Breaking News

वीज सवलतीवरून मनसे, भाजपा, वंचित आक्रमक नागरिकांना वीज बिल न भरण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी

कोरोना लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिलात सवलत देण्याची घोषणा करणारे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या सततच्या घोषणेनंतर अचानक यु टर्न घेत वीज बिलात सवलत देता येणार नसल्याचे सांगत नागरिकांनी वीज बिले भरावीत असे आवाहन केले. त्यामुळे भाजपाचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मनसे नेते बाळा नांदगांवकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नागरिकांनी वीज सवलत मिळत नाही तोपर्यत बिले न भरण्याचे आवाहन आज केले.

राज्यातील वीज ग्राहकांना बिलात सवलत देणार असल्याची घोषणा करत दिवाळीत यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची घोषणा ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केली होती. मात्र दिवाळी संपताच सवलत देणे शक्य नसून महावितरणवर ५१ हजार कोटी रूपयांचा बोजा वाढल्याचे जाहीर केले. राऊत यांच्या या यु टर्नमुळे राजकारण चांगलेच रंगले.

यासंदर्भात मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी या वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारशी बोलून नागरिकांना दिलासा देणार असल्याचे राज ठाकरे यांना सांगितले होते. मात्र आता पवारांच्या या बोलण्याला सरकारमध्ये किंमत राहीली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आता वीज बिले भरू नये असे आवाहन करत जर महावितरणची माणसे जर वीज जोडणी तोडायला आली तर मनसे कार्यकर्त्ये त्यास विरोध करतील असा इशाराही त्यांनी दिला.

तर भाजपाचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऊर्जा मंत्र्यांची फाईल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे फेकून देत असल्याचा गौप्यस्फोट करत भाजपा सरकारच्या काळात दर दिवाळीला आम्ही नागरिकांना सवलत देत होतो. मात्र हे सरकार नागरिकांची दिवाळी कडू करत केल्याचा आरोप करत एस.टी महामंडळाला जर राज्य सरकार पॅकेज देत असेल तर महावितरणला पॅकेज का देत नाही? असा सवाल उपस्थित करत मनसेच्या आंदोलनात भाजपा सहभागी असेल असे जाहीर ही केले.

तर हिंगोलीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नागरिकांनी वाढीव वीज बिले भरू नये असे आवाहन केले.

राज्यातील या प्रमुख तीन विरोधकांनी आता आक्रमक पवित्रा घेतल्याने ऊर्जा मंत्री राऊत आणि महाविकास आघाडी सरकार पुन्हा यु टर्न घेणार की आताच्या निर्णयावर ठाम राहणार हे लवकरच पाह्यला मिळेल.

Check Also

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यात उमेदवारी जाहिर होताच पत्रयुध्द

मागील १० वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे आहे. परंतु या १० वर्षात भाजपाला स्वतःचा सक्षम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *