Breaking News

राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेले वक्तव्य हे पंतप्रधान मोदींचे वक्तव्य समजावे लागेल राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी
केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे त्यांचे नसून नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य समजावं लागेल कारण त्यांनीच नारायण राणे यांना मंत्री केले आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला.
दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लवकर खुलासा करावा नाहीतर राज्यात व देशात लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मागे भाजपचे लोक लागले आहेत असे चित्र निर्माण होईल. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर पत्रकारांनी जयंत पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता वरील वक्तव्य केले आहे.
नारायण राणे यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असं बोलणं हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. अशी भाषा राजकारणात यापूर्वी कधीही कुणी वापरलेली नाही. नरेंद्र मोदींनी कसे सहकारी निवडले आहेत याची छोटीशी चुणुक नारायण राणे यांच्या वक्तव्यावरुन राज्याला व देशाला कळल्याचा टोला लगावत ते पुढे म्हणाले की, राजकारणाचा स्तर खाली गेलाय असं नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेलाय अशी उपरोधिक टीकाही त्यांनी यावेळी नारायण राणे यांच्यावर केली.
अशा पध्दतीने बोलणार्‍या लोकांना प्रत्येक राजकीय पक्षांनी किती महत्त्व देणं यावर विचार केला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तुम्हाला भले राग असेल किंवा भाजपला उध्दव ठाकरेंचा द्वेष असेल, राग असेल तरी ही भाषा महाराष्ट्र कधीही मान्य करणार नाही. दुर्दैवाने ही भाषा वापरली त्याबद्दल त्यांनी निषेध व्यक्त केला.
चंद्रकांत पाटील यांना जास्त मनावर घेत जाऊ नका. दोन वर्षे ते राजकीय बदल होणार हेच सांगत आहेत. त्यामुळे तुम्हीच तुमचं टीआरपी टिकवायचं असेल तर चंद्रकांत पाटील यांना किती महत्त्व द्यायचे हे ठरवा असेही ते म्हणाले.
जनतेने निवडलेल्या मुख्यमंत्र्यांचा हा अपमान असून ज्यावेळी मुद्दे संपतात त्यावेळी माणसं गुद्दयावर येतात. भाजपचे मुद्दे संपलेले आहेत हे यावरून स्पष्ट दिसत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
जनआशिर्वाद यात्रा कशासाठी… जयंत पाटील
जनआशिर्वाद यात्रा कशासाठी… पेट्रोल – डिझेलच्या व गॅसच्या किंमती वाढल्या म्हणून की, महाराष्ट्रात व देशात महागाई वाढवली म्हणून… आशिर्वाद कशासाठी जनतेने द्यायचा यांना असा थेट सवाल त्यांनी यावेळी केला.
या देशात कधी केंद्रीय मंत्री झाले नाहीत का? की केंद्रीयमंत्री कुणी कधी बघितले नाहीत, त्यामुळे ही जनआशिर्वाद यात्रा हास्यास्पद असल्याची टीका करत भाजप जनआशिर्वाद यात्रा घेण्यासाठी जात आहेत. त्यावेळी लोकंच विचारत आहेत आता हे मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारायला निघालेले लोकं आहेत, त्यामुळे लोकं घाबरतात. आता घरात बसून मतदान येईल त्यावेळी निषेध व्यक्त करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *