावर नाही

नवी दिल्ली-मुंबई: विशेष प्रतिनिधी मागील सात वर्षापासून देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *