Breaking News

माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांचे निधन वयाच्या ८४ व्या वर्षी रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास

मुंबई : प्रतिनिधी

काँग्रेसचे संकट मोचक तथा देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आज वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया या महिन्याच्या सुरुवातीला करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळण्यास सुरुवात झाली. त्यातच ते कोमात गेले. कोमातून बाहेर आणण्यासाठी त्यांच्यावर अनेक उपचार करण्यात आले. परंतु ते कोमातून बाहेर येवू शकले नाहीत. अखेर त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची घोषणा प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजित मुखर्जी यांनी आज केली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार राहीला.

त्यांच्यावरील शस्त्रक्रियेसाठी लष्करी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या फुफ्फुसावर इन्फेक्शन झाले होते. स्व.इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर त्यांची पंतप्रधान पदी वर्णी किंवा देशाच्या अर्थमंत्री पदाची जबाबदारी काँग्रेसकडून सोपविली जाईल अशी अटकळ बांधण्यात येत होते. मात्र त्यांच्याऐवजी स्व.राजीव गांधी यांचे नाव पुढे आले आणि देशाच्या पंतप्रधान पदाची माळही त्यांच्या गळ्यात पडली. २००४ साली पहिल्यांदा युपीएचे सरकार आल्यानंतर त्यांची पंतप्रधान पदाची मनिषा होती. मात्र त्यावेळी मनमोहन सिंग यांच्या गळ्यात या पदाची माळ पडली. त्यानंतर २००९ सालीही पंतप्रधान बनण्याची त्यांची इच्छा होती. त्यावेळी तशी अटकळही बांधण्यात येत होती. मात्र पुन्हा मनमोहन सिंग यांनाच संधी देण्यात आली. त्यातच पक्षात राहुल गांधी यांचा उदय झाल्याने प्रणव मुखर्जी यांना देशाच्या राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले. त्यानंतर ते राष्ट्रपती म्हणून पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला.

त्यांच्या मृत्यूमुळे राज्यातील नेत्यांबरोबरच देशभरातील अनेक नेत्यांनी त्यांना श्रध्दांजली वाहीली.

देश महान मुत्सद्दी नेत्यास मुकला

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने देश एका महान मुत्सद्दी नेत्यास मुकला आहे. गेली किमान ६० वर्षे प्रणव मुखर्जी राजकारणात सक्रिय होते. त्यांचे राजकारण काँग्रेसधार्जिणे असले तरी सदैव राष्ट्रहिताचाच विचार करून त्यांनी आपली पावले टाकली. केंद्रीय मंत्रिमंडळातील संरक्षण, अर्थ यासह अनेक महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली, पण अर्थमंत्री म्हणून त्यांची छाप सर्वाधिक राहिली. त्यांचे वाचन अफाट होते. त्यांची निरीक्षणशक्ती अचाट होती आणि ते कमालीचे हजरजबाबी होते. काँग्रेस पक्ष संकटात असताना अनेकदा वादळातील नौका किनाऱ्याला लावण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. उत्तम पंतप्रधान होण्याची क्षमता त्यांच्यात होती, पण ते देशाचे राष्ट्रपती झाले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना खुला पाठिंबा दिला. प्रणवबाबूंसारख्या विद्वान, अनुभवी व्यक्तीची राष्ट्रपती भवनात गरज आहे, असे शिवसेनाप्रमुखांचे मत होते आणि त्याबाबत प्रणवबाबू नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

प्रणब मुखर्जी सांसदीय राजकारणातील भीष्म पितामह

स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय राजकारणावर अंगभूत बुद्धिमत्ता, कार्यकुशलता, संघटन कौशल्य, प्रशासकीय व सांसदीय कार्य अनुभव आणि राजनैतिक द्रष्टेपणाची अमिट छाप सोडणाऱ्या निवडक राजकारण्यांमध्ये प्रणब मुखर्जी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. गेल्या पाच दशकांमध्ये प्रणब मुखर्जी यांनी अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, सभागृह नेते आणि भारताचे राष्ट्रपती यांसह विविध जबाबदार्‍या समर्थपणे पार पाडताना त्या त्या पदांची ऊंची वाढविली. जवळ जवळ चार दशके सातत्याने संसदेचे सदस्य असलेल्या प्रणब मुखर्जी यांनी देशातील सांसदीय लोकशाही सुदृढ करण्यासाठी असाधारण असे योगदान दिले. त्यांच्या निधनामुळे देशाने सांसदीय राजकारणातील भीष्म पितामह गमावले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

 

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

सर्वमान्य, सर्वसमावेशक नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ, अनुभवी, विद्वान, सुसंस्कृत, मार्गदर्शक नेतृत्वाचं निधन ही देशाची, भारतीय राजकारणाची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त करुन डॉ. प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली.

 

ज्येष्ठअनुभवी,मार्गदर्शक प्रणवदांचे निधन ही देशाची मोठी हानी

ज्येष्ठ, अनुभवी,मार्गदर्शक प्रणवदांचे निधन ही देशाची मोठी हानी आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणातील सर्वसमावेशक नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे, गेल्या पाच दशकांहून अधिक काळ प्रणब मुखर्जी यांनी अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, सभागृह नेते आणि भारताचे राष्ट्रपती यांसह विविध जबाबदार्‍या समर्थपणे पार पाडल्या. डॉ. प्रणव मुखर्जी हे भारतीय राजकारणातील मोठे नेतृत्व होते. देशासमोरच्या आव्हानात्मक परिस्थितीत राजकीय नेतृत्वामध्ये समन्वय साधून प्रश्न सोडवण्याचं कौशल्य आदरणीय प्रणवदांकडे होतं. त्यांचं निधन ही देशाची, महाराष्ट्राचीही हानी आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

Check Also

सहा महिन्यात सर्व वाहनांसाठी फ्लेक्स फ्युयल इंजिन बंधनकारक केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

नागपूर : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून केंद्रीय रस्ते महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *